You are currently viewing अतिवृष्टीचा भुईबावडा घाटाला फटका

अतिवृष्टीचा भुईबावडा घाटाला फटका

घाट मार्गात अगोदरच असलेली ‘ती’ भेग अधिकच झाली रुंद

वैभववाडी

तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी पावसाचा चांगलाच फटका भुईबावडा घाटाला बसला आहे. घाटाचा धोका अधिकच वाढला आहे. घाट मार्गात तब्बल शंभर मीटर अंतरात असलेली ती भेग खुपच रुंद झाली आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी हा घाट खचण्याची स्थिती निर्माण झाली आहे. भुईबावडा घाट मार्गात पावसाला सुरुवात झाल्यापासून विघ्नांची मालिका सुरूच आहे. घाटात वारंवार दरड कोसळत आहेत. दोन वर्षापूर्वी या घाटात अंदाजे १०० मीटर लांबीची भेग गेली आहे. गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसात ती भेग खुपच मोठी झाली आहे. कोणत्याही क्षणी हा रस्ता खचण्याची शक्‍यता आहे.

या ठिकाणी एका बाजूला उंच कडा आहे. तर दुसर्‍या बाजूला दरी आहे. रस्ता खचल्यास संबंधित विभागाची कोट्यावधी रुपयांची हानी होणार आहे. रस्त्याला तडा गेल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाची डोकेदुखी वाढली आहे. करुळ घाट खचल्याने वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. या मार्गावरील वाहतूक भुईबावडा घाट मार्गे वळविण्यात आली आहे. अवजड वाहतुकीमुळे भुईबावडा घाट ठिकठिकाणी खचला. धोका लक्षात घेता अवजड वाहतूक या मार्गावरून बंद करण्यात आली आहे. गुरुवारी झालेल्या अतिवृष्टीत भुईबावडा घाटाची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या घाटाकडे जातीनिशी लक्ष घालण्याची गरज आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा