केसरकरांना सेना पुन्हा पिचवर उतरवणार का?
विशेष संपादकीय…..
“सिंधुदुर्ग जिल्हा म्हणजे राणे” अशीच काहीशी परिस्थिती सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक वर्षे होती, परंतु नारायण राणेंच्या उधळत्या वारूला रोखण्याचे काम केले ते राणे यांच्या राजकीय दहशतवाद जनतेसमोर आणत सावंतवाडीचे आमदार माजी राज्यमंत्री दीपक केसरकर यांनीच. जिल्ह्यातील खासदारकीची जागा देखील राणेंकडे गेली होती, जिल्हापरिषदेत देखील राणेंच्या व्यतिरिक्त उमेदवार नसायचे त्यावेळी दीपक केसरकर यांनी राणेंच्या विरोधात दंड थोपटले आणि राणे केसरकर असा उभा संघर्ष सिंधुदुर्ग जिल्ह्यात उभा राहिला, त्यात केसरकर यांनी राणेंना एकावर एक धक्के देत बाजी मारली. शिवसेनेकडे खासदारकीची जागा तब्बल पावणेदोन लाख मतांनी पुन्हा आली. कुडाळमध्ये खुद्द नारायण राणेंना वैभव नाईक यांच्याकडून एकदा तर मुंबईत वांद्र्यात दुसऱ्यांदा पराभूत व्हावे लागले होते. केसरकरांचा जादूमुळे राणेंनी २५ वर्षे जिल्ह्यावर असलेली पकड ढिल्ली झाली आणि मरगळ असलेल्या शिवसैनिकांमध्ये पुन्हा एकदा जोश दिसून आला, शिवसेनेला जिल्ह्यात पुन्हा एकदा सोनेरी दिवस आले, आणि केसरकर राज्याचे गृहराज्यमंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री झाले.
शिवसेना महाविकास आघाडी करत पुन्हा सत्तेत आली. परंतु केसरकर यांच्या बाबत सेना नेतृवाकडे तक्रारी, तसेच जिल्ह्यात अधिकाऱ्यांवर वचक ठेवण्यात केसरकर अपयशी ठरले अशी ओरड सुरू झाल्यामुळे स्वच्छ चारित्र्याच्या केसरकरांना तीन पक्षांनी मिळून बनलेल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये डावलण्यात आले आणि रत्नागिरी येथील आमदार उदय सामंत यांना संधी देत, जिल्ह्याचे पालकमंत्री केले गेले. उदय सामंत पालकमंत्री झाले परंतु जिल्ह्याच्या शिवसेनेत हवा तसा उत्साह अजूनही दिसून आला नाही. उलट जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये सेनेला सपशेल हार पत्करावी लागली. त्यामुळे शिवसेनेला जिल्ह्याची चिंता वाटणे साहजिकच होते. परंतु सेना नेतृत्वाला जिल्ह्याची खरी परिस्थिती न समजल्यामुळे बेसावध राहिले.
भाजपाच्या केंद्रीय स्तरावरून सिंधुदुर्ग जिल्ह्यात पक्षाला मिळणारी सत्तेची संधी वाया घालवायची नव्हती, कोकणात हातपाय पसरायचे तर कोकणातील नेतृत्वाला बळ देणे गरजेचे असल्याचे दिसून आल्याने अमित शहा यांनी कोकण दौऱ्यात नारायण राणे यांना संधी देण्याचे सूतोवाच केले होते. ते खरे करत केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात राणेंकडे सूक्ष्म लघु उद्योग मंत्रालयाची कॅबिनेट मंत्रिपदाची जबाबदारी देत कोकणासह मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची तयारी सुरू केली. राज्याच्या राजकारणात राणेंना शह दिला होता तो केवळ दीपक केसरकर यांनीच, परंतु त्यांनाच डावलून सेनेने राणेंना पुन्हा मुसंडी मारण्याची संधी दिली. राणेंना मिळालेल्या संधीचे राणे सोने करणार आणि भाजपाला जिल्ह्यात अच्छेदिन येणार या भीतीपोटी सेना नेतृत्व जागृत झाले आणि गेली दोन वर्षे सेनेच्या निर्णयात कुठेही दिसत नसणारे दीपक केसरकर पुन्हा एकदा जिल्ह्यात सेनेच्या नेत्यांसोबत एकत्र व्यासपीठावर, पत्रकार परिषदेमध्ये दिसू लागले. केसरकर अचानक सक्रिय झाल्यामुळे केसरकरांना कोणी सक्रिय केलं हा प्रश्न आज जिल्हावासीयांना पडला आहे.
गेली दोन वर्षे केसरकरांनी आणलेले कोणतेही प्रोजेक्ट सुरू केले नाहीत, चांदा ते बांदा योजना बंद केली, सावंतवाडीत होणारे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अजूनही जागेच्या प्रतीक्षेत, सावंतवाडी टर्मिनस जैसे थे परिस्थिती, आडाळी एमआयडीसी मध्ये अजूनही उद्योगधंदे आले नाहीत, असे एक ना अनेक केसरकरांचे निर्णय पुढे काहीही न करता जैसे थे ठेवले. त्यामुळे जिल्ह्यातील मतदारांवर शिवसेना नेत्यांच्या भूमिकेमुळे विपरीत परिणाम झाला आणि पारडे राणेंच्या बाजूने झुकायला लागले. भाजपाने राणेंना बळ दिल्यामुळे जिल्ह्यात पुन्हा राणेंचा वरचष्मा राहील आणि सेनेला पिछाडीवर पडण्याची वेळ येईल अशी स्थिती निर्माण झाल्यामुळे सेनेच्या वरिष्ठ पातळीवरील खडबडून जाग्या झालेल्या सेना नेतृत्वाने खासदार राऊत यांना जिल्ह्यात सेनेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून सेनेच्या सैनिकांना सांभाळण्याचे आदेश देण्यात आले. त्यामुळेच खासदार राऊत यांनी राणेंच्या समर्थकांमध्ये वाढलेला उत्साह व शिवसैनिकांमध्ये आलेली मरगळ पाहून ओरोस येथील आपल्या संपर्क कार्यालयात सेनेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या अडचणी समजून घेतला..
नारायण राणेंना भाजपाने केंद्रात संधी दिल्याने जिल्ह्यात त्यांना टक्कर देण्यासाठी केसरकरांना सेना नेतृत्व पुढे करत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे दीपक केसरकरांना अचानकपणे कोणी सक्रिय केले असा प्रश्न शिवसैनिक व जिल्हवासीयांना पडला आहे. राणेंकडे मंत्रिपद असल्याने राणे विकासात्मक काम करू शकतात, परंतु आमदार असलेले केसरकर त्यांना टक्कर देताना मात्र कमी पडतील, त्यामुळे सेना नेतृत्व केसरकरांना कॅबिनेट मंत्रिपद देऊन राणेंच्या विरोधात उभे ठाकेल काय हा प्रश्न मात्र अजूनही निरुत्तर आहे.