You are currently viewing कोकण रेल्वे स्थानकावर विनामास्क दिसल्यास 500 रुपये दंड

कोकण रेल्वे स्थानकावर विनामास्क दिसल्यास 500 रुपये दंड

रेल्वे मंत्रालयाने गुरुवारी कोविड संबंधित मार्गदर्शक तत्त्वे सहा महिन्यांसाठी वाढवली असून कोकण रेल्वे स्थानकावर प्रवाशांनी या मार्गदर्शक तत्त्वांचे योग्यरीत्या पालन करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.

विनामास्क (Mask) कोकण रेल्वे स्थानक परिसर तसेच रेलगाडीतून प्रवास करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत असून भारतीय रेल्वेने दिलेल्या आदेशानुसार आता मास्कचा वापर न करणाऱ्यांना 500 रुपये दंड देण्यात येणार आहे, अशी माहिती कोकण रेल्वेचे ज्येष्ठ जनसंपर्क अधिकारी बबन घाटगे यांनी दिली.

कोरोनाची दुसरी लाट (Covid-19) ओसरत चालली असून कोरोना रुग्णांची संख्याही कमी झालेली दिसून येत आहे. अशामध्ये रेल्वे मंत्रालयाने कोरोनाला रोखण्यासाठी एक महत्वपूर्ण निर्णय घेतला असून प्रवाशांची सुरक्षा लक्षात घेता रेल्वे मंत्रालयाने कोविड- 19ची मार्गदर्शक तत्त्वे सहा महिने किंवा पुढील आदेशापर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे परिसर तसेच ट्रेनमध्ये मास्क न घातल्यास 500 रुपयांपर्यंत दंड आकारला जाणार असल्याचे भारतीय रेल्वेने स्पष्ट केले असून रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी मास्कचा वापर करणे आवश्यक आहे. कोकण रेल्वे स्थानकावर विनामास्क फिरणाऱ्यावर तसेच ट्रेनमधून प्रवास करणाऱ्यांवर गोवा पोलिस तसेच रेल्वे पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे, असे बबन घाटगे यांनी सांगितले.

दोन डोस झालेल्यांना प्रवासाची मुभा

सणासुदीच्या काळात रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. ज्या प्रवाशांचे कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस पूर्ण झाले आहेत अशांना रेल्वे प्रवास करण्याची मुभा सरकारने दिली आहे. रेल्वे परिसर आणि गाड्यांमध्ये मास्क न घातलेल्यांना 500 रुपये दंड आकारला जाणार आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांनी आपल्या आरोग्याची काळजी घेत कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्कचा वापर करावा, असे आवाहन बबन घाटगे यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 − 7 =