You are currently viewing नवरंगोत्सव

नवरंगोत्सव

जागतिक मराठी “साहित्य कला व्यक्ती” विकास मंचच्या सदस्या, विविध पुरस्कार प्राप्त जेष्ठ कवयित्री सौ.ज्योत्स्ना तानवडे यांची काव्यरचना

नवरात्रीची पहिली माळ
चंद्रघटेचा करडा शालू
असुरशक्तींचा नाश करी
माऊलीस श्रद्धा पुष्पे घालू !!

नवरात्रीची दुसरी माळ
ब्रह्मचारिणीचा शालू केशरी
ज्ञान दे, शांती दे,सर्वकाळी
अज्ञान तमासी दूर करी !!

नवरात्रीची तिसरी माळ
चंद्रघटेचा शालू पांढरा
निर्मळ पवित्र शांती देई
प्रार्थनेने उजळे गाभारा !!

नवरात्रीची चवथी माळ
कुष्मांडा नेसली शालू लाल
शौर्य शक्तीचे प्रतिक हेचि
अंगी संचरे शक्ती जहाल !!

नवरात्रीची पाचवी माळ
स्कंदमातेची पैठणी निळी
शक्ती ऊर्जेचा निळा रंग हा
शौर्य तेज लखलखे भाळी !!

नवरात्रीची सहावी माळ
कात्यायनीचा शालू पिवळा
आनंद,उत्साह,ओजस्विता
ओसंडे,लाभे मोद आगळा !!

नवरात्रीची सातवी माळ
कालरात्रीला शालू हिरवा
सृजनता,निसर्ग समृध्दीचे
वरदान देई आई शिवा !!

नवरात्रीची आठवी माळ
महागौरीचा शालू मोरपिशी
शांत उत्साही प्रसन्नतेने
मने भक्तीत रमावी तशी !!

नवरात्रीची नववी माळ
सिध्दिदात्रीचा शालू जांभळा
आत्मशक्तीचा बोध घेऊनी
ध्येय,जिद्दीला देई उजाळा !!

नऊ रंगांचा उत्सव देई
विविध गुणांचा बोध मना
सद्गुण अंगी बाणविता
लाभे परम सौख्य या मना !!

ज्योत्स्ना तानवडे.
पुणे.५८

प्रतिक्रिया व्यक्त करा

15 − 5 =