You are currently viewing धनत्रयोदशी

धनत्रयोदशी

जागतिक मराठी साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका,कवयित्री सौ ज्योत्स्ना तानवडे यांचा दिवाळीचा दुसरा दिवस धनत्रयोदशी निमित्त लिहिलेला अप्रतिम लेख

🪔 दिन दिन दिवाळी 🪔
!! धनत्रयोदशी !!

आज ‘ धनत्रयोदशीचा ‘ दिवस. दिवाळी सणाच्या रुपाने सुखाचे,समाधानाचे,समृद्धीचे जीवन लाभावे अशी कामना प्रत्येकजणच करतो.त्यासाठी समृद्धीची म्हणजे धनाची पूजा केली जाते.आज संध्याकाळी धने,गुळ,पिवळी फुले वाहून धनाची म्हणजे पैशांची पूजा करतात.आणखी एक गोष्ट म्हणजे संपन्न जगण्यासाठी बुद्धी आणि धन जितके महत्त्वाचे तितकेच आरोग्यही महत्त्वाचे असते.म्हणूनच आज आरोग्यदेवतेचे सुद्धा पूजन करतात.
समुद्र मंथनातून निघालेले पाचवे रत्न म्हणजे ‘धन्वंतरी’.याच धन्वंतरीला आरोग्याची देवता मानतात.याच धन्वंतरीची आज पूजा करून उत्तम आरोग्यासाठी, दीर्घायुष्यासाठी तिची प्रार्थना करतात.
याशिवाय आजच्या दिवशी आणखी एक गोष्ट सांगितली आहे;ती म्हणजे अपमृत्यू टाळण्यासाठी यमाला म्हणजे मृत्यूच्या देवतेला दक्षिणेकडे तोंड करून दीपदान करावे.पद्म पुराणानुसार अपमृत्युच्या विनाशा करता आणि यमाच्या सत्कारासाठी दीप लावावेत असे सांगितलेले आहे.
याबाबतची एक आख्यायिका सांगतात. हैमराजाला पुत्रप्राप्ती झाली.त्या पुत्राची कुंडली पाहून ज्योतिषांनी भाकीत केले की, त्याच्या विवाहानंतर चौथ्या दिवशी सर्पदंशाने त्याचा मृत्यू होईल.तो मृत्यू टाळण्यासाठी राजाने शक्य ते सर्व प्रयत्न केले.पण अखेर ज्योतिषाची भविष्यवाणी खरी ठरली.राजाला आणि प्रजेला अतोनात दुःख झाले. हे पाहून यमदूतही व्यथित झाले.त्यांनी यमराजाला प्रार्थना केली की,’असा अपमृत्यू कोणाच्याही वाट्याला येऊ नये’.यमराज गंभीर झाले आणि त्यांनी असा वर दिला की ‘ दिवाळीचे पाच दिवस जे लोक दीपोत्सव करतील त्यांच्या वाट्याला असं दुःख येणार नाही.’
माणूस वृद्धापकाळाने जाणे हा झाला नैसर्गिक मृत्यू.तो कुणालाही चुकलेला नाही आणि चुकविता येतही नाही.पण आजारपणाने,रोगराईने,सर्पदंशाने अवेळी जाणे म्हणजे अपमृत्यू. पूर्वी अशा मृत्यूंचे प्रमाण फार होते.त्यामुळेच असे अपमृत्यू टाळण्यासाठी देवाची प्रार्थना केली जायची.
आज-काल वैद्यक शास्त्र अतिशय प्रगत झालेले आहे.इतरही सोयीसुविधा उपलब्ध आहेत.त्यामुळे अशा मृत्यूंचे प्रमाण खूपच कमी झालेले आहे.पण आज-काल वेगळ्या अपमृत्यूचे प्रमाण वाढलेले आहे.अपघात, घातपात,आत्महत्या,व्यसनाधीनतेमुळे होणारे मृत्यू खूप वाढलेले आहे.हे सर्व अपमृत्यूच आहेत.शिवाय पूर्वी प्लेग,कॉलरा असे आजार होते.तर आता काविळ, डेंग्यू ताप,स्वाईन फ्ल्यू, कोविड-१९ असे आजार आले आहेत.
पण यातल्या बऱ्याच गोष्टी टाळणे तर आपल्याच हातात आहे. या सणांचा हाच मूळ उद्देश असतो. परिसराची जशी स्वच्छता करायची तशीच मनाची सुद्धा करायची.म्हणजे दुरावा विसरून नाती पुन्हा घट्ट करायची.थोडं आत्मचिंतन,थोडं आत्मपरीक्षण करायचं.व्यसनं दूर सारून,अती राग,द्वेष,अतीवेगावर नियंत्रण करून हे अपमृत्यू नक्कीच कमी करता येतील.
आजच्या दिवशी आरोग्याला घातक व्यसनांचा त्याग करून आरोग्यपूर्ण जीवनाचा निश्चयच आपण सगळ्यांनी केला पाहिजे.सगळ्यांनी या मागचा विचार समजून घेतला पाहिजे म्हणजे, या सणांचा आनंद निश्चितच द्विगुणित होणार आहे.म्हणूनच आज दीपदान करायचे.
मुळामध्ये दिवाळी हा दीपोत्सव असल्यामुळे दिवा हा केंद्रस्थानीच असतो.म्हणूनच घराघरांमध्ये आणि सार्वजनिक ठिकाणी विविध प्रकारांनी दिव्यांची आरास केली जाते. सारा आसमंत उजळून जातो.मन आनंदाने, उत्साहाने भरून जाते.
सर्वांना धनत्रयोदशीच्या खूप खूप शुभेच्छा.
शुभ दीपावली. 🙏
ज्योत्स्ना तानवडे.पुणे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

sixteen − five =