You are currently viewing धनगर समाजाचा दसरा सण….

धनगर समाजाचा दसरा सण….

_*धनगर समाजाचा दसरा सण….*_
_*होई बेल भंडाऱ्याची उधळण….*_
_*हर्षभरीत होई मन….*_
_*जपून ठेविले संस्कृतीचे जतन…*_
धनगर समाजाच्या दसरा सणाला अनन्यसाधारण महत्व आहे.विविध आख्यायिका तसेच कला परंपरांनी नटलेल्या या सणाला एक वेगळेच महत्व प्राप्त झाले आहे.परंपरागत दसरा सण सर्वत्र विविध प्रकारच्या रूढी परंपरा जपून आजही मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.लोककला व लोकनृत्यांच्या सादरीकरणातून आजही पारंपारिक संस्कृतीचा वारसा जपला जात आहे. डोंगरकपारी, दऱ्या-खोऱ्यात राहणारे धनगर बांधव दसरा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील,कुडाळ तालुक्यातील *पोखरण-कुसबे* गावातही दसरोत्सव उत्साहात साजरा केला जातो.
नवरात्रीमध्ये अखंड नऊ दिवस देवपूजा करून कुलदेवतेजवळ तसेच ग्रामदेवतेजवळ गजानृत्य सादर करतात.गजानृत्य या लोककलेमध्ये समाजबांधव एकसारखी वेशभूषा परिधान करून अंगात झगा, डोक्यावर पागोटे, कमरेला उपरणी, पायात वाक्या असा साज परिधान करून ढोल-थाळ्याच्या लयबद्ध नादात गजानृत्य सादर केले जाते. प्रथम विठोबा बिरोबाच्या नावानं चांगभलं. म्हालच्या पांढरीच्या नावानं चांगभलं,सर्वांच्या कुलदेवतांची नावं घेऊन..चांगभलं…हार हार चांगभलं…. असा गजर करत नृत्य केले जाते.
काही समाजबधवांचे नवरात्रीच्या आठव्या दिवशी जागरी देव बसतात.यावेळी देवतांचे पूजन करून प्रत्येकाच्या घरी नारळाची तोरणे बांधण्याची प्रथा आहे.गजानृत्य करून रात्रभर जागर केला जातो. नवव्या दिवशी प्रत्येकाच्या घरी नवं करण्याची प्रथा आहे.(दारावर भात कुरडू,आंब्याचे टहाळ यांचे तोरण बांधणे) शेतीच्या हत्यारांची अवजारांची पूजा केली जाते.संध्याकाळी सुरुवात करून रात्रभर घरोघरी दुडगे घेतले जातात. दहाव्या दिवशी पोखरण-कुसबे गावातील देहावसन(मृत्युमुखी पडलेले) झालेल्या पूर्वजांचे इसावे ज्या ठिकाणी आहेत तेथे घरातील सर्वजण जाऊन पूजा करतात.गूळ, खीर, भाताचा नैवेद्य दाखविला जातो.
दुपारनंतर पोखरण धनगर समाजाचा मांड भरला गेला. घोंगडीची घडी घालून,दहा दुधाचा किंवा पाण्याचा दुडगा भरून,नारळाची मांडणी करून, नैवैद्य दाखवून पूजा करून मांड भरला जातो.नवस फेडणे, नवस बोलणे यासाठी गाऱ्हाणी करण्यात आली.त्यानंतर गजानृत्य सादर करण्यात आले.आलेल्या सर्व आप्तेष्टांना, मित्र परिवाराला खोबऱ्याचा प्रसाद देण्यात आला. शिवाय सर्वाना दुध व लाडू वाटपही करण्यात आले.रात्री तोरणे उतरण्यात आली.
घटस्थापनेपासून ११व्या दिवशी म्हणजेच रविवारी येडगे घराण्याचा कडाकणा(शिलांगण) हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमास आजूबाजूच्या पंचक्रोशीतील आप्तेष्ट, मित्रमंडळी, समाजबांधव देखील उपस्थित होते. सकाळच्या सत्रात आमंत्रित गजा मंडळांना ओवाळून घेण्याची(पवा ओवाळणे)प्रथा आहे. त्यानंतर गजानृत्ये झाली.


दुपारी १२नंतर सोनं लुटणे(देवांची लग्ने) हा आगळावेगळा सोहळा पार पडला.हा सोहळा पाहण्यास अनेक बांधव उपस्थित होते.एकमेकांना सोनं देऊन आपल्यातील स्नेह असेच जपून ठेवूया असे सांगून गळाभेटी झाल्या. त्यानंतर नवस फेडणे, नवीन नवस करणे गाऱ्हाण्याचा कार्यक्रम झाला. उपस्थित सर्व आप्तेष्ट, मित्रपरिवाला येडगे परिवाराच्या वतीने महाप्रसादाची(भोजन) व्यवस्था करण्यात आली होती. शेवटी तोरण उतरून आणि कडाकण्याचा प्रसाद बनवून सर्व समाजबांधवांना देण्यात आला. अशाप्रकारे पोखरण-कुसबे मध्ये गावर्षीचा दसरा सण मोठ्या उत्साहात पार पडला.

✍🏻 *शब्दांकन*✍🏻
दिपक येडगे
कुसबे,ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग.
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

प्रतिक्रिया व्यक्त करा

18 − 6 =