You are currently viewing निफ्टी १७,४०० च्या खाली स्थिरावला, सेन्सेक्स १७५ अंकांनी घसरला

निफ्टी १७,४०० च्या खाली स्थिरावला, सेन्सेक्स १७५ अंकांनी घसरला

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

२७ फेब्रुवारीला सलग सातव्या सत्रात निफ्टी १७,४०० च्या खाली घसरले.

बंद होताना, सेन्सेक्स १७५.५८ अंक किंवा ०.३०% घसरून ५९,२८८.३५ वर होता आणि निफ्टी ७३.१० अंकांनी किंवा ०.४२% घसरून १७,३९२.७० वर होता. सुमारे ९४४ शेअर्स वाढले आहेत, २५११ शेअर्स घसरले आहेत आणि १७४ शेअर्स अपरिवर्तित आहेत

निफ्टीमध्ये अदानी एंटरप्रायझेस, बजाज ऑटो, यूपीएल, टाटा स्टील आणि इन्फोसिस हे सर्वाधिक तोट्यात होते, तर आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्रा बँक, पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन, एसबीआय आणि एचडीएफसी लाइफ यांचा फायदा झाला.

बँक आणि रियल्टी वगळता इतर सर्व क्षेत्रीय निर्देशांक घसरले.

बीएसई मिडकॅप निर्देशांक ०.६ टक्के आणि स्मॉलकॅप निर्देशांक १ टक्क्यांनी घसरला.

भारतीय रुपया ८२.७५ च्या आधीच्या बंदच्या तुलनेत प्रति डॉलर ८२.८४ वर बंद झाला.

*लवकरच शेअर बाजारांची वेळ संध्याकाळी ५ पर्यंत वाढणार ?*

शेअर बाजाराच्या वेळेत वाढ होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शेअर बाजारांतील व्यवहारांची वेळ दुपारी साडेतीनवरून वाढवून संध्याकाळी पाचपर्यंत करण्याचा प्रस्ताव आहे.

भांडवल बाजार बाजारांतील नियामक ‘सेबी’ने २०१८ मध्येच बाजारांतील व्यवहारांची वेळ वाढविण्यासाठी मसुदा जारी केला होता. या पाश्र्वभूमीवर बाजारातील घटकांशी वेळ वाढविण्यासंदर्भात सध्या प्राथमिक चर्चा करण्यात येत आहे.

सद्यस्थितीत देशांतर्गत बाजार सकाळी ९.१५ वाजता उघडतात आणि दुपारी ३.३० वाजता बंद होतात. याशिवाय बाजारात कॅश आणि ‘फ्युचर अँड ऑप्शन’चे व्यवहार सकाळी ९.१५ ते दुपारी ३.३० पर्यंत चालू असतात. त्याच वेळी इक्विटी आणि डेरिवेटिव्हजचे व्यवहार सकाळी ९.१५ ते दुपारी ३.३० पर्यंत पार पडतात.

देशातील सर्वांत मोठा शेअर बाजार असणाऱ्या राष्ट्रीय शेअर बाजारा ने (एनएसई) इक्विटी व्यवहारांची वेळ वाढवण्याची इच्छा प्रदर्शित केली होती. आताच नव्हे, तर यापूर्वीपासूनच व्यवहारांच्या वेळा वाढविण्याची चर्चा सुरू आहे. गेल्या महिन्यात ‘सेबी’ने या संदर्भातील प्रमाणित संचलन प्रक्रिया अर्थात ‘एसओपी’ जारी केली होती. त्यानुसार, सर्व शेअर बाजारांनी व्यवहारांमध्ये कोणत्याही प्रकारची बाधा निर्माण झाल्यास संबंधित घटकांना १५ मिनिटांच्या आत सूचित करण्याचे अनिवार्य केले होते. याशिवाय काही अपवादात्मक परिस्थितीत व्यवहाराची वेळ दीड तासांपर्यंत वाढवण्याचेही आदेश दिले होते. याशिवाय तांत्रिक कारणास्तव अथवा अन्य कोणत्याही कारणास्तव शेअर बाजारांतील व्यवहारांना बाधा आल्यास मार्केट इन्फ्रास्ट्रक्चर इन्स्टिट्युशन्स’ सह अन्य घटकांनाही या विषयी त्वरित माहिती देण्याची गरज आहे. त्याच वेळी गरज असल्यास संबंधितांना व्यवहाराची वेळ वाढवून देणे आवश्यक आहे, जेणेकरून ‘इंट्रा डे ‘ व्यवहार पूर्ण करण्यासाठी आवश्यक तो वेळ मिळेल, असेही ‘सेबी’ने या ‘एसओपी’ मध्ये नमूद केले होते.

शेअर बाजारांची वेळ वाढवणे अनेकांच्या पथ्यावर पडणार असले, तरी अनेकांचा या प्रस्तावाला विरोध होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा