You are currently viewing कोकणचे कॅलिफोर्निया होणार की गुन्हेगारी जगत?

कोकणचे कॅलिफोर्निया होणार की गुन्हेगारी जगत?

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गुन्हेगारी वाढीस राजकीय वास

विशेष संपादकीय……

सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्राचे दक्षिण टोक, कोकणच्या सौंदर्याचे उगमस्थान म्हणायला काहीच हरकत नाही. तळकोकण म्हणजे आपला निसर्गसंपन्न नैसर्गिक सौंदर्याने ओतप्रोत भरलेला सिंधुदुर्ग जिल्हा. कोकणचे कॅलिफोर्निया करणार अशा बाता अनेक राजकीय धुरंदारांनी मारल्या, परंतु कोकणचे कॅलिफोर्निया तर झाले नाहीच, परंतु कोकणातील जमिनी राजकीय नेत्यांनी लाटल्या, परप्रांतीय लोकांना विकल्या तर काही ठिकाणी विकासाच्या नावावर प्रकल्प आणणार म्हणून जमिनी आरक्षित करून विकास करण्या ऐवजी कोकण भकास करण्याचे काम मात्र राजकीय नेत्यांकडून होत आले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा हा निसर्गतः सौंदर्याने नटलेला असून त्याठिकाणी पर्यंटणावर आधारित उद्योगधंदे येणे आवश्यक असताना औष्णिक, एन्रॉन, रिफायनरी सारखे विनाशकारी प्रकल्प लादले गेले. यातूनही विकास झाला नाही तेव्हा राजकीय धुरंदरांनी गोवा बनावटीच्या दारूचा पुरवठा आणि विक्री असा झटपट पैसे मिळवून देणारा अवैध उद्योग, मटका इंडस्ट्री, चरस गांजा व्यापार, मिनी कॅसिनो, जुगार, आत्महत्या आणि हळूहळू हत्याकांड पर्यंत उद्योगांची व्याप्ती वाढवली गेली.
“सदरक्षणाय खलनिग्रहनाय” हे ब्रीद घेऊन आपल्या कणखर दमदार करवाईतून भल्याभल्यांच्या उरात धडकी भरवणाऱ्या पोलीस खात्याची तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात पार वाताहात झालेली आहे. जिल्ह्यात गुन्हेगारी वाढत आहे आणि त्याला कारणीभूत राजकीय व्यक्तींप्रमाणे पोलीस खाते देखील आहे. पोलिसांची भीतीच उरली नसल्याने आणि काही झारीतील शुक्राचार्यांच्या मेहेरनजरवर अनेक गैरधंद्याना आसरा मिळत आहे. त्यामुळे जो धाक पोलीस खात्याचा होता तो नाहीसा झालेला दिसून येतो. त्यामुळेच जिल्ह्यात कोण गायब होत आत्महत्या करत असल्याचा स्टंट करून पोलिसांना वेठीस धरतो तर कोणी आत्महत्या करून जेरीस आणतो तर कोण खून करून नामानिराळा होतो.
काय आहे आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवा पिढीचे भविष्य?
कोणी विचार केला आहे का याचा? राजकीय स्वार्थासाठी गैरधंदे करणारे राजकीय वलय असणारे लोक आज विविध पक्षांची पदे उपभोगत आहेत, त्यातून आपल्या दारू, मटका सारख्या गैरधंद्याना संरक्षण मिळवून घेत आहेत. तरुण युवकांना पैशांच्या जोरावर अशा गैरधंद्यांमध्ये ओढत आहेत आणि एकदा का पैसे आणि व्यसनाची लगट झाली की व्यसनापायी हेच तरुण युवक राजकीय लोकांचे गैरधंदे तडीस नेण्याचे काम चोखपणे पार पाडतात. त्यातूनच व्यसनापायी आंबोली घाटातील फेकलेल्या मृतदेहासारखी बलात्कारची घटना घडते आणि राजकीय आश्रय व पैशांच्या जोरावर युवा पिढी व्यसनांच्या आहारी जाऊन अशा गुन्ह्यांमध्ये अडकून आयुष्याची वाट लावून घेते. राजकारण्यांच्या मागून फिरता फिरता गुंड मवाली प्रवृत्तीचा कल आताच्या युवा पिढ्यांमध्ये वाढत चालला आहे. म्हणूनच आजकाल दिवसाढवळ्या सर्रास हत्याकांड, चाकूचे सपासप वार भर वस्तीत, शहरात होत आहेत. छोट्या छोट्या कारणांवरून हे राजकीय आश्रय असणारे गुंड प्रवृत्तीचे तरुण दादागिरी, मारामाऱ्या करण्यास मागेपुढे पाहत नाहीत, त्यामुळे सर्वसामान्य माणूस वाद झाला तरी निमूटपणे सहन करतो परंतु व्यसनाधीन युवकांच्या नादी लागत नाही.
मुंबईसारख्या मायाजाल नगरीत अशा गुन्हेगारी प्रवृत्तीचे प्रकार दररोजच होत आहेत. तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीचे प्रकार आता आपल्या कोकणात सिंधुदुर्गात का होत आहेत?
ज्या कोकणाला सिंधुदुर्गाला आपण भारताच्या किंवा महाराष्ट्राचा नकाशावर संस्कृतीचा, कलेचा वारसा लाभलेले तसेच पर्यटनाचे दृष्टीने व समृद्धीने बहरलेले कोकण अशी ख्याती प्राप्त झालेली आहे. त्या कोकणात आताची युवा पिढी खून मारामारी अशा अनेक अवैद्य व्यवसायात गुंतली आहे. त्यामुळेच सावंतवाडीतील खुनाच्या घटनेतील एका संशयित म्हणून चौकशी झालेल्या तरुणाने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे संशयाची सुई जरी अशा संशयितांकडे फिरली तरी ज्या पद्धतीने हत्याकांड करण्यात आले ते पाहता चोरी हा उद्देश दिसून येत नसून प्रॉपर्टी सारख्या वादामुळे सराईत गुन्हेगार घालून सदरचे हत्याकांड केल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास येते आणि पोलिसांचा देखील तसाच कयास आहे.
मयत निलिमा खानविलकर यांनी आपली १४ गुंठे मिळकत आपल्या मुंबईस्थित भाच्याच्या नावावर केली होती. तर बाजूची ३.५ गुंठे जागा चुलत दिरांच्या नावावर होती. सदरची जागा विकसित करण्यासाठी गेली दहा वर्षे प्रयत्न सुरू असल्याचे समजत असून अलीकडे देखील एका विकासकाने सदर मिळकत विकासाच्या दृष्टीने पाहणी केली होती. परंतु आपण जिवंत असेपर्यंत जागा विकसित करू नये अशी इच्छा मूळ जागा मालकीण निलिमा खानविलकर यांनी व्यक्त केल्याचे ऐकू येत आहे. त्यामुळे जागा विकसित करण्यास आडकाठी येत असल्याने कुणाकडून हे हत्याकांड झाले नाही ना? असाही संशय येण्यास वाव मिळत आहे. मोक्याची शहरातील १४ गुंठे मिळकत विकसित करण्यासाठी मिळत असूनही एका वृद्ध व्यक्तीच्या हट्टापायी जागा ताब्यात मिळत नसल्याने तर अज्ञात व्यक्तीकडून हत्याकांड झाले नसावे ना? असाही एक प्रश्न उपस्थित होत आहे. स्थानिक पोलीस तसेच स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग देखील या खून प्रकरणात तपास करत आहे. १५/२० जणांची चौकशी करून माहिती घेण्यात आली आहे, परंतु ठोस असा काही पुरावा हाती आला नाही. त्यामुळे पोलिसांना आजूबाजूला असलेले सीसीटीव्ही फुटेज पाहून किंवा सदर घटनास्थळी त्या रात्री आढळून आलेल्या मोबाईल सिमच्या माध्यमातून देखील सखोल तपास करावा लागणार आहे. लाईटच्या बोर्ड वर असलेले ठसे, चपलांचे ठसे आदी माध्यमातून तपास होईलच परंतु आरोपी पर्यंत पोचण्यासाठी *सदरच्या मिळकतीचे विकासकामार्फत विकास करण्यात मूळ मालकीण निलिमा खानविलकर यांना स्वारस्य नव्हते, तर आपण असेपर्यंत जागा विकसित करू नये असा त्यांचा आग्रह होता तर ती जागा विकसित करण्यात कोणाला जास्त स्वारस्य होते?* तसेच इतर कोणाला जागा विकसित करण्यात निलिमा खानविलकर या अडचण ठरत होत्या? याच्यावर जास्त लक्ष केंद्रित केल्यास नक्कीच खुन्यापर्यंत पोचण्यासाठी पोलिसांना शक्य होणार असा तर्क व्यक्त होत आहे.
जिल्ह्यात ढासळत चाललेली पोलीस प्रशासनाची इमेज परत मिळवायची असेल तर जिल्ह्यातील गुन्हेगारीचे प्रमाण कमी होणे आवश्यक आहे.
जिल्ह्यातील गुन्हेगारी कमी होण्यासाठी पोलीस प्रशासनास प्रशासन अधिक ताकदवर, गतिमान आणि पारदर्शी करणे महत्त्वाचे आहे. कारण निष्कलंक, पारदर्शी, गतिमान प्रशासनच चांगला रिझल्ट देऊ शकते. त्यामुळे प्रशासनात बोकाळत चाललेला भ्रष्टाचार निपटून काढून योग्य रीतीने गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढली पाहिजेत. जिल्ह्यात सौख्य नांदायचे असेल आणि जिल्हा प्रगतीपथावर न्यायचा असेल तर प्रथम अवैध मटका, दारू विक्री तस्करी, जुगार, गांजा, चरस तस्करी, मिनी कॅसिनो, खोटे जमिनीचे गैरव्यवहार, यासारखे गैरधंदे मुळासहित उखडून काढले पाहिजेत. राजकीय लोकांसोबत दिवसरात्र फिरणाऱ्या तरुण पिढीवर नजर ठेवून कोणताही व्यवसाय न करता ते ऐषआरामात कसे जगतात याचीही चौकशी व्हायला हवी. गैरधंदे करणारे राजकीय पदाधिकारी असले तरी त्यांच्यावर पांघरून न घालता गैरधंद्यांवर चाप ओढला पाहिजे. महिन्याला लाखभर रुपये कमविणाऱ्या लोकांच्या खात्यातून दिवसाला लाखोंचे व्यवहार कसे आणि कोणाला होतात, राजकारणाच्या आड चरस गांजा, दारू तस्करीत कोण कोण आहेत याचीही माहिती घेतली गेली पाहिजे. जेव्हा गुन्हेगारी तळागाळातून उखडून काढता येईल तेव्हाच खून, हत्याकांड असे गंभीर गुन्हे जिल्ह्यात घडणार नाहीत, अन्यथा नशेच्या आहारी जाणारी युवा पिढी रस्ता भरकटून जिल्ह्यात गुन्हेगारी वाढीस लागेल यात शंकाच नाही.

प्रतिक्रिया व्यक्त करा

thirteen − three =