You are currently viewing प्रतिभाशाली व्यक्तिमत्व ॲड.संग्राम देसाई

प्रतिभाशाली व्यक्तिमत्व ॲड.संग्राम देसाई

सिंधुदुर्ग सारख्या छोट्याशा जिल्ह्यातील एक तरुण वकील संग्राम देसाई यांची महाराष्ट्र आणि गोवा राज्याच्या बार कौन्सिलच्या निवडणुकीत निवडून येत थेट उपाध्यक्षपदी निवड होणे म्हणजे अमृतयोगच. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात या उक्तीप्रमाणे संग्राम देसाई हे मुळातच हुशार होते. सावंतवाडीच्या मिलाग्रीस हायस्कुलमध्ये असतानाच संग्राम यांच्यात एक वेगळा स्पार्क होता. प्रतिभाशाली व्यक्तिमत्व असलेले संग्राम यांना बुद्धिमत्तेचे बाळकडू त्यांचे प्रचंड विद्वान आणि आक्रमक व्यक्तिमत्त्व होते त्या त्यांचे वडील वकील डी. डी. देसाई यांच्याकडूनच मिळाले. वयाने कमी असतानाही जिल्ह्यातील मोठमोठ्या गुन्ह्यांच्या केसेस ॲड. संग्राम यांनी लढल्या आणि आपल्या बुद्धीच्या कौशल्याने जिंकल्या देखील. मुंबई हायकोर्टात देखील त्यांनी आपल्या कुशाग्र बुद्धीची आणि वकिलीत असलेल्या हुषारीची छाप पाडली.
ॲड. संग्राम देसाई यांच्या निवडीमुळे मुंबई हायकोर्टात कोकणला मानसन्मान तर मिळेलच परंतु मुंबईत जाऊन हायकोर्टात लढणाऱ्या जिल्ह्यातील तरुण वकिलांना आत्मविश्वास आणि प्रचंड मानसिक पाठबळ मिळेल. ॲड. संग्राम देसाई यांनी कमी वयातच वकिली क्षेत्रात प्रचंड नाव केले आहे. जिल्ह्यातील कठीण समजले जाणारे खटले त्यांच्याकडेच येतात. नांदोस हत्याकांड खटल्यानंतर तर संग्राम यांचे नाव राज्यभर गाजले होते. संग्राम हे पक्षकारांसाठी मोठे वकील असले तरी गोरगरीब पक्षकारांच्या केसेस ते नाममात्र पैशात लढतात. त्यामुळे गोरगरिबांसाठी ते देवदूतच मानले जातात. संग्राम हे वकिली करत असतानाच समाजकार्यात देखील पुढे असतात, निराधारांना आधार देण्यासाठी, गोरगरीब मुलांच्या शिक्षणाचा आर्थिक भार उचलणे, गोरगरिबांसाठी चालवलेल्या संस्था, आश्रम यांना पाठबळ देणे, अशा अनेक समाजहिताच्या कामांमध्ये त्यांचा सहभाग असतोच. त्यामुळे वकिली व्यवसायात कमावलेल्या केवळ आपलेच हित न जोपासता पैशांतून ते त्यातील काही वाटा गरिबांच्या कल्याणाकरिता खर्च करतात. आपल्या वकिली व्यवसायाशी प्रामाणिक असताना गुन्हेगाराला शिक्षा देण्यासाठी ते प्रयत्न करतात परंतु शिक्षा दिलेल्या गुन्हेगाराच्या कुटुंबाप्रति देखील त्यांना सहानुभूती वाटते. कारण गुन्हा करणाऱ्यापेक्षा त्याच्या कुटुंबाला त्याची जास्त शिक्षा भोगावी लागत असते अशी त्यांची भावना आहे.
खासदार नारायण राणे यांचे ते समर्थक, पालकमंत्री उदय सामंत यांचे स्नेही देखील आहेत परंतु राजकीय आखाड्यात ते कधीच उतरले नाहीत. त्यांचे बंधू रणजित देसाई हे राजकारणात सक्रिय आहेत, परंतु संग्राम राजकारणापासूम दूरच राहिले. परंतु संग्राम यांची राज्य बार कौन्सिलच्या उपाध्यक्षपदी झालेली निवड ही भविष्यात जिल्ह्याला राज्यस्तरावर पुढे घेऊन जाण्याची नांदी आहे. कोल्हापूर खंडपीठ हा रखडलेला प्रश्नही मार्गी लागण्यासाठी ते नक्कीच प्रयत्नशील राहतील यात शंकाच नाही. त्याच बरोबर उच्च आणि सर्वोच्च न्यायालयातील जेष्ठ न्यायाधीश भविष्यात कोकणात येतील व कोकणच्या नवोदितांना त्यांचे मार्गदर्शन लाभेल.
संग्राम यांच्या निवडीने जिल्हा बार कौन्सिलच्या वकिलांनी देखील त्यांचे अभिनंदन केले आहे. जेष्ठ वकील दिलीप नार्वेकर,पणदूरकर,अमोल सामंत,अजित भणगे, डॉ. नंदन सामंत, हॉटेल व्यावसायिक विठ्ठल कामत, तसेच पालकमंत्री उदय सामंतसह जिल्ह्यातील अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. *मसंग्राम ज्या मिलाग्रीस हायस्कुल मधून शिकले त्या त्यांच्या 1989 च्या बॅचच्या मित्रपरिवाराने देखील त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. ॲड. संग्राम देसाई यांच्यावर महाराष्ट्र, गोवा आदी सर्वच ठिकाणाहून कौतुकाचा आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. संवाद मिडियाकडूनही त्याच्या महाराष्ट्र आणि गोवा राज्याच्या बार कौन्सिलच्या उपाध्यक्षपदी झालेल्या निवडीबद्दल हार्दिक अभिनंदन आणि भावी वाटचालीस शुभेच्छा..

प्रतिक्रिया व्यक्त करा