You are currently viewing मालवणात शासकीय फार्मसी महाविद्यालय व्हावे…

मालवणात शासकीय फार्मसी महाविद्यालय व्हावे…

जिल्हा फार्मसी कृती समितीची पालकमंत्री सामंत यांच्याकडे मागणी; प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन…

मालवण :

शासकीय फार्मसी महाविद्यालय मालवणात व्हावे अशी मागणी जिल्हा फार्मसी कृती समितीच्यावतीने पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे करण्यात आली आहे. याला श्री. सामंत यांनी सकारात्मक प्रतिसाद देत हा प्रश्न लवकरच मार्गी लावू असे आश्वासन दिले असल्याची माहिती समितीचे संघटक राहुल परब, कार्याध्यक्ष गोविंद पालकर यांनी दिली.

जिल्हा दौऱ्यावर आलेल्या उच्च व तंत्र शिक्षणमंत्री तथा जिल्हा पालकमंत्री उदय सामंत यांची जिल्हा फार्मसी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली. या भेटीत मालवणात शासकीय फार्मसी महाविद्यालयाची मागणी करण्यात आली. याबाबतचे निवेदन फार्मसी कृती समितीचे जिल्हाध्यक्ष मोईन हवालदार यांच्या नेतृत्वाखाली व फार्मसी कृती समिती महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष आकाश हिवराळे यांच्या मार्गदर्शनाखाली संघटक राहुल परब व कार्याध्यक्ष गोविंद पालकर यांनी पालकमंत्र्यांना सादर करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी उपस्थित होत्या.

जिल्ह्यात शासकीय शिक्षण देणारे एकमेव शासकीय तंत्रनिकेतन आहे. मात्र हे स्थापन झाल्यापासून शासकीय फार्मसी महाविद्यालय स्थापन झालेले नाही. शासकीय फार्मसी महाविद्यालयात जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा झाल्यास त्यांना मुंबई, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूर, गोवा याठिकाणी जावे लागते. गरीब विद्यार्थ्यांना ते आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ओरोस येथे होत असल्याने शासकीय फार्मसी महाविद्यालय मालवणात सुरू करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावर श्री. सामंत यांनी सकारात्मक चर्चा करून हा प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन दिले असल्याची माहिती श्री. परब, श्री. पालकर यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा