कुंभवडेत आढळला नवजात बालिकेचा मृतदेह : अज्ञात व्यक्तीचे कृत्य….

कुंभवडेत आढळला नवजात बालिकेचा मृतदेह : अज्ञात व्यक्तीचे कृत्य….

वैभववाडी प्रतिनिधी
अनोळखी नवजात बालिकेचा मृतदेह कुजलेल्या स्थितीत कुंभवडे गावात आढळून आला आहे. हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेने वैभववाडी तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना शनिवारी रात्री उशिरा उघडकीस आली आहे. वैभववाडी पोलिसात या घटनेची नोंद झाली आहे. पालन पोषण न करण्याच्या उद्देशाने अज्ञात व्यक्तीने या बालिकेची गुप्तपणे विल्हेवाट लावून पळ काढला असावा अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

कुंभवडे ग्रामपंचायत ते बौध्दवाडीच्या रस्त्यावर गवतात नवजात बाळ कुजलेल्या स्थितीत स्थानिकांना शनिवारी रात्री आढळून आले. या घटनेची खबर औदुंबर तळेकर यांनी पोलीस ठाण्यात दिली. पोलीस निरीक्षक अतुल जाधव, हवालदार राजू जामसंडेकर व पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहचले. त्या बालीकेचा मृतदेह कुजलेल्या स्थितीत होता.

पोलिसांनी शवविच्छेदनासाठी मृतदेह ताब्यात घेतला. रविवारी दिवसभर पोलिस हवालदार राजू जामसंडेकर यांच्या नेतृत्वाखाली योगेश राऊळ, मारुती सोनटक्के, संदीप राठोड, किशोरी घाडी या घटनेचा तपास करत आहे. जन्मतःच त्या बालिकेची गुप्तपणे विल्हेवाट लावण्याचे कारण काय? कोणी बाहेरील व्यक्तीने हे कृत्य केले आहे का ? हे तपासात उघड होणार आहे. या घटनेची पोलिसांनी सखोल चौकशी करून संबंधित अज्ञात व्यक्तीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी स्थानिकांमधून केली जात आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा