You are currently viewing सावंतवाडीची ओळख सुसंस्कृत शांत शहर.

सावंतवाडीची ओळख सुसंस्कृत शांत शहर.

का बदलतेय सावंतवाडीची संस्कृती ?

संपादकीय…..

पुण्यश्लोक बापूसाहेब महाराजांच्या पुण्याईने पवित्र झालेल्या सावंतवाडीची ओळख अवघ्या महाराष्ट्रात सुसंस्कृत शांत आणि सुव्यवस्था असलेलं सुंदर शहर अशी होती. अगदी पूर्वीपासून शहरात बऱ्याच सुखसोयी होत्या, त्यामुळे शहरवासीय देखील आनंदी समाधानी होते. भांडणे, मारामाऱ्या, गैरधंदे यांना शहरात थारा नव्हता. समाजवादी, काँग्रेसची सत्ता कित्येकवर्षे शहरावर होती. त्यानंतर विद्यमान आमदार असलेल्या दीपक केसरकर यांनी शहरावर तब्बल २३ वर्षे अधिराज्य गाजविले. त्यांच्या अधिपत्याखाली श्रीमंतांपासून सर्वसामान्य बबनराव साळगावकर सारखे संयमी नगराध्यक्ष होऊन गेले. परंतु शहराची शांतता अबाधित राहिली होती.
सावंतवाडी नगरपालिकेवर सत्तापालट झाला आणि सावंतवाडी शहरात अवैध व्यवसाय वाढले. मटक्याचा व्यवसाय पूर्वी सुद्धा होता, परंतु शहरात मटक्याचा टपऱ्या क्वचितच होत्या. गेल्या दीड वर्षात शहरात बऱ्याच ठिकाणी मटक्याचा बेकायदेशीर टपऱ्या उभ्या राहिल्या. नगरपालिकेचे मुख्याधिकारी स्वतः रस्त्यावर उतरून अशा टपऱ्यांवर कारवाई करू लागले. अशी वेळ कोणत्याही मुख्याधिकाऱ्यांवर यापूर्वी आलेली नव्हती. शहरात काही लोकप्रतिनिधींचेच अवैध व्यवसाय असल्याने सावंतवाडीत गोव्याची करमुक्त अवैध दारू अगदी घरपोच, आणि मागणी असेल त्या जागेवर मिळू लागली. स्नॅपडील, फ्लिपकार्ट, स्वीगी, झोमॅटो यांना लाजवेल एवढी तत्पर सेवा दारू व्यावसायिक सावंतवाडीत देतात. जुगाराचे अड्डे शहरात कधी डोंगरावर तर कधी बाहेरचावाडा येथे उघड्या जागेत बसू लागले. या सर्वांवर मात केली ती म्हणजे सावंतवाडीत गांजा, अंमलीपदार्थ यांची विक्री होऊ लागली आणि त्यात सहभाग आहे तो शहरातील काही उच्चभ्रू कुटुंबातील तरुण मुलांचा. त्यामुळे सावंतवाडी शहर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अंमली पदार्थांचा केंद्रबिंदू ठरले. जिल्ह्यातील सुशिक्षित सुसंस्कृत शांत शहर म्हणून ओळख असणाऱ्या शहराची अशी मानहानी का होते? याचा आता सावंतवाडी शहरवासीयांना नक्कीच विचार करावा लागेल. आज या सर्व गोष्टींवर अंमल आणला नाही तर भविष्यात घराघरातील मुलांच्या भविष्याचा प्रश्न उभा राहील यात शंकाच नाही. सावंतवाडीत अवैद्य व्यवसायात गुंतलेले पदाधिकारी कधीच दिसत नव्हते, किंबहुना केसरकरांनी अशा पदाधिकाऱ्यांना थाराच दिला नव्हता. व्हिडीओ गेमला परवानगी मिळविण्यासाठी आता एका पक्षाचा शहरातील पदाधिकारी असलेली व्यक्ती केसरकरांकडे गेली असता केसरकरांनी त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला होता. आज काही पक्षांचे पदाधिकारीच अवैध व्यवसायात असल्याने, त्यांच्या मागून फिरणारे कार्यकर्ते देवपूजा करणारे कसे काय निपजतील?
सावंतवाडी शहराच्या हिताच्या दृष्टीने कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर यापूर्वी केवळ नगराध्यक्ष आणि नगरसेवक मिळून न घेता पालिकेच्या लोकमान्य टिळक सभागृहात शहरातील प्रतिष्ठित, सुजाण नागरिकांची बैठक व्हायची. आज सावंतवाडी पालिकेत वैचारिक बैठक दिसत नाही आणि ते सुसंस्कृत विचार देखील शहर हिताच्या दृष्टीने होताना दिसत नाहीत. लोकांच्या हिताचा विषय सभागृहात मांडला जात असेल तर स्वतः नगराध्यक्ष सभागृह सोडून निघून जात शहरातील नागरिकांच्या हितापेक्षा नियम श्रेष्ठ हे दाखवतात. यापूर्वी नगरपालिकेत मासिक बैठक असताना शहरातील सुजाण नागरिकांची बैठकीतील विषय ऐकण्यासाठी सभागृहाच्या बाहेर गर्दी असायची. दीपक केसरकर नगराध्यक्ष असताना राजू मसुरकर, उमेश कोरगावकर, हे विरोधी नेते असतानाही वैचारिक पातळीवर सभागृहात न पटणाऱ्या विषयांना विरोध करायचे. सावंतवाडी शहर आणि नगरपरिषद यांचे समजवाद्यांची सत्ता असताना पासूनच जिव्हाळ्याचे एक वेगळे नाते होते. केसरकर यांनी देखील ते नाते जपले होते म्हणूनच ते आजही शहरवासीयांच्या मनावर राज्य करून आहेत.
आज शहराची वाटचाल कुठल्या दिशेने होत आहे?
सावंतवाडीतील तरुण शाळा कॉलेजमधून सुटल्यावर श्रीराम वाचन मंदिरात गर्दी करायचे, वाचन, अभ्यास याकडे जास्तीतजास्त लक्ष असायचे. आज शहरातील तरुण कुठे भरकटत आहेत? शहरातील प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या घरातील काही तरुण शहरात गांजा सारखे अंमली पदार्थ विकताना दिसत आहेत. तब्बल तीन किलो गांजा त्यांच्याकडे सापडतो आहे. त्यामुळे शहरातील तरुणांना असे अवैध धंदे करण्याचे सामर्थ्य येते ते राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांकडे पाहूनच. आपले गैरधंदे राजरोसपणे सुरू राहण्यासाठी काही गैरधंदेवाले राजकीय पक्षांशी पैशांच्या जोरावर जवळीक करतात आणि आपला स्वार्थ साधतात. अशा लोकांना जनतेची कधीच चिंता नसते असते ती फक्त आपला गैर धंदा सुरळीत चालण्याची चिंता.
आज शहरात तरुण मुले गांजा प्रकरणात अडकलेली पाहिली असता सावंतवाडीतील तरुणाईचे भविष्य अधांतरीच असल्याचे दिसून येत आहे. आपली तरुण मुले कुठे जातात, काय करतात, कोणाची संगत करतात याकडे देखील सावंतवाडीकर लोकांनी लक्ष दिले पाहिजे. अन्यथा शहरातील तरुणाई राजकीय पदाधिकाऱ्यांच्या, गैरधंद्यांच्या आणि नशेच्या आहारी जाऊन बिघडण्यास वेळ लागणार नाही, आणि त्यावेळी मुलांना आवरण्याची वेळ निघून गेलेली असेल.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × 1 =