भेटसाठी आलेल्या अधिका-यांनाही ग्रामस्थांनी चांगलेच धरले धारेवर..
तळेरे
मुंबई-गोवा महामार्गावरील कणकवली तालुक्यात तळेरे तील वामनराव महाडीक माध्यमिक व उच्च विद्यालय समोरील क्षेत्र चौपदरीकरणाच्या कामामूळे अपघात प्रवण क्षेत्र बनला असून याठिकाणी अनेक भीषण अपघात होण्याची मालिका सुरू आहे. मात्र गंभीर अपघातात सुदैवानी मनुष्यांनी झालेले नाही ही जमेची बाजू आहे. त्याठिकाणी तीन शैक्षणिक संकुलात शिकत असलेल्या हजारो विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन हा त्यांना महामार्गावर पार करावा लागत आहे.या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी महामार्गावर
पादचारी पूल व्हावा या मागणीसाठी तळेरे येथील सामाजिक कार्यकर्ते राजेश जाधव यांनी तळेरे हायस्कूल समोरच राष्ट्रीय महामार्गावर आजपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, पंचायत समिती कणकवली, ग्रामपंचायत तळेरे, रिक्षा संघटना तसेच तळेरे पंचक्रोशी पत्रकार संघ,वामनराव महाडीक माध्यमिक विद्यालय तळेरे स्वीटलँड कॉन्व्हेंट स्कूल, दळवी महाविद्यालय तळेरे आणि तळेरेतील विविध संघटनांनी आणि ग्रामस्थांनी जाहीर पाठिंबा दर्शवला आहे.उपोषण स्थळी जि.प. सदस्य बाळा जठार,डाॅ.मिलींद कुलकर्णी,माजी सभापती दिलीप तळेकर,सरपंच साक्षी सुर्वे,दारुण सरपंच सुनिंद्र सावंत,माजी सरपंच शशांक तळेकर, उल्हास कल्याणकर,निलेश तळेकर,हनुमंत तळेकर, उदय दुदवडकर,संजय खानविलकर,रोहित महाडिक,तळेरे विद्यालयाचे प्राचार्य संभाजी नलगे,तसेच दळवी महाविद्यालयाचा स्टाफ आणि स्विटलॅंड काॅन्वेंन्ट स्कुल तळेरेचे शिक्षक व विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून बेमुदत उपोषणाला पाठिंबा दर्शविला.
जोपर्यंत या पादचारी पुला संदर्भात प्रशासनाकडून ठोस लेखी निर्णय होत नाही, तोपर्यंत उपोषण थांबविले जाणार नाही असा निर्धार उपोषणकर्ते राजेश जाधव यांनी घेतला आहे. दरम्यान आज उपोषणस्थळी राष्ट्रीय महामार्ग उपविभागीय अभियंता एस.एस.शिवनिवार तसेचशाखा अभियंता डी.जी. कुमावत व कनिष्ठ अभियंता श्रीमती.नम्रता पाटील यांनी भेट देऊन उपोषण कर्ते राजेश जाधव यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली पण, गेली तीन वर्ष पाठपुरावा केला जात असतानाही प्रशासन याला कुठे दाद देत नाही ही खंत व्यक्त करीत उपस्थित ग्रामस्थ व लोकप्रतिनिधी आंदोलन मागे घेण्यासाठी विनंती करण्यासाठी आलेल्या अधिकारी वर्गांना चांगलेच धारेवर धरत प्रश्नांची सरबत्ती केली.कोकण आयुक्तांकडे सर्व पुर्ततेसह मागणी पत्राची पोहच असलेल्या पत्राची प्रत आम्हाला दिली जात नाही तोपर्यंत उपोषण मागे घेतले जाणार नाही अशी आक्रमक भूमिका राजेश जाधव आणि ग्रामस्थांनी घेत त्यांना चांगलेच खडेबोल सुनावल्याने अधिकारी वर्गांची चांगलीच पंचाईत झाली.
याप्रसंगी पुलाच्या कामासाठी जादा निधीची तरतूद करण्यासाठी प्रस्ताव सादर केला जाणार असल्याची माहिती खारेपाटण चे उपविभागीय अभियंता एस.एस. शिवनिवार यांनी दिली.