You are currently viewing ‘तौक्ते’चा तडाखा; रेल्वेवर झाड कोसळले, कोव्हिड सेंटरचे पत्रे उडाले

‘तौक्ते’चा तडाखा; रेल्वेवर झाड कोसळले, कोव्हिड सेंटरचे पत्रे उडाले

अरबी समुद्रात घोंगावत असलेल्या ‘तौक्ते’ चक्रीवादळानं कर्नाटक व गोवा किनारपट्टीला झोपडल्यानंतर आता या वादळाचा परिणाम महाराष्ट्रातही जाणवू लागला आहे. रविवारी तौक्ते चक्रीवादळामुळं कोकण किनारपट्टीला फटका बसला तर आज पहाटेपासूनच मुंबई व उपनगरात मुसळधार पाऊस व सोसाट्याच्या वाऱ्यामुळं मुंबईकरांची दाणादाण उडवली आहे.

तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागानं मुंबई, ठाणे व पालघर परिसराला ऑरेंज अॅलर्ट दिला आहे. रविवारी मध्यरात्रीपासूनच मुंबई व परिसरात वादळी वारे व मुसळधार पावसामुळं मुंबईकरांची झोप उडवली आहे. या मुसळधार पावसामुळं अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली आहेत. तर, काही ठिकाणी घरांची पडझड झाल्याचं चित्र आहे.

वादळी वारे आणि पावसामुळं खबरदारी म्हणून वरळी सी- लिंक पुढील सूचना मिळेपर्यंत वाहतूकीसाठी बंद करण्यात आला आहे. तसंच, खराब हवामानामुळं मुंबई विमानतळ ११ ते दुपारी २ बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर चेन्नई- मुंबई विमान सुरतला वळवण्यात आले आहे. मुंबईतील मोनोरेलही बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

मुंबई शहरात ५ ठिकाणी व पूर्व उपनगरात १ अशा एकूण ६ ठिकाणी भिंत पडण्याच्या तक्रार समोर आल्या आहेत. तर, पेडर रोड, हिंदमाता, महालक्ष्मी जंक्शन व सांताक्रुझ येथील मिलन सबवे येथे पाणी साचल्यामुळं वाहतूकीचा अडथळा निर्माण झाला आहे. अंधेरी सबवेही वाहतूकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे.

वादळी वाऱ्यामुळं घाटकोपर ते विक्रोळी दरम्यान ठाण्याकडे जाणाऱ्या लोकलवर झाड कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेमुळं काही काळ लोकल विस्कळीत झाली होती. कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत झाड हटवले आहे. त्यानंतर मुंबई लोकलची वाहतूक सुरळीत सुरु आहे.

मुंबईत सुरु झालेल्या मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळं वांद्रे कुर्ला कॉम्पलेक्स येथील कोव्हिड सेंटरला फटका बसला आहे. कोव्हिड सेंटरचे पत्रे उडून गेले आहेत तर सेंटरची मोठे नुकसान झाले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × four =