You are currently viewing सामाजिक चातुर्मासाचे १४ वे पुष्प संपन्न

सामाजिक चातुर्मासाचे १४ वे पुष्प संपन्न

वैभववाडी

ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्या वतीने ऑनलाईन सामाजिक चातुर्मास-२०२१ अंतर्गत बौद्धिक प्रबोधनपर व्याख्यानमालेचे १४ वे पुष्प रविवार दिनांक २४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेचार ते साडेसहा या वेळेमध्ये संपन्न झाले.
ग्राहक पंचायत महाराष्ट्र-कोकण विभाग, मुंबई-ठाणे जिल्हा आयोजित सामाजिक चातुर्मास-२०२१ अंतर्गत बौद्धिक प्रबोधनपर व्याख्यानमालेचे १४ वे पुष्प संस्थेचे राज्य सदस्य व कोकण विभाग अध्यक्ष प्रा.श्री.एस.एन.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. या कार्यक्रमाला शासकीय अधिकारी तथा प्रमुख अतिथी म्हणून कक्ष अधिकारी, मंत्रालय मुंबईचे संतोष ममदापुरे यांनी “महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम-२०१५” या विषयावर मार्गदर्शन केले. राज्य व केंद्र सरकारने सर्व नागरिकांना सहज सुलभ सेवा मिळावी यासाठी हा अधिनियम पारित केला. या अंतर्गत ४८६ सेवा आधीसूचित आहेत. त्यामध्ये गृहविभाग, परिवहन, महसूल, वनविभाग, नगरविकास, ग्रामविकास, अन्न व नागरी सेवा, महिला व बालकल्याण, ऊर्जा विभाग, शालेय शिक्षण विभाग यामध्ये मिळणाऱ्या विविध सेवांची सविस्तर माहिती दिली. सर्व नागरिकांनी आपले सरकार पोर्टल वर जाऊन या कायद्याची माहिती करून विविध योजना, सुविधा यांचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री. संतोष ममदापुरे यांनी केले.
तसेच या कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या मुंबईच्या सामाजिक कार्यकर्त्या मा.वर्षा विद्या विलास यांनी “भारतीय संविधानातील ७४ वी घटनादुरुस्ती महानगरपालिका, नगरपरिषद व नगरपंचायत स्तरावर लोकसहभाग” या विषयावर मार्गदर्शन केले. १९९२ साली झालेल्या घटनादुरुस्तीने सर्वसामान्य जनतेला, नागरिकांना बरेच हक्क प्राप्त झालेले आहेत. ७३ वी घटना दुरुस्ती ग्रामीण भागासाठी असून ७४ वी घटना दुरुस्ती शहरी भागासाठी आहे. स्वराज्य ही संकल्पना खऱ्या अर्थाने समानता, सत्तेचे विकेंद्रीकरण आणि सहकार या तीन तत्वांशी संबंधित आहे. स्वराज्य प्रस्थापित करण्यासाठी निर्णय प्रक्रियेमध्ये शेवटच्या घटकाचा सहभाग वाढला पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने या घटना दुरुस्तीचे फलित झाले असे म्हणता येईल.सर्वसामान्य नागरिक हा देशाचा मालक असून तो सर्वश्रेष्ठ आहे. प्रत्येकानी आपले हक्क, अधिकार आणि कर्तव्ये यांची जाणीव करुन घेतली पाहिजे. ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेने सामाजिक चातुर्मास प्रबोधन व्याख्यानमालेच्या माध्यमातून केली जाणारी जनजागृती ही खूप मोठी देशसेवा आहे असे सांगून प्रमुख वस्त्या मा.वर्षा विद्या विलास यांनी संस्थेच्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.
ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्यावतीने सामाजिक चातुर्मास-२०२१ च्या अनुषंगाने प्रबोधन व्याख्यानमालेचे आयोजन केले जाते. शासकीय अधिकारी आणि सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींना आमंत्रित करून शासकीय आणि सामाजिक क्षेत्रातील विविध गोष्टींची माहिती जनतेपर्यंत पोचवून जनजागृतीचे कार्य केले जात आहे. ‘शिवभावे जीवसेवा’ हा स्वामी विवेकानंदांचा उपदेश ग्राहक चळवळीचा मूलमंत्र आहे. ग्राहकतीर्थ स्व. बिंदुमाधव जोशी यांनी भारतीय शास्त्रग्रंथांवर ग्राहक पंचायतीच्या तत्त्वांचे बीजारोपण केले. सेवा आणि वस्तू रास्त भावात मिळावी, अनुचित व्यापारी प्रथा संपावी आणि शोषणमुक्त समाजाची मांदियाळी निर्माण व्हावी, ही भावना संघटनेच्या कार्यामागे आहे. ग्राहक चळवळीच्या कार्यकर्त्यांनी या तत्त्वांना बांधित राहून काम केले पाहिजे असे अध्यक्षीय भाषणात राज्य सदस्य व कोकण विभाग अध्यक्ष प्रा.श्री.एस.एन‌.पाटील यांनी सांगितले.
कार्यक्रमाची सुरुवात ग्राहक चळवळीचे अधिष्ठान स्वामी विवेकानंद, ग्राहक चळवळीचे प्रणेते ग्राहकतीर्थ स्व. बिंदुमाधव जोशी आणि सामाजिक चातुर्मासाचे दैवत लक्ष्मीनारायण यांचे प्रतिमा पूजन व दिपप्रज्वलन राज्य सचिव अरुण वाघमारे यांनी केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कोकण विभागाचे सदस्य श्री.नंदकिशोर साळसकर यांनी केले. सौ. वैशाली रुगे यांनी “साधना का पथ कठीन है” हे ग्राहकगीत व शेवटी पसायदान सादर केले. प्रमुख अतिथी मा.संतोष ममदापुरे यांची ओळख श्री.अविनाश रुगे यांनी करून दिली तर प्रमुख वक्त्या मा.वर्षा विद्या विलास यांची ओळख श्रीम.स्मिता कवडे यांनी करून दिली. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.प्रणिता वैराळ यांनी केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे ऑनलाईन प्रक्षेपण युट्यूब आणि फेसबुकच्या माध्यमातून श्री.महेश चावला यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री.दिनेश बेरीशेट्टी यांनी माडले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मुंबई-ठाणे जिल्ह्यासह कोकण विभागातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

sixteen + 12 =