You are currently viewing जागतिक पर्यटन दिनानिमित्त मालवणात विविध कार्यक्रमांचे आयोजन..

जागतिक पर्यटन दिनानिमित्त मालवणात विविध कार्यक्रमांचे आयोजन..

पर्यटन व्यवसायिकांनी सहकार्य करावे बाबा मोंडकरांचे आवाहन

मालवण:

जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून दिनांक २७ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या वतीने कोळंब येथील स्वामी समर्थ हॉल येथे पर्यटन दिन साजरा करण्यात येणार असून या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्राचे उद्घाटन सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमास केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि भारत सरकारचे शेर्फा सुरेश प्रभू हे यावेळी पर्यटन व्यावसायिकाना ऑनलाइन मार्गदर्शन करणार असल्याची माहिती महासंघाचे जिल्हाध्यक्ष बाबा मोंडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मालवण येथील हॉटेल रुचिरा येथे सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघाचे जिल्हाध्यक्ष बाबा मोंडकर यांनी पत्रकार परिषद पार पडली. यावेळी संघटनेचे मालवण तालुकाध्यक्ष अविनाश सामंत, शहर अध्यक्ष मंगेश जावकर, महिला आघाडी प्रमुख मेघा गावकर आदी व इतर उपस्थित होते.

पत्रकार परिषदेत बोलताना बाबा मोंडकर म्हणाले, पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या वतीने जागतिक पर्यटन दिनानिमित्त चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमास आमदार नितेश राणे, माजी आमदार परशुराम उपरकर, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे संचालक व्हिकटर डांटस, सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रसाद पारकर यांच्यासह सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी व प्रशासकीय अधिकारी सहभागी होणार आहेत. सिंधुदुर्ग लाईव्ह न्यूज चॅनेलचे मुख्य संपादक सागर चव्हाण, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश जेठे यांनाही निमंत्रित केल्याचे मोंडकर यांनी सांगितले. या पर्यटन दिनाच्या निमित्ताने पर्यटनाच्या थीम वर केक बनविणे स्पर्धा, फोटोग्राफी स्पर्धा तसेच उत्कृष्ट काम करणाऱ्या बचत गटांचा सत्कार तसेच महासंघाने गेल्या दोन महिन्यात विविध प्रशिक्षणे घेतली त्या प्रशिक्षणार्थीना प्रमाणपत्रे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती श्री. मोंडकर यांनी दिली.

ते पुढे म्हणाले, १९९७ रोजी सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्यात आल्यानंतर पर्यटनाच्या दृष्टीकोनातून काम झाले पाहिजे तसे झालेले नाही. राजकीय स्तरावरही व्यापाऱ्यांच्या गरजा काय आहेत त्यांच्या मागण्या काय आहेत याची म्हणावी तशी दखल घेतली गेली नाही. आणि म्हणूनच या पुढे पर्यटन व्यावसायिक महासंघ हा शाश्वत विकासासाठी प्रयत्न करणार असून सर्वसमावेशक व्यावसायिक एकत्र करून विकासासाठी प्रयत्न करणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघ स्थापन होऊन अडीच महिने झाले या अडीच महिन्यात विविध स्तरावरील पर्यटन व्यावसायिकांना संघटित केले जात असून पर्यटन वाढीसाठी गावोगावाचे सरपंच तसेच ग्रामपंचायतींची मदत घेण्यात येत आहे. गावागावातील पर्यटन स्थळे विकसित करण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीला पर्यटन विकास आराखडा बनवून देण्याची विनंती करण्यात आली असून या कामी स्वायत्त संस्थांचीही मदत घेण्यात येत आहे. पर्यटन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या चर्चा सत्राच्या कार्यक्रमात पर्यटन विषयक चर्चेचे रसमंथन होणार असून त्यातून पर्यटन जिल्हा नावारूपाला यावा हा आमचा उद्देश आहे. पर्यटन व्यावसायिकांनी या कामी सहकार्य करावे असे आवाहन श्री. मोंडकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

thirteen − six =