You are currently viewing तळेरे पंचक्रोशीतील विद्यार्थी हितासाठी सामाजिक कार्यकर्ते राजेश जाधव यांचा २९पासून बेमुदत उपोषणाचा निर्धार

तळेरे पंचक्रोशीतील विद्यार्थी हितासाठी सामाजिक कार्यकर्ते राजेश जाधव यांचा २९पासून बेमुदत उपोषणाचा निर्धार

तळेरे

तळेरे येथे महामार्गालगतच्या शैक्षणिक संकुलादरम्यान विद्यार्थ्यांसाठी पादचारी पुल बांधण्यात यावा या मागणीची पुर्तता न झाल्याने अखेर बेमुदत उपोषण करण्याचा निर्धार सामाजिक कार्यकर्ते राजेश जाधव यांनी केला आहे.त्याकरीता तळेरे येथील वामनराव महाडिक विद्यालय परिसरात दि.२९ ऑक्टोबर रोजी स.१०.३० वाजल्यापासून पासून उपोषण केले जाणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यात मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फा तळेरे हे एक विकसनशील गाव वसलेले आहे.सदर गावात महामार्गाच्या लगत वामनराव महाडिक माध्य.विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, मुंबई विद्यापिठाचे विजयालक्ष्मी दळवी वरिष्ठ महाविद्यालय व स्वीटलॅंड ही इंग्रजी माध्यमाची शाळा अशी शैक्षणिक संकुले आहेत.या शैक्षणिक संकुलांमध्ये तळेरे पंचक्रोशीतील विविध वयोगटातील बहुसंख्य विद्यार्थी शिक्षण घेतात. या विद्यार्थ्यांना सदरच्या शैक्षणिक संकुलांकडे ये – जा करण्यासाठी महामार्गालगत पायी चालत तसेच महामार्ग ओलांडून ये – जा करावी लागते.
सद्यस्थितीत महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे महामार्गाची रुंदी वाढलेली असून त्यावरील वाहतूक देखील मोठ्या प्रमाणावरील व अतिशय वेगवान अशी सुरू झाली आहे. तळेरे येथील महामार्गालगतच्या शैक्षणिक संकुलांच्या दरम्यान महामार्गाला दोन्ही बाजूने तीव्र उतार असून यापुर्वी अनेकवेळा येथे वाहन अपघात घडलेले आहेत.नुकतेच अलिकडील काळातील एक उदाहरण म्हणजे. दि.१४ ऑक्टोबर रोजी स्कॉर्पिओ कार महामार्गाच्या एका बाजूने दुभाजक पार करून दुस-या बाजूस विरुध्द दिशेने जात वामनराव महाडिक विद्यालयाच्या प्रवेशद्वारावर जोरदार धडकून अपघात घडला. तसेच दुसरा अपघात दि.१६ ऑक्टोबर रोजी एक स्विफ्ट कार महामार्गाच्या लगत वामनराव महाडिक विद्यालयाच्या प्रवेशद्वारानजिक असलेल्या खड्ड्यात कोसळून अपघात घडला.या दोन्ही अपघातात अपघातग्रस्त वाहनांतील व्यक्ती या जखमी होऊन अपघातग्रस्त वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.सुदैवानेच या दोन्ही अपघात समयी शैक्षणिक संकुलांमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी अपघातस्थळी उपस्थित नसल्याने त्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत मोठा अनर्थ टळला.
परंतू अशा परिस्थितीत महामार्गावर अपघात झाल्यास, सदरच्या शैक्षणिक संकुलांकडे पायी ये – जा करणा-या विद्यार्थ्यांच्या जिवितास धोका निर्माण झाला आहे. तसेच यामुळे तळेरे येथील महामार्गालगतच्या शैक्षणिक संकुलांच्या दरम्यानचे क्षेत्र हे अपघात प्रवण क्षेत्र असल्याचे संबंधीत शासन आणि प्रशासनासह सर्वांनीच गांभिर्यपुर्वक लक्षात घेणे अत्यंत गरजेचे आहे.तरी देखील महामार्गाच्या चौपदरीकरण कामकाजाची कार्यवाही सुरु झाल्यापासून आजतागायत संबंधीत शासन आणि प्रशासनाकडून याबाबतीत तळेरे येथील महामार्गालगतच्या शैक्षणिक संकुलांच्या दरम्यान कोणतीही सुरक्षिततेची उपायोजना व त्याबाबतची विशेष तरतूद करण्यात आलेली नाही.

याच अनुषंगाने पुर्वविचार करून राजेश जाधव यांनी महामार्गाच्या चौपदरीकरणाचे कामकाज सुरु असतानाच दि. ५/१/२०२० रोजी महाराष्ट्र शासनाच्या ‘आपले सरकार’ या वेब पोर्टलवर ऑनलाईन पध्दतीने तळेरे येथील महामार्गालगतच्या शैक्षणिक संकुलांच्या दरम्यानची सविस्तर वस्तुस्थिती व समस्या मांडून, “सदरच्या शैक्षणिक संकुलांच्या दरम्यान पायी ये – जा करणा-या विद्यार्थ्यांना महामार्ग सहज, सुलभ व सुरक्षितपणे ओलांडता यावा याकरीता महामार्गावर पादचारी पुल अथवा आंतरमार्गाची निर्मीती करण्यात यावी व त्याकरीता त्वरीत आवश्यक ती पहाणी करून योग्य कार्यवाही करणेबाबत” केंद्र शासनास व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणास महाराष्ट्र शासनामार्फत प्रस्ताव पाठविणेत यावा अशी मागणी केलेली आहे. तशी जन मागणी देखील असून त्याबाबत स्थानिक ग्रामसभांचे ठराव देखील उपलब्ध आहेत.

परंतू सदरच्या मागणीबाबत संबंधीत शासन आणि प्रशासनाने दि. ५/१/२०२० पासून सुमारे दिडवर्षांपेक्षा जास्त कालावधीनंतर म्हणजेच अत्यंत विलंबाने आपला प्रतिसाद दर्शविला.जरी असे असले तरी सदरचा प्रतिसाद निव्वळ कागदोपत्री असून प्रत्यक्षात वस्तुस्थिती व समस्येबाबत कोणतीही प्रत्यक्ष जागेवर पहाणी करून त्याबाबत ठोस अशी नियमोचित कार्यवाही संबंधीत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून आजतागायत करण्यात आलेली नाही.तसेच तळेरे येथे महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या संबंधीत अनेक समस्या असून त्यांचे देखील निराकरण संबंधीत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून आजतागायत करण्यात आलेले नाही.

या सर्वांबाबत राजेश जाधव यांनी संबंधीत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या जबाबदार अधिकारी / कर्मचारी यांचेशी संपर्क साधून चर्चा – विनिमय करण्याचा प्रयत्न केला असता, “संबंधितांकडून माहिती देण्यास टाळाटाळ करणे, उडवा – उडवीची उत्तरे देणे, चुकीची माहिती देणे, वेळ मारून काम पुढे ढकलणे, प्रत्यक्ष जागेवर येऊन समस्यांबाबत पहाणी व शहानिशा न करणे, सर्वसामान्य नागरिकांच्या सुचना व समस्या समजून घेत त्याबाबत आपल्या कार्य-कर्तव्य आणि जबाबदारी यांचे पालन करून आवश्यक ती नियमोचित कार्यवाही न करता ‘व्हि.आय. पी.’ व्यक्तींच्या शिफारसी आणण्याचा सर्वसामान्य नागरिकांस फुकटचा सल्ला देणे इ.” प्रकार वारंवार घडलेले आहेत.

उपरोक्त सर्व परिस्थिती विचारात घेता भविष्यात तळेरे येथील महामार्गालगतच्या शैक्षणिक संकुलांकडे पायी ये – जा करणा-या विद्यार्थ्यांच्या बाबतीत महामार्गालगत पायी चालत असताना अथवा महामार्ग ओलांडताना कोणतीही वाहन अपघात अथवा दुर्घटना घडल्यास व त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जिविताच्या बाबतीत कोणताही धोका उत्पन्न झाल्यास, असे होऊ नये म्हणून संबंधीत राष्ट्रीय महामार्ग जिल्हा महामार्ग प्राधिकरणाने पुढील संपुर्ण जबाबदारी स्विकारावी लागेल असा इशारा राजेश जाधव यांनी दिला असून ते शक्य नसल्यास तळेरे येथील महामार्गालगतच्या शैक्षणिक संकुलांकडे ये – जा करताना विद्यार्थ्यांना महामार्ग सहज, सुलभ व सुरक्षितपणे पायी ओलांडता यावा, तसेच महामार्गालगत सुरक्षितपणे चालता यावे, याकरीता सदरच्या शैक्षणिक संकुलांदरम्यान महामार्गावर सुरक्षित व भक्कम असा पादचारी पुल बांधणे, महामार्गालगत दुतर्फा सर्विस रोड अथवा पादचारी पथ तयार करणे, या तयार केलेल्या सर्विस रोड अथवा पादचारी पथ व महामार्ग यांच्या सिमेवर मजबूत व भक्कम असे बॅरिकेट्स उभारणे इ. सुरक्षिततेच्या सर्वतोपरी उपायोजना संबंधीत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने कराव्यात. तसेच त्याकरीता आवश्यक ते प्रस्ताव तात्काळ व विनाविलंब तयार करून ते मंजुरीसाठी वरिष्ठ स्तरावर पाठविण्यात यावेत व त्यांची कागदोपत्री प्रत मिळावी अशी मागणी राजेश जाधव यांनी केली आहे.

जोपर्यंत मागणी पुर्ण होत नाही, तोपर्यंत दि . २९/१०/२०२१ रोजी सकाळी १०.३० वाजल्यापासून तळेरे येथील वामनराव महाडिक माध्य. विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय शैक्षणिक संकुलादरम्यान लोकशाही व शांततामय मार्गाने बेमुदत उपोषण करण्याचा निर्धार राजेश जाधव यांनी केला आहे व तशी आगाऊ नोटीस संबंधित उप अभियंता, राष्ट्रीय महामार्ग उपविभाग खारेपाटण यांना लेखी स्वरुपात देण्यात आलेली आहे. तसेच त्याबाबतच्या प्रती मुख्यमंत्री- उध्दव ठाकरे, जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग, पोलीस अधिक्षक, सिंधुदुर्ग, पोलीस निरिक्षक कणकवली , सरपंच तळेरे यांना सादर करण्यात आलेल्या आहेत.

फोटो-: राजेश जाधव

प्रतिक्रिया व्यक्त करा