आठवणीच्या हिंदोळ्यावर. . .

आठवणीच्या हिंदोळ्यावर. . .

लवू टोपल्यांच्या हाँटेलातील खम़ग बटाटावडा…….

मी सावंतवाडीत १९८१ मध्ये आलो. सुमारे ३९ वर्षांचा काळ. ज्यावेळी मी सावंतवाडीत आलो…ती सावंतवाडी अर्थात सुंदरवाडी, त्यावेळचं तिचं रुप, ठेवण, निसर्गाचा वरदहस्त, विलोभनीय अशी सावंतवाडी आणि आताची सावंतवाडी यात फारच बदल झाला.

कालानुरूप बदल होत असतात… काही आवश्यक, काही अनावश्यक तर काही अपरिहार्य… आणि मनात असो वा नसो ते काळाच्या ओघात स्विकारावेही लागतात..

त्या काळातील सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि राजकीय वातावरण आणि आजची स्थिती यामध्येही फार बदल झाले आहेत. बदलत्या परिस्थितीत बदल स्विकारावेच लागतात.. पण आता या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या साडेतीन महिन्यात अवलोकन केल्यास मोठ्या प्रमाणात असं जाणवायला लागल की जुन ते सोनं…अनेकजण शेतीकडे वळले..श्रमाला पर्याय नाही याची जाणीव यानिमित्ताने होताना दिसत आहेत.

टुमदार कौलारु घरांची जागा आता सिमेंटच्या जंगलानी व्यापून टाकलीय…गल्लीबोळात वडापावाच्या टपऱ्या, चायनीज फूड, फास्ट फूड, बेकरीचे पदार्थ याची रेलचेल सुरु झाली.. हे सगळ पाहिल्यावर मला ३९ वर्षापूर्वी सावंतवाडी आठवते. मी आलो तेव्हा काही छोटेखानी हाँटेल आणि त्यात मिळणारे पदार्थ यांची आठवण आज प्रकर्षाने होते…
आठवणीच्या हिंदोळ्यावर आज सुरुवातीलाच मी लिहीणार आहे ते म्हणजे लवू टोपले यांच्या हाँटेलातील चवदार, खमंग बटाटावडा

आंबोली रस्याला जाताना गवळी तिठ्यावर एक छोटेखानी दुमजली कौलारू इमारत. वरच्या मजल्यावर सावंतवाडी एसटी आगारातील कर्मचारी संघटनेचं कार्यालय. त्यामुळे त्या सगळ्यांची नेहमीच रेलचेल.

खाली अर्ध्या भागात लवू टोपले यांचे छोटेसे किराणा दुकान आणि उर्वरित भागात हाँटेल. छोट्या टेबलवर लवूचे बाबा हे गंल्यावर एका लाकडी स्टूलवर बसलेले…आणि जुन्या काळातील लाकडी पैशाची पेटी…म्हणजे गल्ला.
पाणिपुरवठा खात्याची, एसटीची आणि आम्ही पोस्टातील मंडळी सकाळी साडेअकरा वाजता चहा पिण्यासाठी जात असू. साधारण दहाबारा गि-हाईक बसतील एवढी बाकड्यांची व्यवस्था… जास्त लोक झाले की उभे रहायचे…
पण संध्याकाळी विशेष गर्दी… ती सुद्धा लवू टोपले यांच्या हाँटेलातील खमंग बटाटावडा खाण्यासाठी… आले, लसूण, हिरवी मिर्ची, ओली कोथिंबीर आणि बटाटे याच चटकदार मिश्रण आणि बेसन पिठाच मस्त आवरण …गरमागरम वडा आणि सोबत हिरव्या मिर्चीची चटणी…क्या बात है…अर्थात हे सगळ लाकडाच्या चुलीवर..एक वेगळीच चव..एक वेगळीच मजा..

अर्थात वडा खावून पुन्हा आँफिसमध्ये गेल्यावरही आँफीसमधला कुणीही माणूस अगदी वासानेच ओळखणार…लवू कडचो वडो खालेलो दिसता…
दर रविवारी व बुधवारी अगदी न चुकता मी व पराष्टेकर आजोबा.( मी त्यांच्याकडे सबनीस वाड्यात रहायला होतो.) श्री देव उपपरलकरच्या दर्शनासाठी जात असू…तेव्हा सुद्धा पराष्टेकर आजोबा दर्शन घेऊन निघाल्यावर बटाटावडा खाल्याशिवाय कधीच घरी गेलेत नाही.. म्हणजे एक खावून झाल्यावर मला हळूच विचारायचे…आणखीन खायचा का?
त्या काळात सावंतवाडीत जी अनेक हाँटेल होती त्यापैकी खमंग बटाटावडा मिळण्याचे ठिकाण म्हणजे लवू टोपले या़च्या हाँटेलमधील खमंग बटाटावडा आज त्या जागेवर इमारत उभी आहे…पण त्या दिशेने जाताना आणि आठवणीच्या हिंदोळ्यावर झोका घेताना त्या बटाटावड्याचा तोंडाला पाणि आणणारा वास अजूनही जाणीव करून देतो.

अँड.नकुल पार्सेकर
सावंतवाडी.

प्रतिक्रिया व्यक्त करा