माणगावातील अवैद्य धंद्यांची माहिती संवाद मिडियाकडे…ठाणे अंमलदार महेश अरवारी बंद करतील काय?

पिंपळ पारावरचा दारूअड्डा बाजूच्याच गल्लीत.

कुडाळ पोलीस स्टेशनच्या अखत्यारीत येणारे माणगाव पोलीस दूरक्षेत्राची ठाणे अंमलदार म्हणून महेश अरवारी यांनी जबाबदारी घेतल्याबरोबर माणगाव येथे सुरू असणारे अवैध धंदे बंद झाल्याची बातमी नुकतीच सोशल मिडियाद्वारे जाहीर झाली. अरवारी यांनी ठाणे अंमलदार म्हणून येण्यापूर्वी माणगाव बाजारपेठ व इतरत्र बेकायदेशीर दारू, मटका, जुगार आदी धंदे जोरदार सुरू होते याचीच कबूली दिल्यासारखीच ही बातमी होती. म्हणजे यापूर्वी माणगाव दूरक्षेत्रात ठाणे अंमलदार असणाऱ्यांनी अवैद्य धंद्यांना आश्रय दिल्याची ही अप्रत्यक्ष कबुलीच म्हणायची का? खाकीच्या आशीर्वादानेच माणगावात बेकायदेशीर धंदे सुरू होते का?
माणगाव बाजारपेठेत आजही चोरीछुपे मटका, दारू, जुगार असे अवैध धंदे सुरू आहेत, संवाद मिडियाकडे माणगावात कुठे कुठे अवैध धंदे सुरू आहेत याची माहिती आहे, परंतु सुरू असणारे अवैध धंदे नूतन ठाणे अंमलदार बंद करू शकतील का? हाच खरा प्रश्न आहे. केवळ बातम्या देऊन धंदे बंद झाले असे म्हणणे संयुक्तिक नाही, तर खरोखरंच अवैध धंदे बंद झाले तर ते स्वागतार्हच. अन्यथा सुरू असणाऱ्या धंद्यांमधून पूर्वीपेक्षा जास्त कमाई होणे यासाठीच कारवाई होते का? असा प्रश्न उभा राहतो.
माणगाव बाजारपेठेतील पिंपळपार म्हणजे चव्हाट्यावर उभे राहून लोक बिनधास्तपणे दारू पीत होते, ती पूर्णतः बंद झाल्याचे सांगण्यात येत आहे, खरोखरच बाजारपेठेतील चव्हाट्यावर दारू पिणे ठाणे अमलदारांनी बंद केले आहे, कारण भर बाजारात ते लोकांच्या निदर्शनास येत होते. परंतु पिंपळ पारावार दारू पिणे, गाड्या लावणे, ट्रॅफिक होणे बंद झाले आणि बाजूच्याच गल्लीत तो दारूचा अड्डा आहे त्याच प्रकारे जोरदार सुरू आहे. यात विशेष म्हणजे बाजारात रोज नजरेत पडणारा दारूचा अड्डा गल्लीत गेल्याने सहज दृष्टीस पडत नाही. त्यामुळे अवैध धंदे बंद केले असे म्हणणे हास्यास्पद आहे. हीच परिस्थिती इतर मटका, जुगार सारख्या धंद्यांची आहे.
माणगाव बाजारपेठेत आजही दारूचा व्यवसाय सुरू आहे, केवळ जागा बदलून. स्वतःच्याच हाताने स्वतःची पाठ थोपटून घेण्यापेक्षा “सदरक्षणाय खलनिग्रहणाय” या ब्रिदाप्रमाणे कर्तव्य पार पाडून माणगावातील दारू, जुगार, मटका हे अवैध व्यवसाय बंद करावेत अशी मागणी जोर धरू लागली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × one =