You are currently viewing कै.अतुल माणकेश्वर यांचा समाजकार्याचा वारसा जपला आहे कुटुंबीयांनी.

कै.अतुल माणकेश्वर यांचा समाजकार्याचा वारसा जपला आहे कुटुंबीयांनी.

रुग्णसेवेसाठी उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडीत दिली वस्तूरूप मदत.

कै. अतुल माणकेश्वर हे नाव सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या कित्येकांना आपलंसं वाटायचं ते त्यांच्या परोपकारी वृत्तीमुळे. आपला रिक्षा व्यवसाय करताना कॉटेज हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या अनेक गोरगरीब रुग्णांना वेळप्रसंगी मदतीचा हात देणारे, रुग्णसेवेचा वसा घेतल्यासारखंच अगदी रुग्णांच्या सोयीसुविधांसाठी प्रसंगी डॉक्टरांना देखील भेटून अडीअडचणी सोडवणारे अतुल माणकेश्वर हे गतवर्षीच्या पावसाळ्यात कोलगाव येथे रिक्षावर झाडाची भली मोठी फांदी पडून झालेल्या अपघातात दुर्दैवी गंभीर जखमी झाले होते. कोल्हापूर येथील हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी त्यांनी दिलेली झुंज अखेर अपयशी ठरली आणि एक सच्चा समाजसेवक काळाच्या पडद्याआड गेला.
कै.अतुलचा समाजकार्याचा वसा जपण्यासाठी व पुढे चालू ठेवण्यासाठी त्याचे कुटुंबीय पत्नी आरती, मुलगा निनाद, मुलगी अलका, सून यशवंती माणकेश्वर हे प्रयत्नशील आहेत. अतुल माणकेश्वर यांचा 3 ऑगस्ट हा वाढदिवस, या दिवसाच्या निमित्ताने आपल्या वडिलांची आठवण आणि त्यांचे समाजाप्रती असलेलं प्रेम वृद्धिंगत करण्यासाठी, त्यांचा समाजसेवेचा वारसा पुढे चालू ठेवण्यासाठी त्यांचा मुलगा निनाद माणकेश्वर आणि कुटुंबीयांनी ज्या सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाच्या परिसरात अतुल माणकेश्वर यांनी संपूर्ण हयात रिक्षा व्यवसाय केला त्याच रुग्णालयास 100 अंगावरील चादरी, 100 उशी व त्यांची कव्हर, चार ऑक्सिजन सिलिंडर स्टँड असे साहित्य भेट देत सध्याच्या कोरोनाच्या काळात रुग्णांना दिलासा दिला आहे.
यावेळी मुलगा निनाद याने आपल्या वडिलांच्या नावे समाजासाठी काहीतरी करण्याची भावना असल्याने आणि त्यांनी केलेल्या समाजसेवेचा वसा जपण्यासाठी आपल्या कुटुंबियांकडून छोटीशी मदत देत असल्याचे म्हटले आहे. यावेळी दिवंगत अतुल माणकेश्वर यांच्या पत्नी आरती, मुलगी अलका, मुलगा निनाद, सून यशवंती माणकेश्वर, शरद जामदार, साई मठकर आदी उपस्थित होते. उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडीला दिलेल्या मदतीबाबत रुग्णालयाचे डॉ.ज्ञानेश्वर दुर्भाटकर यांनी माणकेश्वर कुटुंबियांचे आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा