23 नोव्हेंबर पासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू…..

23 नोव्हेंबर पासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू…..

एक दिवसाआड, दररोज चार तासांची असेल शाळा

दिवाळीनंतर नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरु करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. मार्चनंतर पहिल्यांदाच शाळेची घंटा वाजणार आहे. तत्पूर्वी, शाळांमधील प्रत्येक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची 17 ते 22 नोव्हेंबर दरम्यान कोरोना टेस्ट घेतली जाणार आहे. तर एक दिवसाआड अवघी चार तासांचीच शाळा भरविण्याचे निश्‍चित झाले आहे.

ठळक बाबी…

शाळा सुरू होण्यापूर्वी होणार सर्व शिक्षकांची ‘आरटीपीसीआर’ चाचणी

सर्व विद्यार्थ्यांचे थर्मल स्क्रिनिंग करुनच दिला जाणार शाळेत प्रवेश

वर्गातील एका बेंचवर बसणार एकच विद्यार्थी; त्याची जबाबदारी मुख्याध्यापकांवर

नववी ते बारावीचे वर्ग एक दिवसाआड, दररोज चार तासांची असेल शाळा

विज्ञान, गणित व इंग्रजी अशा कठीण विषयांचेच दिले जाणार धडे

स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून शिक्षकांची कोरोना टेस्ट करून घेतली जाणार आहे.

23 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या शाळांमधील सर्वच विद्यार्थ्यांचे थर्मल चेकींग करण्याच्या सूचना शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी शाळांना दिल्या आहेत. नववी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देताना त्यांच्याकडे मास्क असणे बंधनकारक आहे. तर वर्गातील एका बेंचवर एकच विद्यार्थी बसेल, असेही निर्देश देण्यात आले आहेत. शाळा उघडण्यापूर्वी वर्गखोल्या, शाळेचा परिसर सॅनिटायझरने फवारुन घ्यावा, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

नववी ते बारावीचे वर्ग एक दिवसाआड भरतील, विद्यार्थ्यांनी घरून जेवण करून यावे, कोणीही शाळेत येताना डबा घेऊन येऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच विद्यार्थ्यांनी स्वत:ची पाण्याची बाटली सोबत बाळगावी, चार तासांत केवळ विज्ञान, गणित आणि इंग्रजी, अशा कठीण विषयांचेच धडे दिले जाणार आहेत. अन्य विषयांची शिकवणी ऑनलाईन वर्गांतून दिली जाणार आहे. शाळा सुरू करण्यासंदर्भात विस्तृत आराखडा तयार करण्यात आला आहे.

शाळा, पालक, विद्यार्थी आणि शाळा व्यवस्थापन समितीची जबाबदारी काय असेल, याची जबाबदारी त्यात निश्‍चित करुन देण्यात आली आहे. तर ग्रामपंचायत, नगरपालिका, नगरपंचायत, पंचायत समिती, महापालिका अशा स्थानिक प्रशासनाचेही त्यासाठी सहकार्य घेतले जाणार आहे. तर ज्या विद्यार्थ्यांचे पालक तथा घरातील कोणी आजारी किंवा कोरोना पॉझिटिव्ह असल्यास त्यांना शाळेत प्रवेश दिला जाणार नाही. एखादा विद्यार्थी आजारी असल्यास पालकांनी त्यांना शाळेत पाठवू नये, असेही स्पष्ट करण्यात आले आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा