You are currently viewing वैभववाडी तालुक्यात एनडीआरएफची टीम दाखल…

वैभववाडी तालुक्यात एनडीआरएफची टीम दाखल…

भुईबावडा घाटात कोसळलेली दरड हटवली..

वैभववाडी

तालुक्यात सलग दोन दिवस संततधार पाऊस कोसळत आहे. मध्यरात्री जोरदार झालेल्या पावसाने भुईबावडा, करूळ घाटात दरड कोसळली. दरम्यान अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर घाट मार्गाची पाहणी करण्यासाठी आलेल्या एनडीआरएफच्या टीमने व सार्वजनिक बांधकाम विभागाने भुईबावडा घाटातील दरड बाजूला केली आहे. त्यामुळे वाहतूक तात्काळ पूर्ववत झाली आहे. यावेळी तहसीलदार रामदास झळके, सार्वजनिक बांधकाम अधिकारी श्री. कांबळे, श्री दुडये आदी उपस्थित होते.

अतिवृष्टीच्या इशा-यानंतर जिल्ह्यात एनडीआरएफच्या दोन टीम दाखल झाल्या आहेत. या टीम जिल्ह्यातील विविध भागाची पाहणी करत आहेत. रविवारी दुपारी वैभववाडी तालुक्यात एक टीम दाखल झाली आहे. मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे करूळ घाटात दरड कोसळली. घाटात रस्त्याच्या मध्यभागी मोठी दरड पडल्याने वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. ही घटना रविवारी सकाळी ९ वा. च्या सुमारास घडली. पोलिसांनी दरड जेसीबीच्या साह्याने बाजूला करत मार्गावरील वाहतूक पूर्ववत केली.
दुपारच्या सुमारास भुईबावडा घाटात दरडीचा काही भाग रस्त्यावर आला. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. याची माहिती मिळतात तालुक्यात दाखल झालेली एनडीआरएफ ची टीम घाटाकडे मार्गस्थ झाली. दरम्यान सार्वजनिक बांधकाम अधिकारी जेसीबीसह घटनास्थळी दाखल झाले होते. सार्वजनिक बांधकामच्या अधिकाऱ्यांनी एनडीआरएफ टीम च्या मदतीने घाट मार्गातील दरड बाजूला केली. आणि हा मार्ग पूर्ववत केला. पुढील काही दिवस पावसाने जोर असाच ठेवल्यास करूळ व भुईबावडा घाट मार्गात दरडी कोसळण्याचे सत्र सुरूच राहणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twelve − nine =