You are currently viewing बोलीभाषा आणि त्याचं संवर्धन

बोलीभाषा आणि त्याचं संवर्धन

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य तथा लालित्य नक्षत्रवेल समूह प्रशासक लेखक कवी दीपक पटेकर (दीपी) लिखित अप्रतिम लेख*

*बोलीभाषा आणि त्याचं संवर्धन*

जेची गोडी सगळ्यात जास्ती
तिच असता आपली बोली
खयचीय भाषा बोलली तरी
मोजुक येयत नाय तिची खोली

मातृभाषा आपल्याला नक्कीच जवळची असते पण, आपल्या काळजात शहाळ्याच्या पाण्यासारखी अवीट गोडी असलेली बोली भरलेली असते ती म्हणजे आपली बोलीभाषाच..!
आपली मातृभाषा मराठी ही एकाहून अधिक पद्धतीने बोलली जाते. असं म्हणतात की बारा कोसांवर आपली बोली बदलत असते. बदल म्हणजे काही शब्दांचे उच्चार, शब्दसंग्रह, शब्दांवर होणारा आघात, वाक्यप्रचार असे छोटे छोटे बदल होत असतात. परंतु म्हणून भाषेत फारसा फरक पडत नाही किंवा तिची गोडी यत्किंचितही कमी होत नाही. महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात, विभागात वेगवेगळी मराठी बोलली जाते, कोकणात कोकणी किंवा मालवणी, कोल्हापूरची कोल्हापुरी मराठी, कारवारी, अहिराणी, नागपुरी, मराठवाडी, बेळगावी, पुणेरी, वऱ्हाडी, खानदेशी, झाडीबोली असे नानाविध प्रकार आपण बोलताना ऐकतो. प्रत्येक भाषेचा एक बोलण्याचा बाज असतो, त्यात एक प्रकारचा गोडवा असतो. यात शुद्ध मराठी कुठली असे कोणीही सांगू शकणार नाही, परंतु पुण्यातील मराठी सुधारित असेही बोलले जाते. या सर्व बोली अभ्यासताना आदिवासी लोकांची बोली देखील दुर्लक्षित ठेऊन चालणार नाही. गोंडी, भिल्ली, कातकरी अशा काही मुख्य आदिवासी बोली देखील आहेत.
महाराष्ट्रात ज्या बोलीभाषा बोलल्या जातात त्यात खानदेशी सर्वाधिक बोलली जाते. यात देखील अहिराणी आणि बागलानी अशा दोन पोटभाषा आहेत. अहिराणी भाषेत अनेक लोकगीते देखील लिहिलेली, गायलेली ऐकू येतात. लातूर वगैरे कर्नाटक सीमेलगत मराठवाडी बोली बोलली जाते, त्यात काही कर्नाटकी शब्दांचा प्रभाव पडलेला दिसतो. ज्या बोलीवर दुसऱ्या बोलीची सावली पडते, ती त्यापद्धतीने थोडीशी बदलत जाते. भंडारा, गोंदिया, चंद्रपूर येथे झाडीबोली बोलली जाते. अतिशय मधुर वाटणारी अशी ही बोली आहे. यात प्रामुख्याने ण, छ, श, ष, ळ ही व्यंजने वापरली जात नाहीत.
अमरावती, बुलढाणा, यवतमाळ आदी ठिकाणी वऱ्हाडी भाषा बोलली जाते. यात “ड” चा “ळ” व “ळ” चा “य” केला जातो. यात देईजो, घेईजो, येईजो असेही शब्द येतात. नागपूर, वर्धा, चंद्रपूर येथे नागपुरी बोलली जाते. वऱ्हाडी भाषेसारखीच नागपुरी बोली असून काही हिंदी शब्दांचा त्यावर प्रभाव दिसतो. बहिणाबाई चौधरींच्या कवितांमध्ये नाद आणि लय यांचा सुरेख संगम असलेली लेवा बोली आपणास पहावयास मिळते. कोकणपट्टीचा रायगड जिल्ह्यातील अलिबाग वगैरे ठिकाणी आपण आगरी भाषा बोलली ऐकतो. मराठी, कन्नड आणि कोकणी भाषेचा मिलाप असलेली चंदगडी बोली आपण कर्नाटक सीमेवरील चंदगड, आजरा आदी भागात ऐकतो. यात “कोठे” ऐवजी “खट्टे” असं म्हटलं जाणारा एक वेगळाच शब्द ऐकू येतो. “खट्टे गेल्लास..?” म्हणजे “कुठे गेलेलास?”, “मिया येवलो” म्हणजे मी आलो.. असे मिठास असलेले थोडासा हेल काढून बोललेले शब्द ऐकू येतात. कोल्हापूर येथील मराठी बोली म्हणजे कष्टकरी शेतकऱ्यांची बोली आहे. कोकणी भाषेसारखी लय कोल्हापुरी भाषेत दिसते. ही भाषा म्हणजे थोडीशी रांगडी, आणि शब्दागणिक प्रेमाने दिलेल्या शिव्या..यामुळे आपलीशी वाटते. आपल्या महाराष्ट्रात पुणेरी मराठी म्हणजे व्याकरण शुद्ध मराठी समजली जाते. परंतु तसं पहायला गेलं तर पुणेरी पेक्षा इतर रांगड्या भाषा मनाच्या जवळच्या वाटतात. कन्नड, कोल्हापुरी, चंदगडी आणि कोकणी भाषेचा अंगरखा पांघरलेली बेळगावी भाषा कानाला गोड वाटते. “कट्ट जाऊलास?” येऊलास असे शब्द असणारी ही बेळगावी बोली बेळगावसह येल्लुर, चंदगडचा काही भाग आदी ठिकाणी प्रचलित आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात म्हणजे तळकोकणात मालवणी बोलीभाषा प्रचलित आहे. पूर्वी कुडाळी बोली असेही म्हटले जायचे. देवगड पासून कणकवली, मालवण, वेंगुर्ला, कुडाळ सावंतवाडी, बांदा पर्यंत प्रत्येक तालुक्यात भाषा थोडी थोडी वेगळी आहे. १२ कोसांवर भाषा बदलते या उक्तीप्रमाणे भाषेत थोडेसे बदल झालेले पहावयास मिळतात. मालवणी नटसम्राट मच्छिंद्र कांबळी यांनी मालवणी भाषा सातासमुद्रापार पोचविली आहे. मालवणी भाषेत बरचसं साहित्य आज लिहिलं गेलं, अनेक साहित्यिकांनी मालवणी भाषेला जतन केलं आहे. मालवणी भाषा सुद्धा बराचसा मराठी भाषेचा मुलामा घेऊन बोलली जाते. शहरातील मालवणी जरी सुधारित वाटली तरी खेडोपाडी बोलली जाणारी मालवणी सहज समजत नाही. मालवणी ही भाषा देखील हेल काढून लयीत बोलली जाते. काही ठिकाणी वाक्यात येणाऱ्या शिव्या देखील आपलेपणा दाखवतात. “अरे रां*च्या केवा इलस..बरो हस ना..?” या वाक्यात अश्लील शिवी असून देखील आपलेपणाने मिठी मारल्याचा भास निर्माण करते. “कोठे”..”खय” किंवा “खडे”, “येणार”.. “येतलस”, “इकडे” म्हणजे “हकडे” किंवा “हडे”, “तिकडे” म्हणजे “तडे”…
अशी मालवणी शब्दांची विविध रूपे ऐकताना रसाळ फणसासारखी गोड, रसाळ वाटतात…
आपल्या बोलीभाषांमध्ये अवीट गोडी असताना आपलीच माणसे परकीय भाषा बोलण्याचा, शिकण्याचा अट्टाहास का धरतात..? हा न सुटणारा प्रश्न उपस्थित होत आहे. आपली माणसे जेव्हा मुंबई, पुणे सारख्या मोठ्या शहरात जातात तेव्हा सार्वजनिक ठिकाणी शुद्ध मराठी बोलली तर एकवेळ समजू शकतो परंतु स्वतःच्या नातेवाईकांशी बोलताना देखील शुद्ध मराठी बोलण्याचा प्रयत्न करतात अन् आपण गावंडळ नसल्याचे दाखविण्याचा प्रयत्न करतात… पण खरंच त्याची गरज आहे का..? ज्या लोकांसोबत आपण वाढलो, मोठे झालो त्यांच्याशी का आपल्या बोलीभाषेत बोलू नये..? मोठे शहर असले तरी आपली बोली बोलण्याची लाज का वाटावी..? एवढंच नव्हे तर आपल्याच महाराष्ट्रात परप्रांतीय लोक व्यवसाय, उदरनिर्वाह करण्याकरिता येतात त्यांच्याशी आपण आपल्या भाषेत न बोलता त्यांना समजावं म्हणून त्यांच्या भाषेत किंवा हिंदी, इंग्रजीत बोलण्याचा प्रयत्न करतो.. त्यामुळे आपल्या महाराष्ट्रात ते आलेत की आपण त्यांच्या गावी गेलो..? असा प्रश्न साहजिकच पडतो. आपण आपल्या आईला आई न म्हणता दुसऱ्याच्या आईला “मम्मी” म्हणण्यासारखा हा प्रकार आहे. त्यामुळे आपल्याच गावात आपण आज उपरे होत चाललो आहोत, अन् परकीय गावकरी बनलेत. घरी आपण स्वतः मालवणी बोलताना आपल्या मुलांना मात्र मराठी, इंग्रजी शिकविण्याची धडपड करतो.. कारण मुले संस्कारी, सुशिक्षित, सुसंस्कृत व्हावी हा उद्देश..! पण जर त्यांना मायबोलीच येत नसेल तर पुढे जाऊन ते आपल्या मुलांना, भावी पिढीला काय शिकविणार आहेत..? मग आपली मायबोली कशी जतन होईल..? तिची समृद्धी कशी होणार..? तिचा वारसा पुढे चालणार कसा..? आपल्याच चुकीमुळे आज आपण आपल्या मायबोलीचा गळा घोटतो आहोत.. स्वतःच आपली मायबोली संपवत आहोत..
जर आपली मायबोली वाचवायची असेल, तिचे जतन, संवर्धन करायचे असेल तर सुरुवात आपल्या मायबोली बोलण्यापासून, आपल्या घरापासून केली पाहिजे. आपल्याच साहित्यातून, बोलण्यातून तिचा प्रचार, प्रसार केला पाहिजे..मायबोली बोलण्याची लाज नव्हे तिचा गर्व, अभिमान बाळगला पाहिजे..तर आणि तरच मायबोली नव्या पिढीच्या मनामनावर रुजणार.. शब्दा शब्दांमध्ये वाढणार..बोल बोलण्यातून पोसणार.. एकमेकांच्या सहवासाने फुलणार..मुखामुखात वदणार.. केवळ सुरुवात आपण केली पाहिजे..!

©दीपक पटेकर (दीपी)
सावंतवाडी
८४४६७४३१९६

*संवाद मीडिया*

*📣प्रवेश सुरु….📣प्रवेश सुरु….📣 प्रवेश सुरु….📣*🏃🏃‍♀️

*महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे….*

*महर्षी कर्वे महिला महाविद्यालय रत्नागिरी*.

*एस.एन.डी. टी. महिला विद्यालय, मुंबई संलग्न*

*BCA*

*प्रवेश प्रक्रिया 2024- 2025*

*बारावीनंतर बीसीए डिग्री कोर्स*👩‍🎓🧑‍🎓

*2024-25 ऍडमिशन करिता सीईटी बंधनकारक झाल्यामुळे www.mahacet.org या संकेतस्थळावर जाऊन सीईटी साठी आजच आपली नोंदणी करावी, कोणत्याही शाखेच्या( आर्ट्स /कॉमर्स/ सायन्स) ,गणित किंवा गणित विषया शिवाय बारावी उत्तीर्ण विद्यार्थिनींना येथे प्रवेश मिळू शकतो*

*अधिक माहितीसाठी…👇*

*📲7972997567*
*📲9420274119*

*या मोबाईल नंबर वरती संपर्क साधावा*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/130318/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा