“परबानू, खुप घाई केल्यात”….

“परबानू, खुप घाई केल्यात”….

“परबानू,खुप घाई केल्यात”….

सकाळी समाजमध्यमातून माहिती मिळाली. आंबेगावचे सरपंच वासुदेव परब यांची तब्येत गंभीर.. तेव्हापासून देवाचा धावा करत होतो की आमच्या या मित्राला लवकर बरं वाटू दे…पण परमेश्वराने आमची प्रार्थना ऐकली नाही, आणि संध्याकाळी त्यांनी अकाली कायमची एक्झिट घेतली…परत कधीही न येण्यासाठी.
गावपुढारी अनेकजण आहेत..पण गावचा आदर्श सरपंच कसा असावा ? याचं उत्तम उदाहरण म्हणजे आमचे वासुदेव परब. सतत त्यांच्या पायाला भिंगरी.. अगदी कुठूनही बघितल तर अगदी प्रेमाने हाक मारणारं” काय हो पार्सेकरानो, आमचे प्रभू साहेब बरे आसत मा? फोनबीन येता काय नाय? मा.सुरेश प्रभूसाहेबांवर त्यांच विशेष प्रेम.
साहेबांच्या दुसऱ्या निवडणूकीत त्यांचा माझा पहिला परिचय.तेव्हापासून कायम संपर्कात. सतत हसरा चेहरा आणि भेटतील तेव्हा गावाच्या विकासासाठी शासकीय योजनांची चर्चा. त्यांच्या या माणसं जोडण्याच्या स्वभावामुळे गावातील वातावरण अगदी शांत.”, काही वाद निर्माण झालेत तर समजावताना त्यांची एकच भूमिका “गावात वाद नको, सगळ्यानी मिळान – मिसळान रवया आणि गावचो विकास करुया”. गावाच्या विकासासाठी अहोरात्र धडपड. म्हणूनच आंबेगाव म्हणजे वासुदेव हे समीकरणचं झालेलं होत. अनेकदा त्यांची भेट शासकीय कार्यालयातच व्हायची. मी विचारलं की, “काय परबानू काय हाडल्यात? त्यांच उत्तर ठरलेल असायचं. “गावातल्या म्हाताऱ्या कोताऱ्यांची आसततं बारीकसारीक कामा. “सतत दुसऱ्याना मदत करण्याची धडपड.
मला आठवत, २०१७मध्ये पंचम खेमराज विधी महाविद्यालय व आंबेगाव ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने आंबेगावात कायदेविषयक शिबीराचे आयोजन केलेले होते. या शिबिराला खरं तर आम्ही विद्यार्थी म्हणून उपस्थित होतो.. आणि आमचे प्रमुख मार्गदर्शक होते जेष्ठ विधीतज्ञ मा दिपक नेवगी व काँलेजच्या प्राचार्या सौ.अश्विनी लेले. विद्यार्थ्यांमध्ये मी आणि सावंतवाडीचे तत्कालीन नायब तहसीलदार मा.श्री शशिकांत जाधवसाहेब (विद्यमान तहसीलदार रत्नागिरी) होते…पण त्यावेळी परबानी अगोदरच आम्हाला व्यासपीठावर बसण्यासाठी आमंत्रित केल आणि आमचा परिचय करुन दिला. कार्यक्रम संपल्यावर चहा, नाश्ता अगदी प्रेमाने व आग्रहाने घेण्यास सांगितले. खरचं आमच्या सगळ्यांच्या स्मरणात रहाणारा तो कार्यक्रम… अगदी घरगुती वातावरणात. त्यावेळची पाहुण्यांच्या स्वागतासाठीची धावपळ अजूनही डोळ्यासमोर येते.
गावासाठी कष्ट उपासणारे, येणाऱ्या जाणाऱ्याची आत्मियतेने चौकशी करणारे, सतत हसतमुख असणारे आणि पक्षीय चौकटीच्या बाहेर असणारे आमचे वासुदेव परब असे अचानक गेले. गावाची तर अपरिमित हानी झालीच पण व्यक्तीशः माझ्यासारख्या अनेक मित्रांचेही नुकसान झालयं. श्रेयवादाच्या राजकारणापासून अलीप्त रहाणारे आमचे मित्र आम्हाला कायमचे अंतरले… खरचं,परबानू आमका आणि तुमच्या गावाकं खरी गरज आता व्हती…कित्याक इतकी घाय केल्यात.. परबानू कित्याक घाय केल्यात?..
…अँड.नकुल पार्सेकर….
सावंतवाडी.

प्रतिक्रिया व्यक्त करा