You are currently viewing 50 गावांमध्ये प्रत्येकी 20 खाटांचे कोरोना काळजी केंद्रे

50 गावांमध्ये प्रत्येकी 20 खाटांचे कोरोना काळजी केंद्रे

38 प्राथमिक आरोग्य केंद्र आणि 12 मोठ्या गावांचा समावेश

पालकमंत्री उदय सामंत यांनी घेतला निर्णय

सिंधुदुर्गनगरी

 38 प्राथमिक आरोग्य केंद्र असणाऱ्या गावांमध्ये आणि 5 हजार पेक्षा जास्त  लोकसंख्येच्या 12 गावांमध्ये प्रत्येकी 20 खाटांचे कोरोना काळजी केंद्र निर्माण करून 1 हजार नव्याने खाटांची संख्या वाढवण्याचा निर्णय पालकमंत्री उदय सामंत यांनी घेतला. त्याचबरोबर एचआरसीटी चाचण्यांचे दर ठरविणअयात आले असून ठरविण्यात आलेल्या दरांपेक्षा जास्त दर घेणाऱ्यांची तक्रार जिल्हा शल्य चिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे करावी. निश्चितपणे त्यांच्यावर कारवाई केली जाईल असा इशारा पालकमंत्री श्री. सामंत यांनी दिला.

            पालकमंत्री श्री. सामंत यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात कोविड – 19 च्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना बाबत तसेच तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीबाबत आणि मान्सूनपूर्व तयारीबाबत आढावा बैठक घेतली. बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत, आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे, अपर जिल्हाधिकारी मंगेश जोशी, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, महावितरणचे अधिक्षक अभियंता विनोद पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय शेवाळे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजश्री सामंत आदी उपस्थित होते.

            पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले, पुढील आठ दिवसात नव्याने 1 हजार खाटांचे कोरोना काळजी केंद्रांची निर्मिती करण्यात येईल. प्रतिबंधात्मक क्षेत्र पोलीसांनी कडक करावेत. एचआरसीटीच्या 16 स्लाईस चाचणीसाठी 2 हजार रुपये, 16 ते 64 स्लाईससाठी 2 हजार 500 रुपये आणि 64 स्लाईसच्या पुढे 3 हजार रुपये दर जिल्ह्यासाठी राहील. यापेक्षा जादा दर घेतल्यास संबंधितांनी तक्रार करावी. औषध दुकानांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे लसीकरणही करण्यात यावे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

16 − 3 =