सावंतवाडी शहरात अनेक भागात पाणी टंचाई

सावंतवाडी शहरात अनेक भागात पाणी टंचाई

सत्ताधारी नागरिकांना छळणारच काय?

संपादकीय….

सावंतवाडी शहर हे कधीही पाणी टंचाईग्रस्त म्हणून ऐकिवात नव्हते, भविष्यात पाणी टंचाई होऊ नये म्हणून गोडबोले गेटची उंची देखील वाढविली होती, परंतु गेल्या दीड वर्षातच सावंतवाडीत पाणी टंचाई का होते? असा प्रश्न शहरातील नागरिक उपस्थित करत आहेत. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी सावंतवाडीतील नागरिकांना छळण्याचेच ठरवले की काय? असाही सूर सावंतवाडीत ऐकू येत आहे. शहरात वर्षभर दोन वेळा पाणी यायचे, क्वचित प्रसंगी काही भागात काही दिवस एकवेळ पाणी येत होते. अन्यथा मे, जून महिन्यात देखील दोनवेळा पाणी शहरात पुरविले जायचे. परंतु ही पहिलीच वेळ आहे. सावंतवाडीकर नागरिक पाण्याच्या नावाने टाहो फोडताना दिसताहेत. सत्ताधारी गटाच्या राजू बेग यांनी पालिकेसमोर कळशी आंदोलनही केले होते.

पाणी टंचाईग्रस्त भागातील नागरिकांनी नगरपालिकेच्या संबंधित विभागाकडे अनेकवेळा तक्रारी केल्या, लोकप्रतिनिधीना देखील सांगितले परंतु त्यांच्याकडूनही समस्या सोडवली जात नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत. २३ मार्च रोजी शहरातील माजी नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने सावंतवाडी नगरपालिकेचे मुख्याधिकारी जावडेकर यांची नगरपरिषद कार्यालयात भेट घेत सविस्तर माहिती दिली होती. मुख्याधिकारी यांनी कोणताही तोडगा काढलेला नाही. मुख्याधिकारी व सत्ताधारी यांच्यातच समन्वय नसल्याने दोघांनी मिळून सावंतवाडीतील नागरिकांना छळण्याचेच ठरविल्याचे प्रथम दर्शनी दिसत आहे.
सावंतवाडीत गेले पंधरा दिवस पाऊस सुरू आहे, त्यामुळे पाणीसाठा देखील वाढला आहे. परंतु निवडणुकांमध्ये शहराला २४ तास पाणी म्हणणारे शहराच्या काही भागात एकवेळ सुद्धा पाणी पुरवठा करू शकले नाहीत. त्यामुळे शहरातील टंचाईग्रस्त नागरिक नगरपालिका कार्यालयात तक्रारी करत आहेत. मध्यंतरी नगराध्यक्षांनी मुख्याधिकाऱ्यांना पाणी पुरवठा सुरळीत करण्याबाबत सूचना केल्या होत्या, परंतु त्या सुचनेचे नक्की काय झाले हे गुलदस्त्यात राहिले आहे आणि शहरातील नागरिक मात्र त्रस्त झाले आहेत. शहरात पाण्यासाठी च्या फक्त घोषणा होतात, परंतु कारवाई शून्य होत असल्याने शहराला पूर्वीप्रमाणे दोन वेळा पाणी पुरवठा सुरळीतपणे सुरू न झाल्यास नगरपालिके विरोधात आंदोलन केले जाईल, असे सावंतवाडीतील सुजाण नागरिकांनी जाहीर केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा