You are currently viewing “भय इथले संपत नाही”
  • Post category:लेख
  • Post comments:0 Comments

“भय इथले संपत नाही”

जागतिक मराठी साहित्य कला व्यक्ती विकास मंच सदस्य प्रसिद्ध स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र तज्ञ डॉ.विशाल शेटे यांचा अप्रतिम लेख

डॉ .विशाल शेटे
MBBS,DNB
स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र तज्ञ
9031000794

दिवस नेमका आठवत नाहीये …पण वेळ रात्रीच्या दोन वाजेच्या आसपासची असावी ..लेबर रूम मध्ये पहिल्यांदाच गरोदर असलेली साधारण 21-22 वर्षाची एक पेशंट प्रसूतीसाठी ऍडमिट झालेली होती… साधारण दुपारी दोन-तीन वाजल्यापासून तिला कळा येत होत्या परंतु वाहनाची सोय न झाल्यामुळे तिला इतक्या रात्री प्रसूतीसाठी हॉस्पिटलमध्ये आणले होते… मी जाऊन पेशंट चा बीपी ,बाळाचे ठोके तपासले आणि अंतर्गत तपासणी केली असता बाळाचे डोके एकदम खाली आलेले दिसले… परंतु पेशंट थकलेली होती आणि अति थकव्यामुळे तिला कळा घेणे अशक्य होत होते …त्यामुळे व्याक्युम च्या सहाय्याने डिलिव्हरी करायचा निर्णय घेतला गेला पेशंटला व्याक्युम चा कप लावून प्रसूती कळे सोबत बाळाला व्यवस्थित बाहेर काढण्यामध्ये मी आणि आमची टीम एव्हाना यशस्वी झालेलो होतो…. मनावरचा तान थोडा हलका झाला होता .. स्टाफला ऑक्सिटोसिन, मीथार्जिन इंजेक्शन द्यायला सांगून मी वार(placenta) काढायला सुरुवात केली …जास्त वेळ न जाता वारही व्यवस्थित निघाली …मी टाके घ्यायला सुरुवात करणार तितक्यात पेशंटच्या योनीमार्गातून अति प्रमाणात एकदम नळाची धार लागावी असा रक्तस्त्राव सुरू झाला…. पोटावरून गर्भपिशवी चाचपून पाहिली असता गर्भपिशवी एकदम ढील्ली जाणवली क्षणात हा ‘अटोनिक पीपीएच’atonic PPH( प्रसूतीनंतर गर्भपिशवी आकुंचन न पावणे) ची केस असल्याचे मी ओळखले …स्त्रीरोग तज्ञाच्या आयुष्यातलं सुरुवातीपासून ते आतापर्यंत सगळ्यात मोठं आव्हान म्हणजे पीपीएच ची केस व्यवस्थित मॅनेज करणे…. तालुक्याच्या ठिकाणी जेथे रक्तपेढी नाही गरज भासली तर वेळेवर उपलब्ध राहण्यासाठी भुलीचे डॉक्टर नाहीत अशा ठिकाणी मी माझ्या नवख्या स्टाफ नर्स आणि मावशी सोबत ‘पीपीएच’ मॅनेज करणार होतो …परिस्थितीचं गांभीर्य ओळखलं आणि पटापट कंपाउंडर ला लॅब टेक्निशियन ला आणि फार्मासिस्ट ला फोन करून तातडीने हॉस्पिटल ला बोलावलं …रक्तस्त्राव एव्हाना वाढला होता …सिस्टरन पटापट पुन्हा एकदा ऑक्सिटोसिन , मीथार्जिन , प्रोस्टोडीन इंजेक्शन द्यायला लावले …मी खाली बसून गर्भपिशवीला मसाज देत होतो पण रक्त स्त्राव काही थांबण्याचे नाव घेत नव्हता …एव्हाना सर्वजण येऊन पोचले होते CARBETOCIN इंजेक्शन ही पेशंटला दिले गेले होते… शेवटचा पर्याय म्हणून मी गर्भपिशवी मध्ये पीपीएच कॅंनुला(PPH cannula) टाकला होता आणि तो सक्षन मशीन ला जोडला होता परंतु सक्शन पाइप मधून धार लागावी असे रक्त बाटलीमध्ये जमा होत होते…. क्षणाक्षणाला आमचा तणाव वाढत होता एव्हाना पेशंटच्या नातेवाईकाला याची कल्पना दिली गेली होती आणि रक्तपेढीमध्ये रक्त आणण्यासाठी पाठवले गेले होते …शक्य होईल तेवढा सगळा प्रयत्न चालू होता… एवढ्यात रक्तपेढीतून फोन आला की पेशंटच्या रक्तगटाची एकही रक्ताची पिशवी शिल्लक नाहीये …माझ्या पायाखालून फक्त जमीन सरकारचे बाकी होते कारण…पुढे रक्त आणायला पाठवायचं म्हणजे सत्तर ऐंशी किलोमीटर जाणे आणि येणे एकंदरीत तीन तासांचा वेळ लागणार होता ..रक्तस्त्राव अजूनही चालू होता … एक लिटर पेक्षा जास्त रक्त आतापर्यंत सक्शन मशीनच्या बॉटलमध्ये जमा झालं होतं… रक्तस्त्राव रोखायचा असेल तर लवकरात लवकर पेशंटला ऑपरेशन थेटर मध्ये घेऊन लँपरोटोमी करूनरक्तवाहिन्या बांधून किंवा शेवटचा पर्याय म्हणजे गर्भपिशवी काढून हा रक्तस्त्राव रोखता येणार होता… डोक्यामध्ये मुंग्या आल्यासारखे वाटायला लागलं होतं त्यातच आमच्या नेहमीच्या भुलीचा डॉक्टरांना फोन लावला तर ते कुठेतरी बाहेरगावी गेल्याचं समजलं म्हणून दुसऱ्या डॉक्टरांना फोन लावला ते एका केस मध्ये बिझी होते आणि त्यांना साधारण दोन ते तीन तास लागणार होते रक्तस्त्राव अजूनही चालू होता… तितक्यात सिस्टर म्हणाल्या सर पेशंटचा बीपी 80/60 झाला आहे आणि पल्स रेट 135 आहे… वेळ जाईन तशी पेशंटची प्रकृती बिघडत होती…अशा कंडिशन मध्ये पेशंट पुढे शिफ्ट करणे म्हणजे पेशंटला मृत्युच्या दाढेत आपण होऊन ढकलंल्यासारखे होते …समोर काहीच मार्ग दिसत नव्हता रक्तस्त्राव चालूच होता …एव्हाना पेशंट चक्कर येते आणि डोळ्यापुढे अंधारी येते असे म्हणायला लागले होते… रक्त आणि भुलीचे डॉक्टर येण्याची आशा केव्हाच संपुष्टात आली होती।.. माझ्या शरीरातून पूर्ण त्राण निघून जाते आणि मी जमिनीवर कोसळतोय की काय काय असं वाटत होतं …सगळी लेबर रूम माझ्या भोवती गोल फिरल्याचं मला जाणवत होतं …माझ्या हृदयाचे ठोके धाड धाड धाड करत मलाच ऐकू यायला लागले होते…. इतक्यात सिस्टर जोरात ओरडल्या सर पेशंट पहा कशी करतेय…..

.आणि तेवढ्यात
.
.
.
.
.
.
.
.
.
.
मला जाग आली दोन क्षण इकडे तिकडे पाहिलं मोठा श्वास घेतला आणि डोळे व्यवस्थित उघडून पाहिले घड्याळात रात्रीचे चार वाजले होते मी माझ्या बेडरूम मध्ये बेडवर उठून बसलो होतो शेजारी माझी अडीच वर्षाची ओवी निरागस पणे पत्नीच्या गळ्याला मिठी मारून निश्चित पणे झोपली होती … मी आठवून पाहिले दुपारपासून हॉस्पिटलला एकही पेशंट डिलिव्हरी साठी आलेला नव्हता तसेच सध्याच्या घडीला एकही पेशंट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट ही नव्हता…. वरचा प्रसंग हे एक स्वप्न होते हे समजायला मला काही क्षण जाऊ द्यावे लागले भानावर आलो तेव्हा लक्षात आलं शरीर पूर्ण घामाने डबडबले होते आणि हृदयाचे ठोके माझे मलाच जाणवत होते पण त्यातही एक समाधानाची गोष्ट म्हणजे ते सारं एक फक्त स्वप्न होतं हे आता समजुन चुकले होते …
कुठल्याही प्रकारचा ताणतणाव ,टेन्शन ,जबाबदारी नसल्याने एकदम निवांत झोपलेल्या लेकीकडे पाहून मनातल्या मनात हसलो आणि तिच्या मुलायम केसातून हात फिरवून पाणी प्यायला किचनमध्ये गेलो …घटाघटा दोन तीन ग्लास पाणी पिल्यानंतर जरासं हायसं वाटलं ….पुन्हा स्वप्न पडेल या भीतीने झोपायची हिम्मत होत नव्हती म्हणून हॉलमध्ये सोफ्या वरती निवांत बसून विचार करू लागलो………….

स्त्री रोग तज्ञा चं आयुष्य ….लोकांना फक्त त्यांनी घेतलेली फी, घेतलेले पैसे दिसतात परंतु ते कमावताना करावे लागलेले कष्ट, या प्रक्रियेतून जाताना मनावरती असलेला ताणतणाव आणि त्या ताणतणावाचा एकंदरीत वैयक्तिक आयुष्यावर ,आरोग्यावर होणारा परिणाम याची जाणीव फक्त आणि फक्त त्या डॉक्टरला आणि त्याच्या कुटुंबियांना असते… जोपर्यंत सगळं चांगलं असतं तोपर्यंत तुम्हाला देवाचे स्थान असतं परंतु तुमच्या हातात नसलेल्या काही गोष्टी घडल्या तर दुसरा क्षणला तुम्ही गुन्हेगार असता…
रोज नवीन पेशंट, नवीन आव्हाने पेशंट मॅनेजमेंट करताना झालेले कॉम्प्लिकेशन्स ते कॉम्प्लिकेशन्स मॅनेज करताना झालेली धावपळ आणि एकंदरीत साऱ्याच गोष्टींनी शरीरात वाढलेले अड्रेनालीन आणि त्याचा परिणाम म्हणून पस्तिशीच्या वयामध्ये होणारे निद्रानाश ,हायपर टेन्शन ,डायबिटीस आणि इतर बरेच व्याधी या तसं पाहिलं तर डॉक्टरांना त्यांच्या व्यवसायातून मिळालेले बायप्रॉडक्टच असतात …..
कोणत्याच डॉक्टरला कधीच आपल्या पेशंटच्या बाबतीत काही वाईट व्हावं असं कधीच वाटत नसतं आणि त्याचे शंभर टक्के प्रयत्न हे पेशंट हसत-खेळत घरी जावा यासाठी असतात…. परंतु दुर्दैवानं काही गोष्टी ह्या केवळ आणि केवळ दैवाच्या हाती असतात आणि तिथं डॉक्टरांचे सर्वच पर्याय थकलेले असतात ….परंतु अशा वेळेस नातेवाईक मात्र डॉक्टर सुद्धा आपल्यासारखाच एक माणूस आहे ही गोष्ट विसरतात आणि मग हमरीतुमरीवर येणे, डॉक्टरला मारहाण करणे ,हॉस्पिटलमध्ये तोडफोड करणे या सगळ्या गोष्टी घडतात…. वर्षानुवर्ष असेच अनुभव येऊन येऊन आणि लोकांचा कृतघ्नपणा ची चीड येऊन शेवटी हळूहळू डॉक्टरांचा वैद्यकीय व्यवसायातला रस कमी व्हायला सुरुवात होते …परंतु तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो कुठल्यातरी दुर्धर आजाराने तुम्ही जखडले गेलेला असतात आणि उर्वरित आयुष्य तुम्हाला फक्त आणि फक्त त्यासोबतच घालवायचे असते…..
दैनंदिन ओपीडी, ऑपरेशन थेटर, डिलिव्हरी या सर्व गोष्टींमध्ये कुटुंबाला पुरेसा वेळ देता येत नाही ,पुरेशी झोप मिळणेही अवघड होऊन जातं आणि नशिबाने झोप मिळाली तरी अशा प्रकारच्या Nightmares मुळे त्या झोपेला काही अर्थ राहिलेला नसतो ….आणि दुर्दैवाने हे आणि हेच रोजचे आयुष्य बनलेलं असतं
….. लोकांना आमचे मोठे हॉस्पिटल दिसतील आमची चकचकित बंगले गाड्या दिसतील परंतु हे सर्व मिळवताना आम्हाला आणि आमच्या एकंदर कुटुंबियांना ज्या काटेरी वाटेवरून आणि तणाव पूर्ण वातावरणा खाली जगावे लागते ते कधी दिसणार नाही…..

तुमच्याप्रमाणेच आम्हीसुद्धा हाडा मासाचे माणसेच आहोत फक्त रुग्णसेवेचे व्रत आम्ही अंधपणे घेतले नसून पूर्ण विचारांती आणि त्यात येणाऱ्या आव्हानांची ,समस्यांची जाणीव असूनही घेतले आहे आणि आम्हाला ही मर्यादा नावाचे बंधन आहे याची फक्त जाणीव असावी यासाठी हा लेखप्रपंच………

प्रतिक्रिया व्यक्त करा

16 − 8 =