सावंतवाडी
कोकणातील नामवंत लेखक सावंतवाडीचे सुपूत्र चाळेगतकार प्रा.प्रविण बांदेकर यांची महाराष्ट्र राज्य शासनाच्या साहित्य आणि संस्कृती मंडळ सदस्य पदी शासनाने निवड केली आहे.
राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाने यासंदर्भातील शासन निर्णय २७ मे रोजी प्रसिद्ध केला आहे. प्रख्यात साहित्यिक संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ.सदानंद मोरे या समितीचे अध्यक्ष आहेत. राज्य शासनाच्या साहित्य संस्कृती मंडळाच्या तीस जणांच्या समितीत राज्यभरातील मान्यवर लेखक, कवी, साहित्यिक, मराठी साहित्याचे अभ्यासक यांचा समावेश आहे. त्यामध्ये कोकणातील साहित्यिक प्राध्यापक प्रविण बांदेकर यांचा समावेश शासनाने केला असून त्यांची सदस्य पदी निवड केली आहे.
बांदेकर यांची येरु म्हणे ही कविता २००० मध्ये, खेळखंडोबाच्या नावाने ही कविता २००५ मध्ये, चाळेकत ही त्यांची गाजलेली कादंबरी २००९ मध्ये प्रकाशित झाली आहे. त्याशिवाय उजव्या सोंडेच्या बाहुल्या ही २०१६ मध्ये, घुंगुरकाठी हे ललित २००९ मध्ये, चिंटू चुळबुळे हे बालसाहित्य १९९६ मध्ये आणि २०१९ मध्ये शोषण मूलक तथाकथित संस्कृती वाहकांना आव्हान देणारी इंडियन ॲनिमल फार्म ही कांदबरी लिहीली. या कादंबरीला राज्यभरातून वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
सातत्याने विविधांगी लिखाण करणारे प्रा.बांदेकर वैनतेय साप्ताहिकाच्या संपादक पदाची धुरा सांभाळत आहेत. मराठी विषयाचे प्राध्यापक असलेल्या प्रा.बांदेकर यांचा चळवळीतील कार्यकर्त्यांशी निकटचा संबंध आहे. साहित्य वर्तुळातून त्यांचे अभिनंदन होत आहे. तसेच कोकणातील साहित्यिकाला हा बहुमान मिळाल्याने शैक्षणिक, साहित्य, क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्यासह या समितीवर डॉ. दया पवार, डॉ.नागनाथ कोतापल्ले, फ.मु.शिंदे,जेष्ठ पत्रकार उत्तम कांबळे आदींचा समावेश आहे.