You are currently viewing बकुळी

बकुळी

*बकुळी*

रूप मोहक नसतंच तुझं,
नाजूक पाकळ्यांचा डोलारा.
सोनेरी त्या छटा तुजवरी,
नुसताच झाडाखाली पसारा.

फिक्कट पिवळा दुधाळ,
रंग तरी कसा सांगावा.
रूप गोजिरे नसले तरी,
सुगंध तुझ्यासम मागावा.

सकाळच्या सोनेरी किरणांशी,
मस्ती तुझी सुरूच असते.
भ्रमर बसता, रस शोषता,
उखडून तू धरणीवर सांडते.

ओंजळीत तुज घेताच,
गंध हातांच्या बोटांशी खेळतो.
झुळूक वाऱ्याची येताच,
गंध हलकेच हवेत पसरतो.

खणात ठेवा अथवा पुस्तकात,
सुगंध तुझा चिरकाल टिकतो.
सुकल्यावरती रंग बदलतो,
तरीही गंध मन मोहून टाकतो.

इवलासा तो जीव तुझा,
खूप काही शिकवून जातो.
जाताना तो एकटाच असतो,
आपल्यासोबत कुठे काय नेतो…

(दिपी)✒️
दीपक पटेकर
८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा

fourteen − 13 =