“जर ‘हे’ आहे..तर मग “ते”का नाही???

“जर ‘हे’ आहे..तर मग “ते”का नाही???

कोकणं हा भारत वर्षातील अतिशय सुंदर प्रदेश, जैवविविधता, अथांग समुंद्र, नारळी, पोफळी, आंबे, जांभुळ, करवंद, कोकम, केळी अशा विविध फळानी आणि रंगीबेरंगी फुलांनी नटलेला, सजलेला हा प्रदेश. या देशात नावलौकीक मिळवलेले थोर साहित्यिक आणि सरस्वती पुत्र याच भूमीतले, खेळ जगतात आपला झेंडा फडकवणारे पराक्रमी खेळाडू याच कोकणातले, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय राजकारणात आपल्या कुशाग्र बुद्धीचा ठसा उमटवणारे काही राजकारणी याचं भूमातेचे सुपूत्र, कला, क्रिडा, समाजकारण, राजकारण, आरोग्य, संशोधन एवढचं. काय देशाच्या सिमेवर तळहातावर शिर घेऊन अहोरात्र भारतमातेच्या सेवेसाठी कटीबद्ध असलेले आमचे शुर सैनिक याच परशूरामाच्या भूमीतले. महाराष्ट्रालाचं नव्हे तर अवघ्या भारतवर्षाला दिशा देण्याचे काम करणारे, प्रबोधन करणारे अनेक विचारवंत याच भूमीतले. लोकशाहीच्या चौथ्या खांबाचे पावित्र्य जपणारे काही पत्रकार या आणि याच कोकणातले. अशा या परिपूर्ण प्रतिभासंपन्न आणि निसर्गाने भरभरून दिलेल्या आमच्या कोकणात आजची जी परिस्थिती निर्माण झाली त्याची नेमकी कारणे कोणती?
७२० कि.मी.चा अथांग समुद्र किनारा लाभलेल्या या जिल्ह्यात का नाही मस्यविद्यापिठ झाल? मस्यव्यवसायाशी निगडित का नाही पुरकं व्यवसाय निर्माण झाले? देवगडचा हापूस हा फळांचा राजा. जगात प्रसिद्ध असलेल्या या आ़ंब्याला जगाच्या नकाशावर आणण्यासाठी का एवढा उशीर झाला? पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे आमच्या कोकणात कां नाही शेतीपूरक व्यवसाय उभे राहू शकले? तरुण युवकांच्या हाताला काम नाही… म्हणून गुन्हेगारीकडे वळणाऱ्या तरुणांना आपण कां नाही रोजगार देवू शकलो? पश्चिम घाट म्हणजे जैवविविधतेचं दुर्मिळ भांडार. औषधी वनस्पतींचा लाखमोलाचा ठेवा.. का नाही आपण त्यावर संशोधन करून औषधी वनस्पतीचा उपयोग मानवी आरोग्यासाठी का नाही करू शकलो. भारतीय सैन्यात सह्याद्रीच्या कुशीत रहाणारे अनेक आमचे बंधू सैन्यात आहेत.यचा विचार करुन साताऱ्याच्या धर्तीवर आपण सैनिकी प्रशिक्षण अँकँडमीचा का नाही विचार करु शकलो?  कोकणातील बागायतदाराना शेतीविषयक प्रशिक्षण देण्यासाठी व त्यांच्या मालाला मार्केट उपलब्ध करून देण्यासाठी आपण का नाही कधीच विचार केला?शासनमान्य एखादं व्यापक स्वरुपाचे शैक्षणिक संकुल का नाही निर्माण झाल? प्रक्रिया उद्योगाना चालना देवून महिला सबलीकरणाच्या दिशेने पावलं का नाही उचलली गेली?शैक्षणिक प्रगतीत कायम आघाडीवर असलेल्या या जिल्ह्यात आजही उच्च शिक्षणाच्या सुविधांसाठी प.महाराष्ट्र, मुंबई, गोवा, कर्नाटक याठिकाणी का जावं लागत? सांस्कृतिक चळवळीचं माहेरघर असलेल्या या कोकणात पुण्यातील ललित कला केंद्राच्या धर्तीवर का नाही सांस्कृतिक चळवळीचं विद्यापीठ उभं राहू शकल? जगभरात पर्यटन हा विषय प्राथमिकतेन विकसित होत असताना देशातील पहिला पर्यटन जिल्हा जाहीर होवून तब्बल पंचवीस वर्षे लोटली तरी त्या अनुषंगाने कोणताच ठोस निर्णय किंवा अमंलबजावणी का होत नाही? प्रश्न एक नाही अनेक आहेत.. आणि गेली कित्येक वर्षे आपण फक्त चर्चाच करत आहोत.राजकीय पक्ष, लोकप्रतिनिधी आपापला सत्तेचा आणि श्रेयवादाचा अजे़डा घेऊन काम करत आहेत..मात्र कोकणात नैसर्गिक उपलब्धता, अनुकूलता असूनही आपण सातत्याने “विकास” या राजकीय मंडळीनी अधोरेखित केलेल्या आभासी दुनियेत का चाचपडत.आहोत? जर “हे”सगळं आहे तर मग “ते”कां नाही???
अँड.नकुल पार्सेकर..
सावंतवाडी, सिंधुदुर्ग.

प्रतिक्रिया व्यक्त करा