You are currently viewing वैभववाडी ग्रामीण भागातील वीज पुरवठा सुरु करावा

वैभववाडी ग्रामीण भागातील वीज पुरवठा सुरु करावा

ग्राहक पंचायतची उपकार्यकारी अभियंता यांच्याकडे मागणी.

वैभववाडी
मागील आठवड्यात होऊन गेलेल्या तौक्ते चक्रीवादळ व पावसामुळे जिल्ह्यासह कोकणपट्टीचे खूप मोठे नुकसान झालेले आहे. यामध्ये वीज वितरण कंपनीचे खूप मोठे नुकसान झाल्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला होता. खंडित झालेला वीजपुरवठा वैभववाडी शहरात तिसऱ्या दिवशी सुरू झाला. परंतु आठ-दहा दिवसापूर्वी खंडित झालेला वीज पुरवठा अद्यापही ग्रामीण भागातील काही गावांमध्ये सुरू झालेला नाही. तू लवकरात लवकर सुरू करावा अशी मागणी ग्राहक पंचायत महाराष्ट्र-कोकण विभाग, सिंधुदुर्ग जिल्हा शाखा व तालुका शाखेच्यावतीने उपकार्यकारी अभियंता वीज वितरण कंपनी वैभववाडी यांच्याकडे मेलद्वारे केली आहे.
वीज वितरण कंपनीचे कर्मचारी तालुक्यातील बऱ्याचअंशी खंडित वीजपुरवठा सुरू करण्यात यशस्वी झाले असले तरी अद्यापही काही ग्रामीण भागातील वीजपुरवठा सुरू झालेला नाही. गेले आठ-दहा दिवस विजेअभावी ग्रामीण भागातील लोकांचे खूप मोठे हाल होत आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने तिरवडे तर्फे सौंदळ इंदुलकरवाडी (प्राथमिक शाळा), घागरेवाडी तसेच उपळे व जांभवडे गावातील काही घरांमध्ये अद्यापही लाईट सुरु झालेली नाही.
तसेच आपल्या विभागातील अधिकारी यांच्याशी ग्राहकांनी संपर्क साधला असता तुम्ही त्या साहेबांकडे चौकशी करा अशाप्रकारे उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. तसेच आपल्या कार्यालयाचे (०२३६७-२३७२४१ व ४२) दूरध्वनी बंद असल्याने विज ग्राहकांना चौकशी अगर संपर्क साधणे शक्य होत नाही. आपल्या वैभववाडी कार्यालयातील पर्यायी संपर्क क्रमांक जाहीर करावा व सर्वांसाठी खुला असावा.
बंद असलेल्या ठिकाणचा वीज पुरवठा लवकरात लवकर सुरू करावा आणि ग्राहकांना योग्य सेवा द्यावी, अशी विनंती ग्राहक पंचायत महाराष्ट्र-कोकण विभाग, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रा.श्री.एस.एन.पाटील, उपाध्यक्ष श्री. एकनाथ गावडे, संघटक श्री. सिताराम उर्फ दादा कुडतरकर व सचिव श्री.संदेश तुळसणकर करीत आहोत. सदर मेलची प्रत अधीक्षक अभियंता कुडाळ, कार्यकारी अभियंता कणकवली व मा. तहसीलदार वैभववाडी यांना पाठविण्यात आली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा