पोलिसांची भीती दाखवून केल्या जाणाऱ्या अँटीजन टेस्टमुळे रुग्ण वाढण्याचीच भीती..

पोलिसांची भीती दाखवून केल्या जाणाऱ्या अँटीजन टेस्टमुळे रुग्ण वाढण्याचीच भीती..

देवगड :

 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सकाळी ७.०० ते संध्याकाळी ४.०० वाजेपर्यंत बाजारपेठांमध्ये खरेदीची मुभा आहे, त्यामुदतीत बाजारपेठेमध्ये गर्दी असते, परंतु त्यानंतर कोणत्याही कामासाठी बाजारपेठांमध्ये गेल्यास नगरपालिका कर्मचाऱ्यांकडून पोलिसांची भीती दाखवत नागरिकांची अँटीजन टेस्ट केली जाते. परंतु ही टेस्ट करणारे नगरपालिका कर्मचारी प्रशिक्षित आहेत का? आरोग्य विभागाकडून संपूर्ण सुरक्षितता पाळून केली जाणारी कोरोना टेस्ट नगरपालिका कर्मचारी कोणतीही खबरदारी न घेता, पीपीई किट न घालता, एकच हॅन्डग्लोज सर्वांची टेस्ट करताना वापरल्याने ज्यांची जबरदस्ती तपासणी करतात त्यांच्यासाठी आणि स्वतः त्या नगरपालिका कर्मचाऱ्यांसाठी हे धोकादायक नाही का? या अशा चुकीच्या तपासणीमुळे कोरोनाचा प्रसार जास्त होणार नाही का?

देवगड नगरपालिकेकडून संध्याकाळी ४.०० नंतर फिरणाऱ्या लोकांची वाहने थांबवून पोलिसांच्या धाकात साई ट्रॅव्हल्स समोर जबरदस्ती कोरोनाची अँटीजन तपासणी केली जात आहे. ही तपासणी करतेवेळी आरोग्य कर्मचाऱ्यांना सोबत न घेता अप्रशिक्षित पालिका कर्मचाऱ्यांकडून ही तपासणी केली जात आहे, ज्यात तपासणी करिता वापरला जाणारा प्लास्टिकची पट्टी नाकात अर्धवट घालून काही सेकंदात काढली जाते, व तपासणी केली जाते. त्यामुळे तपासणी अहवाल देखील चुकीचा येतो आणि तपासणीचा काहीही उपयोग होत नाही. उलट अशाप्रकारे तपासणीसाठी जबरदस्ती लोकांना थांबवून कोणतीही सुरक्षितता न पाळता एकच व्यक्ती अनेकांची तपासणी करत असल्याने कोरोना कमी होण्यापेक्षा  कोरोनाचे संक्रमण वाढण्याचीच भीती जास्त आहे.

नगरपालिका कर्मचाऱयांकडून अशाप्रकारे होणारी तपासणी कोरोना वाढीसाठी कारणीभूत ठरू शकते. नगरपालिका प्रशासनाला तपासणी करायचीच असेल आणि खरोखरंच रुग्णसंख्या कमी करायची असेल तर प्रशिक्षित, आरोग्य कर्मचाऱ्यांकडून पीपीई किट घालून सुरक्षितपणे तपासणी करावी जेणेकरून चुकीच्या पद्धतीने तपासणी केल्याने निगेटिव्ह असलेले नागरिक विनाकारण पॉझिटिव्ह होण्याची शक्यता आहे. नगरपालिका प्रशासनाकडून याबाबत योग्य तो विचार व्हावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा