You are currently viewing गोव्याच्या धर्तीवर चालतो मालवणात मिनी कॅसिनो

गोव्याच्या धर्तीवर चालतो मालवणात मिनी कॅसिनो

*कोण हा विक्रमवीर सिंधिया?*

 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक तरुण, राजकारणी लोक नशिबाने झटपट पैसा मिळणार या आशेने शेजारील गोवा राज्यातील कॅसिनोच्या प्रेमात पडले. दिवसरात्र कधी कॅसिनो मध्ये जायची आणि भरलेला खिसा कधी रिकामी व्हायचा हे देखील या तरुणांना समजायचे नाही. अशातच जिल्ह्यातील कित्येकांनी आपली बँक खाती तर रिकामी केली, परंतु काहींनी उधार पैसे घेऊन अगदी आपली प्रॉपर्टी देखील गहाण ठेवून, विकून कॅसिनोमध्ये पैसे उडवले आणि कंगाल झालेत. काही घरांनी तर गोव्यात कॅसिनोमध्ये गेलेल्यांचे घरदार बरबाद होते असा संदेशच समाजात पसरल्याने कॅसिनोचा धसका घेतला आहे. परंतु *सिंधुदुर्ग जिल्ह्यातीलच इंजीनीअरिंगचे उच्च शिक्षण घेतलेल्या एका तरुणाने मालवण, रेवदंडा येथील आदर्शनगर येथे मिनी कॅसिनो सुरू केला आहे,* त्यामुळे मालवण तसेच जिल्ह्यातील तरुण पुन्हा या कॅसिनोकडे आकर्षित होत असल्याने गोव्यातील कॅसिनो संस्कृती जिल्ह्यात आल्याने चिंतेचा विषय झाला आहे.
मालवणातील इंजिनिअरिंग शिकलेल्या या विक्रमविर सिंधियाने गोव्याच्या धर्तीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू केला असून मालवणच्या आजूबाजूच्या देवली, चौके, आनंदव्हाळ, कुंभारमाठ, तसेच मालवणातील धुरीवाडा, देऊळवाडा येथील अनेक तरुण मिनी कॅसिनोच्या आहारी गेले आहेत. मालवणात सुरू झालेल्या या मिनी कॅसिनोमध्ये खेळात लाखोंची उलाढाल होत आहे. दिवसभरात होणाऱ्या उलाढालीत ४०% वाटा हा या उच्चशिक्षित असलेल्या विक्रमविर सिंधियाला मिळत आहे. त्यामुळे इंजिनिअरिंग शिकून जेवढा पैसा मिळवता येते नाही तेवढा पैसा अवैध रित्या सुरू केलेल्या धंद्यातून मिळतो असाच संदेश मालवणात पोचला आहे.
जिल्ह्यातील एका उच्चशिक्षित तरुणाने व्यवसाय करून आपल्या पायावर उभे राहण्यासाठी जो मार्ग अवलंबला आहे, त्यातून अनेकांना मात्र स्वतःचे पाय मोडून घ्यावे लागतील हे मात्र नक्कीच. सिंधुदुर्ग जिल्ह्यात दारू, मटका, जुगार सारखे अवैध धंदे उफाळून येत असतानाच कॅसिनो नावाचा नवा जुगार जिल्ह्यातील तरुण पिढीच्या माथी मारला जात आहे. वेळीच प्रशासनाचे याची दखल न घेतल्यास भविष्यात जिल्ह्यातील तरुणपिढी बरबादीच्या मार्गावर गेल्याशिवाय राहणार नाही.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eight − seven =