You are currently viewing बाधितांना सर्वतोपरी सहाय्य करणार…

बाधितांना सर्वतोपरी सहाय्य करणार…

– पालकमंत्री उदय सामंत

सिंधुदुर्गनगरी

तौक्ते चक्रीवादळाने सिंधुदुर्ग जिल्ह्याची मोठी हानी झाली आहे. या दुर्दैवी घटनेचा ज्यांना ज्यांना फटका बसला आहे अशा सर्व बाधितांना राज्य सरकार व पालकमंत्री म्हणून आपण स्वतः सर्वतोपरी सहाय्य करणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.

            तौक्ते चक्रीवादळामुळे जिल्ह्यात झालेल्या हानीची पहाणी व आढावा घेण्यासाठी त्यांनी वैभववाडी, देवगड तालुक्यांचा दौरा केला. यावेळी घेतलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

            प्रारंभी वैभववाडी तालुक्यातील मौजे नाधवडे येथे त्यांनी आढावा बैठक घेतली. वैभववाडी तालुक्यात चक्रीवादळामुळे 46 गावे बाधीत झाल्याची माहिती तहसिलदार रामदास झळके यांनी दिली.

            आपदग्रस्तांना धान्य वेळेवर पोहोचेल याची दक्षता संबंधित यंत्रणेने घ्यावी, तसेच बाधित गावातील ज्या नळ पाणी योजना वीजेअभावी बंद आहेत त्या ठिकाणी उच्च क्षमतेचे जनरेटर बसवून त्या त्या गावातील नळ पाणी योजना तात्काळ सुरू करण्याला प्रथम प्राधान्य द्यावे असे आदेशही पालकमंत्री श्री. सामंत यांनी दिले. त्याचबरोबर देवगड तालुक्याचा आढावा घेत असताना चक्रीवादळात ज्या 4 खलाशांचा मृत्यू झाला आहे त्यांच्या कुटुंबियांना शासन स्तरावर तातडीने आर्थिक मदत मिळावी यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. आनंदवाडी बंदर येथे आपत्कालीन यंत्रणा तसेच तहसिल कार्यालय, देवगडच्या आवारात आपत्कालीन कक्ष येत्या 15 दिवसात सुरू करण्यात यावा. त्यासाठी आवश्यक निधीची तरतूद जिल्हा नियोजन समितीमधून करण्यात येईल असे आश्वासन पालकमंत्री श्री. सामंत यांनी दिले.

            देवगड येथील कोविड सेंटरमध्ये रुग्णांना देण्यात येणाऱ्या आहाराबद्दल तीव्र नापसंती व्यक्त करत रुग्णांना दर्जेदार जेवण देण्याबाबत तहसिलदार मारुती कांबळे यांना सूचना केल्या. जिल्ह्यात आंबा, काजू, नारळ, केळी तसेच सुपारी आदी फळपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांचे पंचनामे तातडीने करण्यात यावे असे आदेशही त्यांनी सबंधित यंत्रणेला दिले. त्याचबरोबर फळ पीक विमा योजनेचा लाभ संबंधित शेतकऱ्यांना कसा मिळेल याबाबत कृषि विभागाने तात्काळ कार्यवाही करावी अशी सूचना करून ज्या मच्छिमारांचे नुकसान झाले आहे त्यांना प्रशासनाकडून मदत करण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले. तर खासदार विनायक राऊत यांनी जिल्ह्यातील एकही बाधित मदतीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता सर्व शासकीय यंत्रणांनी घ्यावी अशी महत्वपूर्ण सूचना केली. तसेच या वादळात सर्वाधिक नुकसान विद्युत वितरण कंपनीचे झाले असून वीज प्रश्नाबाबत नागरिकांनी संयम बाळगावा असे आवाहनही केले.

            या आढावा बैठकीसाठी सर्वश्री संदेश पारकर, अतुल रावराणे यांच्यासह कणकवलीच्या उपविभागीय अधिकारी वैशाली राजमाने, देवगड प्रांताधिकारी सुधीर पाटील, तहसिलदार रामदास झळके, मारुती कांबळे, गटविकास अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, नगरपंचायत मुख्याधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यांच्यासह संबंधित सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × 4 =