You are currently viewing भरड येथे मालवाहू गाडीचे चाक पायावरून गेल्याने वृद्ध महिला गंभीर जखमी…

भरड येथे मालवाहू गाडीचे चाक पायावरून गेल्याने वृद्ध महिला गंभीर जखमी…

अधिक उपचारासाठी कुडाळला हलविले…

मालवण

कोल्हापूर येथून आलेल्या मालवाहू गाडीचे चाक श्रीमती तारामती विष्णू परकर (वय-७५) रा. भरड मालवण या पादचारी वृद्ध महिलेच्या डाव्या पायावरून गेल्याने अपघात झाला. यात गंभीर जखमी झालेल्या त्या वृद्ध महिलेला तत्काळ अधिक उपचारासाठी कुडाळ येथे हलविण्यात आले आहे. हा अपघात आज सकाळी साडे दहा वाजण्याच्या दरम्यान भरड भागात घडला.
याबाबतची माहिती अशी- कोल्हापूर येथील सिंधुदुर्ग ट्रान्सपोर्टची गाडी क्रमांक एम. एच. ०९-बीसी-९८१५ ही घेऊन चालक सचिन कांबळे हा सहकारी बाबू खलीफ याच्या समवेत मालवण येथे कापड, रंग साहित्याचा माल घेऊन आले होते. ते भरड भागातून बाजारपेठ येथे जात असता भरड येथील मुख्य रस्त्यावर बाजारातून घरी परतणाऱ्या तारामती परकर या वृद्ध महिलेच्या डाव्या पायावरून गाडीचे मागील चाक गेले. यात ती वृद्ध महिला गंभीर जखमी झाली. अपघात झाल्याचे दिसताच स्थानिक नागरिक कल्पक मुणगेकर, राजू आचरेकर, महेश दुदम, नीलेश गवंडी, प्रणव आचरेकर, दीपा आचरेकर, महेश शिरपुटे, सुनील लुडबे, भिवा शिरोडकर, बाबू मांजरेकर यांच्यासह अन्य नागरिकांनी धाव घेतली. अपघातात वृद्ध महिलेच्या डाव्या पायाचा चेंदामेंदा झाला होता. यावेळी घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिस कर्मचारी सुशांत पवार यांनी संबंधित मालवाहू गाडीच्या चालकाकडून अपघाताची माहिती घेत कागदपत्रे ताब्यात घेतली. स्थानिक नागरिकांनी तत्काळ रुग्णवाहिका पाचारण करत जखमी वृद्ध महिलेस तत्काळ कुडाळ येथे उपचारासाठी हलविले. घटनास्थळी वाहतूक पोलिस कर्मचारी गुरुप्रसाद परब, अमित हरमलकर दाखल झाले होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा