You are currently viewing प्रिय.. एक ओळ तुझ्यासाठी

प्रिय.. एक ओळ तुझ्यासाठी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सदस्या कवयित्री माधवी देवळाणकर यांच्या “प्रिय…एक ओळ तुझ्यासाठी” या काव्यसंग्रहाचे श्री.अरुण विघ्ने यांनी केलेले सुंदर रसग्रहण*

“प्रितीच्या आठवांचा हळवा पदर उलघडणारी कविता : प्रिय.. एक ओळ तुझ्यासाठी “

—————————————-

मनाच्या छटा अनंत असतात,त्यांचा थांग लागणे अशक्य आहे . ते आत्ताच इथे तर लगेच कुठे , अशी मनाची अवस्था असते . कधी पाखरु होऊन इतरत्र स्वच्छंद भटकते तर कधी आसपासच घुटमळते, कधी अत्यानंद देते तर कधी वेदना देते . मनाच्या विविध अवस्थेचं चित्रण करणा-या कवयित्री बहिणाबाईं चौधरी यांच्या ओळी येथे आठवल्याशिवाय राहत नाही .’ मन वढाय वढाय ‘

” मन वढाय वढाय

उभ्या पीकांतलं ढोर,

किती हांकला हांकला

फिरी येतं पिकावर

 

मन पांखरू पांखरूं

त्याची काय सांगूं मात ?

आतां व्हतं भुईवर

गेलं गेलं आभायांत.

कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची ही अहिराणी बोलीतील कवितेच्या ओळी मनाच्या स्वच्छंदी रुपाविषयी खुपकाही सांगून जातात. मन कधी पाखरु, कधी वासरू,तर कधी मोकाट ढोर होवून कुठेही हुंदळत असते .अशीच काहीशी अवस्था प्रत्येक मानवी मनाची असते. कवयित्री माधवी देवळाणकर यांनी आपला पहिलाच कवितासंग्रह ‘ प्रिय… एक ओळ तुझ्यासाठी ‘ हा वाचकांच्या पुढ्यात ठेवला आहे . प्रियकराच्या विरहात जगणा-या एका प्रेयशीच्या मनाची घालमेल कवयित्रीने  या दीर्घकावितेतून रेखाटल्याची अनुभूती वाचकाला येते. कवयित्री माधवी यांची कविता प्रेमाविषयीच्या मनातील आठवांतून तास न् तास शब्दाद्वारे सख्याशी संवाद साधतांना दिसते . प्रियकराच्या आठवणीत(विरहात) या दीर्घकवितेत प्रेयसीने किती अश्रू ढाळले असतील याचा अंदाज आपल्याला ,ही कविता वाचल्यावर आल्यावाचून राहत नाही . प्रत्येक क्षणाला ती आपल्या प्रेमाला आठवत असते, त्याच्या सोबतच्या गतकालीन आठवांच्या झुल्यावर मनसोक्त झुलत असते. कधी हसते, कधी रडते ,कधी रुसते, कधी चिडते तर कधी अस्वस्थ होऊन भान हरपून जाते . प्रेयसीने आपल्या प्रेमाच्या प्रत्येक आठवणीत आपल्या ‘प्रिय…..’ साठी एक ओळ साकारली आहे . या विषयातूनच  कवयित्रीने आपली पहिली वहीली एक भावस्पर्शी साहित्यकृती साकारली आहे.

डाँ.कैलास अंभुरे हे आपल्या प्रस्तावनेत म्हणतात की , ” प्रत्येकाच्या आयुष्यात पहिलेपणाला अनन्यसाधारण महत्व असते, व्यवहारी जगात पहिलं असणं..पहिलं येणं जसं महत्वाचं असतं तसंच पहिलं प्रेम, पहिल्या प्रीतीची अनुभूती, पहिला विरह, पहिली मैत्री इत्यादी स्वजीवनातील पहिलेपणाच्या स्मृतींचा दरवळ मनाच्या गाभा-यात खोलवर रुजून बसलेला असतो. त्या अलवार ,आल्हाददायक स्मृतिचेतना ‘स्व’ ला प्रसन्न करतात तर कधी दुख-या खपल्या अस्वस्थ करतात .स्वस्थ, अस्वस्थता,ऊन-सावल्या, सुख-दुःखात्म स्मृती भावतरंग हा कवयित्री माधवींच्या ‘प्रिय… एक ओळ तुझ्यासाठी’ चा गाभा आहे .”

” बहुतेक पावसाळ्याचे दिवस होते

पण पाऊस पडत नव्हता

उगाच आभाळ दाटून आलेले

तू म्हणालास ,

‘आज पाऊस यायला हवा’

पण माझे शब्द मौन झालेले

हळुवार माझा हात पकडत

तू बोललास…!”

प्रेयसी आपल्या कवितेतून आपल्या आभासी प्रियकराशी बोलत असते, पावसाचे ढग जसे नभात दाटून येतात तशा मनात दाटून आलेल्या आठवांना ती उजाळा देत असते. या कवितेत प्रेयसीचा एकेरी संवाद दिसतो, पुढच्या व्यक्तीचा मात्र संवादात्मक प्रतिसाद यात फारसा दिसत नाही . दुसरी व्यक्ती आभासी की वास्तव हे कळायला मार्ग नाही.  कुठेतरी त्याचे आलेले ” बोल कशी आहेस ? , जप स्वतःला.. काळजी घे ! ” असे एक-दोन शब्द एखाद्या रचनेमध्ये केव्हातरी डोकावतांना वाचकांना दिसतात. पण प्रेयसी सारखी त्याचेशी बोलत असते. प्रत्येक कविता ही प्रिय…च्या गुपीत नावाने ‘एक ओळ’ म्हणून लिहिल्या गेलेली दिसते . प्रेयशी केंव्हा रुसते, तर केव्हा आनंदीत होते. केव्हा निर्वाणीची भाषा करते तर कधी त्याला परत येण्यासाठी साद घालते .

” पण आता कल्पनेतून

तुझी मूर्ती मी स्पष्ट

रेखाटू शकते

येशील ना तू

तुझी मूर्तीमंत कल्पना

बघण्यासाठी ? ”

माधवी यांची कविता वाचकांना खिळवून ठेवते, उत्सुकता तानून ठेवते . पुढे काय होणार ? तो तीला भेटणार की नाही? याची उत्सुकता तानली जाते .तो येईल काय ?, तो फोन तरी करेल काय ? त्याचेशी समेट घडून येईल काय ? तिच्या विणवनीला तो साद घालेल काय ? तो कुठे गेला असेल ? प्रियकर आणि प्रेयसीचा वाद झाला असावा का ? की तो या जगातच नसावा ? असे अनेक प्रश्न वाचकांच्या मनात रुंजी घालत असतात . असीच अवस्था या कवितेत प्रेयसीची कवयित्रीने साकारली आहे .

” नव्हतेच तसे काही वाद तुझ्यामाझ्यामध्ये

जात,धर्म,रंग आणि वेशभूषेचे

पण निश्चितपणे काही तरी

तुटत तुटत दूरवर जात गेले ! ”

का झाली असावी अशी ताटातूट दोन जीवांची ? याविषयी प्रियकराच्या मनाच्या पोकळीचा तिला कधीच थांग लागला नसल्याची भावना ती व्यक्त करते . तसंही एका व्यक्तिचं दुस-या व्यक्तीला मन पूर्णतः जाणता येत नाही .ती विणवनीच्या स्वरात त्याला हा गुंता सोडविण्याची गळ घालते पण सर्व प्रयत्न व्यर्थ ठरतांना दिसतात . हा गुंता कसा वाढत गेला काहीच कळायला मार्ग नाही.

” आणि तू मात्र, दरवाजा उघडून

बाहेर पाऊल ठेवलेस

परत कधीही न येण्यासाठी

पण मी मात्र थांबले चौकटीतच

तुझ्या बोलण्यावर अजूनही

विश्वास आहे यासाठी !”

रुसने,फुगने,रडणे, हसणे ,किरकोळ वाद होणे या बाबी संसारात अथवा प्रेमात नित्याच्याच असतात.

दोघात वाद होऊन प्रियकर तिला न सांगताच घरातून निघून गेला असावा . असे वाचकांना वाटून गेल्याशिवाय राहात नाही .पण प्रेयसी मात्र स्त्री या नात्याने रुढी, परंपरेच्या व नात्याच्या चौकटीतच अडकून पडते प्रियकराची वाट बघत . येथेही कवयित्रीने वाचकांचा संभ्रम वाढविल्याचे दिसते.  वारंवार घडणा-या अशा गोष्टीचा अचानक एका वळणावर अंत व्हायला सुरूवात होते.

” आता मी खरंच थकले रे

ह्या गाठी उकलताना

ही अशी कोणती गाठ

तू मारलीस न उकलण्यासाठी

पण येशीलच तू हळूवारपणे ती गाठ

उकलण्यासाठी

म्हणून’ प्रिय…ही एक ओळ तुझ्यासाठी!”

प्रेयसीच्या मनात आठवणींचा पुरता गुंता झाला आहे . दोघांच्या प्रीतीची गाठ घट्ट बांधल्या गेली आहे आणि ही गाठ उकलण्यासाठी कधितरी तो येईल, अशी तिला आशा वाटते . पण कधीही परत न येणा-या आपल्या प्रियकराच्या वाटेकडे डोळे लाऊन बसलेली प्रेयसी नाना प्रयत्नातून काव्यरुपाने त्याला मनोमन समाजविण्याचा पूर्ण प्रयत्न करते . त्याच्या भासाची तीला होणारी चाहूल तीला  सहन होत नाही . ऋणानुबंधाच्या गाठी अलगद सोडविता आल्या असत्या तर किती बरे झाले असते ? परंतु ही गाठ मात्र सुटताना दिसत नाही . तेव्हा ती व्यथीत होते, मनातून खचून जाते . पण आठवांचं चक्रीवादळ पुन्हा पुन्हा तिच्या मनाच्या परमोच्च शिखरावर घोंगावतच राहतं .तिची प्रतिक्षा अजूनही संपत नाही. ती डोळ्यात प्राण आणून त्याची वाट बघते .

” दारावरच्या रांगोळीत

मी तव आठवांचे रंग भरते

दोन दीप माझ्या लोचनांचे

तव प्रतिक्षेत लावते ! ”

प्रेम म्हणजे काय असतं ? कोणत्या शब्दात, व्याख्येत बसवायचं या प्रेमाच्या मोहराला? या बुचकाळ्यात ती पडते. डोळ्यात प्राण आणून आपल्या प्रियकराची वाट बघून ती आता हताश, निराश होऊन निर्वाणीची भाषा बोलू लागते आणि नाईलाजास्तव एका निर्णयापर्यंत पोहचते .

” नाही जमत रे मला

ह्या व्यवहारी जगात

तुझ्यासारखे मन मारून जगणे

एकदा येवून जा,

एकतर मला शहाणे करण्यासाठी,

नाहीतर मला पूर्ण वेड लावण्यासाठी !”

त्याला विणवनी करून शेवटची संधी देण्याचं ती ठरविते, तो आल्यावर कदाचित ती शहाणी होईल अथवा तो येण्याच्या आनंदात वेडी होईल, असं तीला वाटतं .परंतु काहीही होवो , तो एकदा आला पाहिजे, डोळ्याला डोळा भिडला पाहिजे, हृदयाला हृदय भिडले पाहिजे . असे तिला वाटत राहते . पण अनेक प्रकाराने त्याला साद घालूनही तिची मनोकामना पूर्ण होतांना तिला दिसत नाही . तेव्हा तिच्या मनातील त्याच्या आठवणींना तिलांजली देऊन कायमचं मुक्त होण्याचं ती ठरविते .

” पण प्रिय आता मात्र

द्यावा म्हणते एक निरोप

ह्या सा-या आठवणींना

माझ्यातून मुक्त होण्यासाठी..!”

काळीज कप्प्यात खोलवर जपलेल्या प्रीतीच्या त्या आठवणी विसरून नवीन आयुष्याला सुरूवात करायला पाहिजे, असं तिच्या मनाला वाटून जानं स्वाभाविक आहे . पण हे बोलण्याइतपत एवढंही सोपं नसतं .जेव्हा समेट घडवून आणण्याचा माणसासमोर दुसरा कोणताच पर्याय नसतो, तेव्हा एकमेकाला विसरून जाणेच सोईस्कर असते . हे जेव्हा त्या व्यक्तीला कळून येते, तेव्हा नाईलाजास्तव ती व्यक्ती शेवटच्या निर्णयाप्रत पोहचते . का निर्णय घेऊ नये, कुठवर त्याच्या येण्याकडे दोन डोळ्यांचे दिवे लाऊन बसायचे ? स्त्रीनेच का सहन करावं ? अशी भावना मनात निर्माण होऊन जाते .

” एक कर

शेवटचा दोर आपल्यातला

कापून टाक

मला शांतपणे तळ गांठण्यासाठी !”

प्रेयसी आपलं सर्वस्व प्रियकराला बहाल करते . अर्पण करायचं काहीच शिल्लक राहत नाही . आता तीचे अनावर मन रागाच्या चितेवर जळताना शरीरातील अग्नी तांडव तिला असह्य होत असतो. प्रेयसीला वाटते आता त्याने या अग्नीज्वालात सामील होण्यासाठी माझे दिशेने येण्यासाठी पुढे पाऊल टाकू नये. कारण आता ते कदाचित शक्यही नाही .आणि आता तिचा अखेरचा क्षणही समीप आला असल्याचे ती कवितेतून बोलून दाखविते .

” विरत गेले धागे

सुटले सारे पाश

नियतीच्या अगम्य खेळाने

हातातून सुटला हात !”

अशाप्रकारे प्रीतीच्या अग्नीकुंडात एकटीच जळत असते . यामुळे तिच्या मनात पठारावस्था येते . ही एकतर्फी प्रेम कहाणी की हरविलेलं प्रेम मात्र कवयित्रीने खुपच मोजक्या शब्दात आणि लयपूर्ण मुक्तछंदात हाताळलं आहे . यात कवयित्रीचा निश्चितच कस लागलेला दिसतो . एक वेगळा प्रयोग कवयित्रीने या साहित्यकृतीत केलेला दिसतो . नव रसात तीने ही कविता साकारली आहे . सहज, साद्या, सोप्या शब्दात तिने प्रेयसीच्या मनाची तळमळ वाचकांच्या हृदयापर्यंत पोहचविली आहे . ती यात यशस्वीही झालेली दिसते . स्त्री ही अनादी काळापासूनच उपेक्षीत राहिलेली आहे . ती आपल्या प्रियकरावर जिवापाड प्रेम करते पण तो तिच्या प्रेमाला प्रतिसाद देत नसल्याचे या कवितेतून कळते. प्रीतीच्या आठवांचा हळूवार उलगडलेला पदर म्हणजे ही कविता आहे . प्रेमानंतरचा विरह आणि त्या विरहाची धग यामुळे या विरहाला आणि प्रीतीच्या स्मृतिला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झालेले दिसते. ब-याच बाबींचा खुलासा यात झालेला दिसत नाही.  यात ती व्यक्त होऊनही अव्यक्त असल्याची जाणिव होते. त्यामुळे वाचकाच्या मनात संभ्रम निर्माण होतो . उत्सुकता तानल्या गेली आहे आणि शेवटीही ती कायम असल्याचे दिसते . कवितेच्या जगतात एक नवा प्रयोग वाटतो . गोदा प्रकाशन, औरंगाबाद यांनी प्रकाशीत केलेल्या या कविसंग्रहाची प्रस्तावना डाँ. कैलास अंभुरे, औरंगाबाद यांनी लिहीली आहे . मुखपृष्ठ अरविंद शेलार यांनी कलात्मकरीत्या रेखाटले आहे . कवितासंग्रहाचे शीर्षकही अतिशय बोलके आहे . या साहित्यकृतीबाबत कवयित्री माधवी देवळाणकर यांचे अभिनंदन व पुढील साहित्यनिर्मितीसाठी हार्दिक शुभेच्छा .

 

अरुण हरिभाऊ विघ्ने

आर्वी, वर्धा

—————————————————–

कवयित्री : माधवी देवळाणकर

कवितासंग्रह : प्रिय.. एक ओळ तुझ्यासाठी

प्रकाशन : गोदा प्रकाशन, औरंगाबाद

पृष्ठसंख्या : ९६

मूल्य : १५०/- ₹

प्रतिक्रिया व्यक्त करा

nineteen − thirteen =