You are currently viewing कोविड – द “टेस्ट” ऑफ इंडिया….!!

कोविड – द “टेस्ट” ऑफ इंडिया….!!

कुडाळच्या ग्राउंडवर “अँपायर डिसीजन” चुकीचा असला तरीही फायनल होणार की “थर्ड अंपायर” न्याय देणार??

“टिकटिक वाजते डोक्यात …धडधड वाढते ठोक्यात” हे दुनियादारी चित्रपटातील गाणं सध्या प्रेमकथेसाठी नव्हे तर कोरोनाच्या व्यथेसाठी वापरले जावे, अशी वेळ आली आहे. प्रेमात आणि युद्धात सारेच क्षम्य असते असे म्हणतात. तसेही कोविड-१९ रणसंग्राम, म्हणजे युद्धच आहे. इथेही तोच नियम लागू होत असावा, नाही का? युद्धात कधीही न भरून येणारे नुकसान हे सामान्य माणसाचेच होत असते आणि अन्यायाची झळ ही सामान्य माणसालाच बसत असते. युद्धच असल्याने याविरोधात दाद कोणी कोणाकडे मागावी हा प्रश्न आलाच!

हा प्रश्न मनात घेऊनच एका भगिनीने भारतीय जनता पार्टीच्या महिला नेत्या सौ ममता चेतन धुरी आणि सौ दिपलक्ष्मी सुशांत पडते यांचा दरवाजा ठोठावला. प्रश्न सामाजिक होता, अन्यायाचा होता आणि त्याहून अधिक न्यायाची अपेक्षा कोठून करावी अशा भीतीचाही होता. कोणतीही स्वॅबटेस्ट न करता एका कुडाळ-सिंधुदुर्ग मधील भगिनीला कोविड पॉझिटिव्ह ठरवण्यात आले होते आणि शासकीय यंत्रणा आपली चूक पुढे रेटवत आपलं तेच करण्याच्या पवित्र्यात होती.

काय आहे हा प्रकार?

कुडाळ शहरातील एक महिला आपल्या वैयक्तिक कामासाठी बाहेरगावी जायची होती. ई-पाससाठी तिला टेस्टरिपोर्ट आवश्यक होता. त्यासाठी ती महिला कुडाळ येथील महिला रुग्णालय, कुडाळ येथे स्वॅबटेस्ट साठी गेली. रुग्णालयात तीचे नाव रजिस्टर करण्यात आले.आणि काही वेळात आपणांस बोलावण्यात येईल असे सांगितले गेले.मात्र बराच वेळ दखल घेतली गेली नाही, त्यामुळे अन्य काही काम होते त्यापाठी सदरील महिला स्वॅब न देता निघुन गेली. तो विषय तिथेच संपला. दोन दिवसांनी त्या महिलेला फोन आला की तुमचा कोरोनाचा अहवाल हा पॉझिटिव्ह आला आहे तो अहवाल आपण घेऊन जावा. या विचित्र प्रकाराने हादरलेल्या त्या महिलेला काय करायचे तेच सुचेना. घाबरलेल्या अवस्थेत तीने हा प्रकार कुडाळ येथील भाजपच्या महिला शहर अध्यक्षा ममता धुरी आणि भाजपा ओबीसी सेलच्या महिला जिल्हाध्यक्षा दीपलक्ष्मी पडते यांच्या कानावर घातला. परिस्थितीतले गांभीर्य पाहून त्यांनी सदरील बाब त्या महिलेसह कुडाळ तहसीलदार अमोल फाटक यांच्या कानावर घातली. लेखी निवेदनही दिले. या प्रकारानंतर एकूणच तपासणी प्रक्रियेबद्दल संशय व्यक्त होत समाजातून नाराजी व्यक्त करण्यात आली. पेशंट पॉझिटिव्ह दाखवण्यात कुणाचेतरी काही फायद्याचे संख्यात्मक अर्थकारण आहे का, असा संशय आधीच समाजमाध्यमांवर चर्चेत होता. या प्रकरणातून त्याला पुष्टीच मिळावी अशी स्थिती समोर आली.

खरंच परिस्थिती बदलणार का? मिळणार का न्याय त्या महिलेला?

हा प्रश्न पडण्याचे कारणही तसेच आहे. सुरुवातीलाच सांगितल्याप्रमाणे आज कोविड हे युद्ध बनले आहे. आणि कोणत्याही युद्धात सामान्य माणसाला नव्हे, तर सैनिकांनाच झुकते माप दिले जाते. त्यांच्या चूक-अपराधांकडेच नव्हे, तर पापांकडेही त्या परिस्थितीत दुर्लक्ष केले जाते.

इथेही परिस्थिती तीच आहे. कुडाळ तहसीलदारांनी आरोग्य यंत्रणेला पाठीशी घालत त्या महिलेलाच दोषी ठरवण्याचा प्रकार केला. तुम्ही अर्धवट स्वॅब चाचणी ठेवत निघून गेलातच कशा, अशा प्रकारची विचारणा करण्यात आली. फार दूरचे कशाला, पक्षातील काही स्वकीयांनीही आरोग्य यंत्रणेची बाजू घेत या महिला नेत्यांवर अप्रत्यक्ष दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे आरोग्य यंत्रणेने त्या महिलेवर दबाव टाकत तिला तातडीने स्वॅब तपासणीसाठी येण्यासाठी दबाव टाकण्याचा प्रयत्न चालवला आहे. थोडक्यात म्हणजे आपली चूक झाकण्यासाठी एखाद्या महिलेला पॉझिटिव्ह ठरवून पडदा घालायची तयारीही आरोग्य यंत्रणेने केलीय म्हणण्याच्या संशयाला वाव निर्माण झाला आहे. काय ही अनागोंदी? आणि वर काही नेत्यांना हाताशी धरत झाला प्रकार दडपण्यासाठी ही अशी प्रशासकीय दहशत? युद्धात आणि प्रेमात काहीही चालते म्हणून काहीही चालवायचे का? सामान्य जनता एकूणच या सगळ्या सावळ्या-गोंधळात दहशतीखाली आहे. जनतेच्या मनातल्या प्रश्नांना प्रशासन अशा प्रकारे धाक-दपटशाहीतूनच उत्तर देणार आहे का?

प्रश्न खूप आहेत. ही वेळ नव्हे हे ही मान्य केले तरीही सामान्य माणसाच्या आयुष्यातल्या या वेळेला, त्या प्रचंड घालमेलीला काहीच मोल नाही का? प्रशासनाच्या निर्णयावर त्यांच्या आयुष्याच्या वेळेचे काटे प्रशासकीय यंत्रणेला काटे तसे बेभरवशाने हतबलपणे फिरत राहणार आहेत का?

या सगळ्या प्रकारची दाद महिलेसह सौ ममता धुरी आणि दिपलक्ष्मी पडते यांनी जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांच्याकडे मागीतली आहे. थर्ड अँपायरकडे आता निर्णय आहे. एका महिलेवरील अन्यायाची दखल निदान महिला जिल्हाधिकारी तरी घेतील आणि योग्य न्याय देत दोषींवर कारवाई करतील असा विश्वास या महिला भाजपा नेत्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिल्यानंतर निम्नस्तरीय पातळीवर दबावाच्या आणि खोट्याला खऱ्याचा मुलामा देण्याच्या राजकारणाला अधिकच गती येणार, किंबहुना येतच आहे हे सुद्धा तितकेच कटू वास्तव आहे. समोर काय येणार हे काळ ठरवेल तेव्हा त्याबद्दल पुन्हा बोलूच, पण तूर्तास सर्व दबाव झेलत आपल्याच एका भगिनीवरील अन्याय दूर करण्यासाठी अविरत धडपड करणाऱ्या, कोणी पाठीशी राहो न राहो तरी सत्यासाठी लढणाऱ्या भाजपाच्या सौ ममता धुरी आणि दिपलक्ष्मी पडते यांचे निश्चितच कौतुक आहे. त्यांचे अभिनंदन!!

— अविनाश पराडकर, सिंधुदुर्ग
9422957575

प्रतिक्रिया व्यक्त करा

7 − 1 =