You are currently viewing केंद्रीय मंत्री नारायणराव राणेंच्या माध्यमातून पोल्ट्री व्यावसायिकांना समृद्ध करणार

केंद्रीय मंत्री नारायणराव राणेंच्या माध्यमातून पोल्ट्री व्यावसायिकांना समृद्ध करणार

वाडोस येथील भव्य मेळाव्यात विशाल परब यांची ग्वाही

सावंतवाडी

केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांच्या माध्यमातून भाजपचे प्रदेश सरचिटणीस माजी खासदार निलेश राणे व युवानेते विशाल परब यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात देशपातळीवरील दोन मोठ्या कंपन्या व्यवसाय करण्यास तयार झाल्या आहेत. त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्लॉटर हाऊस सुरू केल्यास आज केवळ माणगाव खोरे किंवा कुडाळ तालुक्यापुरता मर्यादित असलेला पोल्ट्री व्यवसाय हा संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात विस्तारित होऊन त्याचा फायदा जिल्ह्यातील तरुणांना मिळेल व पोल्ट्री व्यावसायिक आर्थिक दृष्ट्या समृद्ध होतील असा विश्वास युवा नेते तथा उद्योजक विशाल परब यांनी व्यक्त केला.

कुडाळ तालुक्यातील वाडोस येथे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोल्ट्री व्यावसायिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी माजी खासदार निलेश राणे यांच्या सूचनेनुसार विशाल परब यांच्यावतीने भव्य चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी सभापती मोहन सावंत, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती दादा साईल, कुडाळ भाजपा मंडल अध्यक्ष विनायक राणे, मालवण भाजपा मंडल अध्यक्ष धोंडी चिदंरकर, जिल्हा बँक संचालक प्रकाश मोर्ये, योगेश बेळनेकर, राजा धुरी, दिनेश शिंदे या सोबत अनेक पदाधिकारी पोल्ट्री व्यवसाय संबंधी तज्ञ व शेकडोच्या संख्येने पोल्ट्री व्यावसायिक उपस्थित होते.
पोल्ट्री व्यावसायिकांसाठी सिंधुदुर्गात जिल्ह्यात स्लॉटर हाऊस किंवा कटिंग प्लांट यावेत यासाठी भाजपा युवानेते विशाल परब हे प्रयत्नशील आहेत. या संदर्भात केंद्रीय उद्योगमंत्री मा. नारायणराव राणे यांची दिल्ली येथे भेट घेतल्यानंतर भाजपा प्रदेश सचिव निलेशजी राणे यांनी जिल्ह्यातील पोल्ट्री व्यावसायिक आणि पोल्ट्री व्यवसायात येण्यास इच्छुक असणाऱ्या युवकांचा मेळावा घेऊन चर्चासत्र आयोजित करावं आणि त्यांच्या मागण्या विचारात घेण्याच्या सूचना विशाल परब यांना दिल्या होत्या. या सूचनेनुसार विशाल परब यांनी कुडाळ तालुक्यातील वाडोस येथे हा मेळावा आयोजित केला होता.

या मेळाव्यात गेल्या दहा वर्षांपासून पोल्ट्री व्यवसायात असणाऱ्या शेकडो शेतकऱ्यांनी आपल्या स्लॉटर हाऊस, प्रस्थापित कंपन्या, हॅचरीज, उत्पादन क्षमता, भाग भांडवल, या विषयात आपल्या समस्या मांडल्या. जिल्ह्यात स्लॉटर हाऊस का गरजेचं आहे किंवा सध्या पोल्ट्री व्यवसायात काय समस्या आहेत याच वास्तव मांडले. आपल्या समस्या विशाल परब यांच्या माध्यमातून राणे साहेबांपर्यंत जातील आणि त्यांचा थेट दिल्लीतून विचार होईल, अशी खात्री उपस्थित शेतकर्‍यांनी व्यक्त केली.

सद्यस्थितीत जिल्ह्यात स्लॉटर हाऊस नसल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या कार्यरत असणाऱ्या कंपन्या या गोवा किंवा बेळगांव येथील स्लॉटर हाऊसवर अवलंबून आहेत. त्याचा तोटा म्हणजे कुडाळ तालुका वगळता या कंपन्या इतर तालुक्यातील शेतकऱ्यांशी करार करत नाहीत. परिणामी इच्छा असूनही देवगड कणकवली वैभववाडी मालवण या तालुक्यातील युवक या क्षेत्रात उतरू शकत नाहीत. मात्र माणगाव येथे स्लॉटर स्लॉटर हाऊस झाल्यास याचा फायदा संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याला होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 + 4 =