सावंतवाडीत ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई;२१ लाखांची वसुली

सावंतवाडीत ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई;२१ लाखांची वसुली

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) 

तालुक्‍यामध्ये मोठ्या प्रमाणात होणारी ओव्हरलोड वाहतूक रोखताना येथील महसूल विभागाने वाळू, काळा दगड, जांभा दगड, माती आदींच्या वाहतुकीतून वर्षभरात तब्बल 21 लाख 70 हजार 966 रुपयांचा दंड वसूल केला. यात 16 डंपरवर ही कारवा२१ई करण्यात आला, अशी माहिती नायब तहसीलदार प्रदीप पवार यांनी दिली. जिल्ह्यात अनधिकृत गौण खनिज वाहतुकीवर महसूल विभागाची बारकाईने नजर आहे. दिवसा व रात्री चोरट्या पद्धतीने होणारी वाहतूक रोखण्यासाठी महसूल विभागाचे पथकच तैनात असते. त्यामुळे बऱ्याचवेळा अनधिकृत वाहतुकीवर कारवाई करुन महसुलकडून एकप्रकारे अशा वाहतुकीला चाप लावण्यात येतो.

ओव्हरलोड तसेच अनधिकृत बिनापास होणाऱ्या वाहतुकीवर सामाजिक कार्यकर्त्यांकडून आवाज उठवताना कारवाईची मागणी वेळोवेळी होते.

तालुक्‍यात काळा दगडाच्या खाणी मोठ्या प्रमाणात आहेत. या खाणीतून होणारे दगड उत्खनन महसुलची नजर चुकवून ओव्हरलोड पद्धतीने केली जाते. चोरट्या पद्धतीची वाळू वाहतुकही होते. चोरट्या पद्धतीच्या वाळूचे दर हे कमी असल्याने त्याला मोठी मागणी आहे. त्यामुळेच अशी वाळू वाहतुक सिंधुदुर्ग जिल्ह्यातून गोवा राज्यात सऱ्हास केली जाते. जांभा दगडही ओव्हरलोड पद्धतीने बऱ्याचवेळा वाहतूक केला जातो. त्यामुळे बऱ्याच डंपर मालकांना महसूलच्या कारवाईला सामोरे जावे लागते.

– शुभमंगल करताना नो सावधान, कोरोनाचा कहर असतानाही लग्नांचा जोर

सावंतवाडी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्या सूचनेनुसार महसूलचे पथक अशा वाहतुकीवर करडी नजर ठेवून आहे. त्यामुळे एप्रिल 2020 ते फेब्रुवारी 2021 पर्यंत अशा अनधिकृत तसेच ओव्हरलोड वाहतुकीवर कारवाई करताना तब्बल 21 लाख 17 हजार 966 रुपयाचा दंड वसूल करण्यात आला. यामध्ये एकूण 16 डंपरवर कारवाई करण्यात आली आहे. दोन डंपर अद्यापही येथील महसूलच्या ताब्यात असून ते सडत आहेत. अलीकडेच चार डंपरवर वाळूची चोरट्या पद्धतीने वाहतूक करताना कारवाई करण्यात आली आहे. त्यापैकी एक डंपर तहसील कार्यालय परिसरातून चोरून नेला असून त्याच्यावर येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वर्षभरातील कारवाई

तीन डंपर अद्यापही महसूलच्या ताब्यात असून त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आलेली नाही. वर्षभरामध्ये झालेल्या कारवाईमध्ये अनधिकृत वाळूच्या माध्यमातून 10 लाख 21 हजार 116 रुपयांचा दंड, काळा दगड वाहतुकीतून आठ लाख 53 हजार 300 रुपये तर जांभा दगड वाहतुकीतून दोन लाख 43 हजार 550 रुपये दंड वसूल करण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा