You are currently viewing दिल्लीने गुजरातचा ७७ चेंडू आणि १० गडी राखून केला पराभव

दिल्लीने गुजरातचा ७७ चेंडू आणि १० गडी राखून केला पराभव

*शफालीचा ‘सुपरहिट शो’ २८ चेंडूत ७६ धावा*

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

महिला प्रीमियर लीगच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने शनिवारी अष्टपैलू मारिजाने कॅपची मारक गोलंदाजी आणि शफाली वर्माच्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर गुजरात जायंट्सचा १० गडी आणि ७७ चेंडू राखून पराभव केला. दिल्लीचा स्पर्धेतील चार सामन्यांमधला हा त्याचा तिसरा विजय तर गुजरातचा चार सामन्यांमधला तिसरा पराभव आहे.

या सामन्यात नाणेफेक जिंकून गुजरातने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गुजरात संघाने २० षटकांत ९ गडी गमावून १०५ धावा केल्या. प्रत्युत्तरात दिल्लीने केवळ ७.१ षटकांत एकही गडी न गमावता १०७ धावा केल्या. शफाली वर्माने २८ चेंडूत नाबाद ७६ धावा करून दिल्ली कॅपिटल्सला गुजरात जायंट्सविरुद्ध दणदणीत विजय मिळवून दिला.

शफालीचा सुपरहिट शो प्रेक्षकांना पाहायला मिळाला. तिने अवघ्या १९ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले होते. तिनेने आपल्या खेळीत १० चौकार आणि पाच षटकार मारले. तिचा स्ट्राइक रेट २७१.४३ होता. त्याच्यासोबत डावाची सुरुवात करण्यासाठी आलेल्या कर्णधार मेग लॅनिंगने १५ चेंडूत २१ धावा केल्यानंतर नाबाद राहिली. तिने तीन चौकार मारले.

शफालीच्या झंझावाती खेळीचा अंदाज यावरून लावता येतो की, १०६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीने पॉवरप्लेमध्ये म्हणजे पहिल्या सहा षटकांतच ८७ धावा केल्या होत्या. महिला प्रीमियर लीगमधील पॉवरप्लेमधील संघाने आतापर्यंत केलेली ही सर्वोच्च धावसंख्या आहे.

तत्पूर्वी, गुजरातकडून किम गर्थने सर्वाधिक ३२ धावा केल्या. जॉर्जिया वेरहॅमने २२ आणि हरलीन देओलने २० धावा केल्या. तनुजा कंवरने १३ धावांचे योगदान दिले. या चार फलंदाजांशिवाय दुहेरी आकडा कुणालाही गाठता आला नाही. दिल्लीसाठी मारिजन कॅपने टिच्चून गोलंदाजी केली. तिने पाच विकेट घेतल्या. शिखा पांडेला तीन तर राधा यादवला एक विकेट मिळाली.

मारिजन कॅपला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. तिने १५ धावांमध्ये ५ गडी बाद करत निर्णायक गोलंदाजी केली होती.

मुंबई इंडिअन्स उद्या संध्याकाळी तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या युपी वॉरियर्स विरुद्ध सामना खेळेल. मुंबईने आपली विजयी घोडदौड कायम ठेवल्यास ते प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित करतील. पण, जर वॉरियर्सने मुंबई विरुद्ध मोठा विजय नोंदवला, तर गुणतक्त्यामध्ये अनेक बदल होऊ शकतात.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × 3 =