You are currently viewing मणेरी येथे संरक्षक भिंत बांधण्यास जीवन प्राधिकरणचा हिरवा कंदील

मणेरी येथे संरक्षक भिंत बांधण्यास जीवन प्राधिकरणचा हिरवा कंदील

पं. स. सदस्य धनश्री गवस यांच्या मागणीची घेतली दखल

दोडामार्ग

दोडामार्ग तालुक्यातील तिलारी नदीवर मणेरी येथे संरक्षक भिंत उभारण्यात यावी असे आदेश महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला द्यावेत या मागणीचे निवेदन पं. स. सदस्य धनश्री गवस यांनी पालकमंत्री उदय सामंत तथा आमदार दीपक केसरकर यांच्याकडे दिले होते. गवस यांच्या या मागणीची दखल घेत आमदार केसरकर यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे सदस्य सचिव किशोर राजे निबांळकर यांना मणेरी येथे सरंक्षक भीत बांधण्यात यावी याबाबतचे आदेश निर्गमित करावेत अशी सूचना एका पत्राद्वारे केली आहे.

तिलारी धरणाचे पाणी वेंगुर्ल्यापर्यंत नेण्यासाठी महाराष्ट्र प्राधिकरण सुमारे मोठी योजना राबवीत आहे. त्यासाठी मणेरी येथे नदीवर मोठा बंधारा बांधून ते अडवलेले पाणी पाईपलाईनद्वारे सावंतवाडी व वेंगुर्ले येथे द्यावयाचे आहे. या बंधाऱ्यामुळे पावसाळ्यात अनेक झाडे अडकल्यामुळे तसेच तिलारी धरणाच्या अतिरिक्त पाणी सोडल्यामुळे ते सर्व पाणी मणेरी बडमेवाडी येथील ग्रामस्थांच्या शेती, बागायती व घरामध्ये घुसते. दरवर्षी तेथे पूरपरिस्थिती निर्माण होते. गेल्या दोन वर्षांमध्ये पुराच्या पाण्यामुळे शेतकर्‍यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. मात्र शासनाने कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई अद्यापपर्यंत दिलेली नाही.

भविष्यात दरवर्षी उद्भवणार्‍या संकटांवर कायमस्वरूपी उपाय म्हणून या बंदरापासून मणेरी पुलापर्यंत दोन्ही बाजूने संरक्षक भिंत उभारण्याचे आदेश देण्यात यावेत अशी मागणी धनश्री गवस यांनी केली होती. तसेच गवस यांनी ही सरंक्षक भिंत उभारण्यात यावी यासाठी पालकमंत्री उदय सामंत व आमदार दीपक केसरकर यांच्याकडे सतत पाठपुरावा करत होत्या. त्यांच्या याच मागणीची दखल घेत आमदार केसरकर यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सदस्य सचिव निबांळकर यांना सरंक्षक भिंत उभारण्यात यावी असे आदेश आपल्या स्तरावरून निर्गमित करावेत अशी सूचना दिलेल्या पत्राद्वारे केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

ten − 2 =