You are currently viewing ना. नारायण राणे यांच्या माध्यमातून काथ्या उद्योग वाढीसाठी विशेष प्रयत्न

ना. नारायण राणे यांच्या माध्यमातून काथ्या उद्योग वाढीसाठी विशेष प्रयत्न

कॉयर बोर्ड चेअरमन डी. कुप्पूरामू यांची सिंधुदुर्गला भेट : काथ्या उद्योजकांशी केली सकारात्मक चर्चा

वेंगुर्ला

केंद्रामध्ये सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग खात्याचे नारायण राणे हे मंत्री झाल्यानंतर सर्वप्रथम त्यांनी दिल्लीत कॉयर बोर्ड चेअरमन यांच्यासोबत बैठक घेऊन याबाबत महाराष्ट्रात जास्तीत जास्त लक्ष देण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार बोर्डाचे चेअरमन डी. कुप्पूरामू यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात भेट देऊन जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांच्या प्रमुख उपस्थितीत ओरोस येथे बैठक घेतली. या वेळी त्यांनी जिल्ह्यातील काथ्या उद्योजकांशी चर्चा केली. तसेच पुढील काळात काथ्या उद्योग वाढवण्यासाठी योग्य नियोजन केले जाईल व यासाठी आपण दर ३ महिन्यांनी जिल्ह्यात येण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
ओरोस येथे आयोजित केलेल्या या बैठकीत एमएसईडी चे चेअरमन राजेश कांदळकर, कॉयर बोर्डचे रिजनल मॅनेजर श्रीनिवासन, झोनल डायरेक्टर जे. के. शुक्ला, डीआयएस चे मॅनेजर पी.के. गावडे, एम. के. कॉयर फाउंडेशनचे अध्यक्ष एम के गावडे, महिला काथ्या संस्थेच्या संचालिका सौ. प्रज्ञा परब यांच्या साहित जिल्ह्यातील महिला, पुरुष काथ्या उद्योजक उपस्थित होते. या बैठकीत जिल्ह्यातील काथ्या उद्योग वाढवणे, काथ्या प्रशिक्षण, जनजागृती कार्यक्रम यासंदर्भात मान्यवरांनी मार्गदर्शन केले.

काथ्या उद्योगात जास्तीत जास्त नारळाच्या सोडणावर प्रक्रिया होणे गरजेचे असून महाराष्ट्राच्या रिजनल ऑफिस साठी कॉयर बोर्डाने झुकते माप देऊन अधिकचा निधी द्यावा अशी विनंती एम के गावडे यांनी केली. यावेळी चेअरमन डी. कुप्पूरामू यांनी काथ्या उद्योजकांनी केलेल्या मागण्यांपैकी बऱ्याच मागण्या जाग्यावर मान्य करून पुढील कार्यवाही तात्काळ करण्याचे आदेश दिले. आपण आजपर्यंत काथ्या उद्योगातील स्फुर्ती क्लस्टर तसेच इतर उद्योजकांना सर्वतोपरी सहकार्य केले असुन भविष्यात जिल्हा स्तरावर लागणारे सर्वतोपरी सहकार्य प्रशासनाकडून मिळेल असे आश्वासन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी यावेळी दिले.

प्रतिक्रिया व्यक्त करा