You are currently viewing आठवण

आठवण

ती रोज सांगायची…
“आठवण येईल तुझी,,,
मावळत्या सूर्याला
अस्ताला जाताना पाहून”.
आज मलाच समजत नाही,,
तिला आठवणंच येत नाही?
की सूर्य अस्ताला जातच नाही?

ती रोज सांगायची..
“दिसत राहशील तू
त्या शीतल चंद्रासारखा..
अंधाऱ्या रात्रीतही”
आज मलाच समजत नाही,,
तिला पौर्णिमेलाच दिसायचो की
रात्री अंधार होतंच नाही?

ती रोज सांगायची..
“स्वप्न पडतील तुझी
पापण्यांवर नाचतीलही ती
एकांतात डोळे मिटल्यावर”
आज मलाच समजत नाही,,
तिला स्वप्न पडतात का?
की तिला एकांतच भेटत नाही?

ती रोज सांगायची…
“तुला मागून घेतलं मी
फक्त माझ्यासाठीच
त्या तुटत्या ताऱ्याकडून”
आज मलाच समजत नाही,,
तो तुटलेला ताराच होता?
की काजव्याने तिला फसवलं होतं????

ती रोज सांगायची……….

(दिपी)……✒
दीपक पटेकर

प्रतिक्रिया व्यक्त करा