You are currently viewing गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कणकवलीत आरोग्य विभागाची “दहा” पथके राहणार कार्यरत

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कणकवलीत आरोग्य विभागाची “दहा” पथके राहणार कार्यरत

खारेपाटणमध्ये तीन ठिकाणी होणार स्वतंत्र तपासणी; ७ सप्टेंबरपासून आरोग्य पथके होणार कार्यान्वित

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग सतर्क: कोविडच्या अनुषंगाने नियोजन पूर्ण

कणकवली :

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चाकरमानी सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल होण्यास सुरुवात झाली असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल होत असलेल्या चाकरमान्यांची कोविडच्या अनुषंगाने स्वाब तपासणी आणि नोंद ठेवण्याकरिता खारेपाटण चेकपोस्ट, कणकवली रेल्वेस्टेशन आणि फोंडाघाट चेक पोस्ट या ठिकाणी आरोग्य विभागाने पथके तैनात करण्याच्या दृष्टीने नियोजन केले आहे. आरोग्य विभागाची खारेपटण चेकपोस्ट येथे ३ ठिकाणी ६, फोंडाघाट चेकपोस्ट येथे २ आणि कणकवली रेल्वे स्टेशनवर २ पथके कार्यरत ठेवण्यात येणार आहेत.

कणकवली रेल्वेस्टेशनवर सद्यस्थितीत मुंबईहून येणाऱ्या चाकरमान्यांची नोंद ठेवणे आणि ज्यांच्याकडे आरटीपीसीआरचा निगेटिव्ह अहवाल नाही तसेच दोन डोस पूर्ण झाले नाही अशांचे आरटीपीसीआर स्वाब घेण्यासाठी दोन पथके कार्यरत आहेत. तसेच त्याअनुषंगाने उपाययोजना करण्यासाठी दोन पथके कार्यरत करण्यात आली आहेत. तर खारेपाटण, फोंडा चेकपोस्टवरील पथके ही ६ सप्टेंबर रोजी ट्रायल बेसवर कार्यान्वित करण्यात येणार आहेत. ७ सप्टेंबरपासून ही पथके ऍक्टिव्ह राहणार आहेत अशी माहिती आरोग्य विभागाच्या सूत्रांनी दिली. दरम्यान, खारेपाटण येथे ३ ठिकाणी ही पथके कार्यरत असणार आहेत. त्यात खारेपाटण चेकपोस्ट येथे कार आणि अन्य चारचाकीने मुंबईहून येणाऱ्या चाकरमान्यांची माहिती घेत निकष पूर्ण नसल्यास रॅपिड टेस्ट करण्यात येणार आहे.

मात्र, १८ वर्षाखालील आणि कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाचे दोन डोस पूर्ण झाले आणि आरटीपीसीआर निगेटिव्ह अहवाल ७२ तासातील असल्यास अशा चाकरमान्यांची स्वाब तपासणी केली जाणार नाही, अशी माहिती आरोग्य विभागाच्या सूत्रांकडून देण्यात आली. दरम्यान, सद्यस्थितीत या पथकांकडून आरटीपीसीआर अहवालासाठी स्वाब घेण्यात येत आहे. चाकरमानी येण्याचे प्रमाण कमी असल्याने सध्या आरटीपीसीआरसाठी स्वाब घेतले जात आहेत. पण गणेशोत्सवाच्यापूर्वी ६ सप्टेंबरपासून चाकरमान्यांचा जिल्ह्यात येण्याचा ओघ वाढणार असल्याने आरटीपीसीआरऐवजी रॅपिड टेस्ट केल्या जाणार आहेत. रॅपिड टेस्टकरिता आरोग्य विभागाकडे किटचा पुरेसा साठा उपलब्ध असून येत्या सोमवारी अजून रॅपिड टेस्टची किट उपलब्ध होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणाऱ्या चाकरमान्यांचा मोठ्या प्रमाणावर रेल्वेवर भर असताना रेल्वे व्यतिरिक्त बाय रोड येणाऱ्या लोकांची संख्याही खारेपाटण चेकपोस्टवर जास्त असणार आहे. त्यामुळे या ठिकाणीही त्या अनुषंगाने नियोजन करण्यात आले आहे. खारेपाटण येथे लक्झरी ट्रॅव्हल्सचा एक विभाग तर कार आणि अन्य लहान वाहने यांच्या तपासणीचा एक तसेच एसटीने प्रवास करणार्‍या प्रवाशांच्या स्वाब तपासणीकरिता, निकष पूर्ण होत असतील तर त्याच्या पडताळणीसाठी एक अशी ३ ठिकाणी ६ पथके खारेपाटण भागात कार्यरत असणार आहेत. याकरिता वारगाव येथील नियुक्त केलेल्या पथकाकडे एसटी प्रवाशी विभागची जबाबदारी देण्यात आली आहे. तर ट्रॅव्हल्स-लक्झरीमधील प्रवाशांच्या विभागाची जबाबदारी खारेपाटण रामेश्वरनगर येथील कार्यरत असणाऱ्या पथकाकडे देण्यात आली आहे.

या प्रत्येक पथकामध्ये आरोग्य विभागाचे दोन कर्मचारी आणि अन्य विभागाचे कर्मचारी मिळून ५ ते ६ कर्मचाऱ्याचे एक पथक असणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रवेशद्वार हे खारेपाटण असल्याने कणकवली तालुक्यात प्रामुख्याने करण्यात येणारे नियोजन हे जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असणार आहे. त्या दृष्टीने आरोग्य विभागाने कंबर कसली असून आरोग्य विभागाकडून त्या अनुषंगाने उपाययोजना करण्यात आल्या आहेत. जेणेकरून मुंबईहून गणेशोत्सवासाठी गावी येणाऱ्या चाकरमान्यांना त्रास होऊ नये व त्या अनुषंगाने नियमांचे योग्यरितीने पालन होण्याच्या दृष्टीने आरोग्य विभागाकडून कंबर कसण्यात आली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा