You are currently viewing पुराने कातकरी वस्तीची केली वाताहात …राष्ट्रवादी काँग्रेसने दिला मदतीचा हात

पुराने कातकरी वस्तीची केली वाताहात …राष्ट्रवादी काँग्रेसने दिला मदतीचा हात

कणकवली

सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली कणकवली शहरातील पूरबाधित आदिवासी कातकरी बांधवांसाठी जीवनावश्यक वस्तू तसेच संसारोपयोगी ताट, टोप, तांब्या, पेला आदी वस्तूंचे वाटप राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश संघटक सचिव काका कुडाळकर, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेल च्या वतीने कातकरी बांधवांची आरोग्य तपासणी करण्यात येऊन त्यांना मोफत औषधोपचारही करण्यात आले.

22 आणि 23 जुलै रोजी आलेल्या प्रलयकारी पुरामुळे कणकवली शहरातील निम्मेवाडी येथील आदिवासी कातकरी वस्तीच्या झोपड्यांत जानवली नदीच्या पुराचे पाणी शिरले. या पुरात कातकरी बांधवांचे सर्व संसारसाहित्य वाहून गेले. घरातील अन्नधान्य, कपडालत्ता नाहीसे झाले. आधीच हातावर पोट असलेल्या कातकरी बांधवांवर पुराने उपासमारीची वेळ आणली. कातकरी बांधव राहत असलेल्या निम्मेवाडी परिसरात दलदल झाल्यामुळे अखंड लोकमंच चे नामानंद मोडक, शैलजा कदम यांनी कातकरी बांधवांची पिसेकामते येथे तात्पुरत्या निवाऱ्याची सोय केली आहे. पिसेकामते येथील कातकरी वस्तीवर जात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी कातकरी बांधवाना 4 ऑगस्ट रोजी जीवनावश्यक तसेच संसारोपयोगी वस्तूवाटप केले.तसेच डॉक्टर सेल च्या वतीने मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषधोपचार करण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस कणकवली तालुकाध्यक्ष राजू पावसकर, कुडाळ नगरसेवक सर्फराज नाईक, चिटणीस रुपेश जाधव, डॉक्टर सेल जिल्हाध्यक्ष डॉ.लिंगावत, अखंड लोकमंच चे नामानंद मोडक, शैलजा कदम, समीर आचरेकर, सागर वारंग, सतीश जाधव, अजय जाधव, ऍड.जयराज सावंत, देवेंद्र पिळणकर, सुजय शेलार आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा