You are currently viewing सिंधुदुर्गात कोविडचे संकट…चक्रीवादळाने नुकसान.

सिंधुदुर्गात कोविडचे संकट…चक्रीवादळाने नुकसान.

सिंधुदुर्ग वासियांना सावरण्यासाठी या नेत्यांमध्ये संवाद हवा….

विशेष संपादकीय……..

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कधी नव्हे एवढं कोरोनाचे संकट आले आहे. दरदिवशी कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. मृत्यूचे प्रमाण देखील जास्त आहे. जिल्हा आरोग्य यंत्रणा असलेल्या, साधनसामग्री आणि उपलब्ध डॉक्टरांच्या मदतीने परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी झटत आहे. जिल्हाधिकारी यांच्यासहित जिल्हा प्रशासन, आरोग्य व्यवस्था आणि तौक्ते चक्रीवादळाशी दोन हात करत वादळात रुग्णालयात दाखल रुग्णांना वीज पुरवठा, पाण्याची गैरसोय होऊ नये म्हणून काळजी घेत असतानाच माजी पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक अपवाद ठरता जिल्ह्यातील नेते, लोकप्रतिनिधी, त्यांचे तिसऱ्या, चौथ्या फळीतील काही स्वयंघोषित नेते मात्र एकमेकांवर आणि जिल्हा प्रशासन, आरोग्य व्यवस्थेवर चिखलफेक, आरोप प्रत्यारोप करण्यात मश्गुल आहेत. जिल्ह्यातील या सवंग लोकप्रियतेसाठी झटणाऱ्या व सर्वसामान्य जनतेला वाऱ्यावर सोडून काम करणाऱ्यांवर टीका टिप्पणी करणाऱ्या नेत्यांना जनता कंटाळली आहे. संकटाच्या काळात जनतेला आधार देण्यापेक्षा लोकप्रियतेसाठी दुसऱ्यांवर आरोप करणाऱ्या नेत्यांचा लोकांना वीट आला आहे. सत्ता कोणाचीही असो परंतु आज समोर उभं ठाकलेलं संकट खूप मोठे आहे. अशावेळी सत्तेचा अट्टाहास न करता सर्वांनी जनहितासाठी एकत्र येऊन जनतेसाठी काम करणे गरजेचे आहे.
माजी पालकमंत्री केसरकर, आमदार वैभव नाईक नियोजनबद्ध आपले काम करत आहेत. कोणताही गाजावाजा, टीका टिप्पणी न करता शक्य ते सर्व करत असतानाच जिल्ह्यातील काही नेते, लोकप्रतिनिधी आणि त्यांचे तिसऱ्या चौथ्या फळीतील स्वयंघोषित नेतेही एकमेकांवर तोंडसुख घेत आहेत, जिल्हा यंत्रणेवर देखील बोट दाखवत आहेत, त्यामुळे काम करणाऱ्या जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेचे मात्र खच्चीकरण होत आहे. या आपत्कालीन परिस्थितीत माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी एकत्र येत सिंधुदुर्ग वासीयांना सावरण्यासाठी राजकारण बाजूला ठेवत काम करायला हवं अशी जनतेची इच्छा आहे. दोघेही अनुभवी नेते असल्याने, एकत्र येत जिल्ह्यात संकटकाळात काम केल्यास नक्कीच जिल्हा कोरोना संकटमुक्त व्हायला वेळ लागणार नाही, आणि स्वयंघोषित लोकप्रनिधींना देखील टीका टिप्पणी करण्याची गरज भासणार नाही.
आजपर्यंत जिल्ह्याची सत्ता भोगलेल्या कोणत्याही नेत्याने आरोग्यदृष्ट्या जिल्हा प्रगत होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केलेले नाहीत, त्यामुळेच जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा आज डळमळीत झालेली आहे. छोट्या मोठ्या संकटात देखील आपण कोल्हापूर, गोव्यावर अवलंबून असतो. आज संकटात कोल्हापूर आणि गोव्याची देखील आरोग्य यंत्रणा आजारीच असल्यासारखे दिसत आहे. असे असताना जिल्ह्यातील काही नेते राज्य शासनालाच सांगत आहेत की, जमत नसेल तर जिल्हा आम्ही सांभाळतो. परंतु ही वेळ पोळी भाजून खाण्याची नसून त्याच आरोग्य यंत्रणेला आधार देत सांगण्याची गरज आहे की, “गरज असेल तर आम्ही सुद्धा तुमच्या खांद्याला खांदा लावून लढण्यास तयार आहोत.
तरच जिल्ह्यातील कठीण परिस्थितीत दिवसरात्र राबणारी जिल्हा आरोग्य यंत्रणा, कर्मचारी, डॉक्टर्स यांचे मनोबल वाढेल आणि जोमाने ते आपल्या कार्यात झोकून काम करतील.
प्रतिकूल परिस्थितीत जिल्हा प्रशासन, आरोग्य यंत्रणा काम करत आहे. जिल्ह्यात अनेक लोक मृत्युमुखी पडत आहेत आणि आपली नेते, लोकप्रतिनिधी स्वतःच्या लोकप्रियतेसाठी टाळूवरचे लोणी खाण्यासारखे स्वतःच्या प्रसिद्धीसाठी मीडियामध्ये टिकाटिपण्णी करत आहेत हे नक्कीच जिल्ह्यासाठी लाजिरवाणे आहे. आज जिल्ह्यावर आलेल्या संकटात काही चांगले लोकप्रतिनिधी देखील आपल्या प्राणास मुकले आहेत, त्यामुळे घरात बसून यंत्रणा आणि दुसऱ्या पक्षातील नेत्यांवर टीका टिप्पणी करण्यात वेळ घालविण्यापेक्षा जिल्ह्यातील अशा नेत्यांनी जनतेसाठी आरोग्य यंत्रणेला मदत करून आपला वेळ सत्कारणी लावावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × 5 =