You are currently viewing जिल्हाधिकारी आणि जिल्हा शल्यचिकित्सक यांनी खाजगी कोविड सेंटरसाठी शासनाने ठरवून दिलेले दर जाहीर करावेत – मनसे

जिल्हाधिकारी आणि जिल्हा शल्यचिकित्सक यांनी खाजगी कोविड सेंटरसाठी शासनाने ठरवून दिलेले दर जाहीर करावेत – मनसे

जिल्ह्यातील खाजगी रुग्णालयांची मनमानी; सर्वसामान्यांची होतेय लुट- अमित इब्रामपूरकर

जिल्ह्यात एकीकडे कोरोनाच्या रुग्णांमध्ये दिवसेदिवस वाढ होत असताना दुसरीकडे मात्र कोविड उपचारासाठीच्या विविध चाचण्यांच्या नावावर जिल्ह्यातील खाजगी रुग्णालये रुग्णांची लूट करत असल्याचा आरोप मनविसे माजी जिल्हाध्यक्ष अमित इब्रामपूरकर यांनी केला आहे. जिल्हाधिकारी आणि जिल्हा शल्यचिकित्सक यांनी खाजगी कोविड सेंटरची दरसूची जाहीर करावी आणि भरारी पथक नेमून रुग्णालयांच्या मनमानी कारभाराला आळा घालावा अशी मागणी केली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य नागरिकांना उपचारांचा लाभ मिळावा यादृष्टीने महाराष्ट्र शासनाने महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ राज्यातील सर्व अंगीकृत रुग्णालयांमार्फत उपलब्ध करुन देण्याबाबत शासन निर्णय निर्गमित केले आहेत. जिल्ह्यातही महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत नोंदणीकृत तसेच खाजगी रुग्णालये यांनी कोविड रुग्णांवर मोफत उपचार करावयाचे आहेत. रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्यानंतर दररोज केलेले उपचार, चाचण्या यांची फाइल, बीले देणे आवश्यक आहे. परंतु दिली जात नाही. याबाबत रत्नागिरीत अश्याप्रकरची तक्रार झाली आहे. म.ज्यो.फु.ज.आ योजनेत रुग्णालयात जर स्वतंत्र रूमची व्यवस्था असेल तर त्या कोविड सेंटर मध्ये श्रीमंतांप्रमाणे सर्वसामान्यांनाही उपलब्ध व्हावी.काही रुग्णालयांमध्ये स्वच्छता कर्मचारी जात नाहीत. रुग्णच स्वच्छता करतात. तर काही रुग्णालयांमध्ये विम्याचे पैसे मिळवण्यासाठी रुग्ण आणि डॉक्टर यांच्यात ६०-४० चा प्रकार होत आहे. ऑक्सीजन बेड नसताना बिलांमध्ये ऑक्सीजन बेडचे चार्जेस लावले जात आहेत असे निदर्शनास आले आहे. मा.जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्याच्या तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष या नात्याने भरारी पथकामार्फत प्रत्यक्ष पाहणी करून कारवाई करावी व जनतेला दिलासा द्यावा.

शासनाने विविध प्रकारचे वैदयकिय उपचार/ आरोग्य सेवा याकरीता आकारल्या जाणाऱ्या शुल्कावर निर्बंध आणले आहेत व त्याकरीता दरपत्रक निश्चित करण्यात आले आहे. संपूर्ण राज्यात एचआरसिटी टेस्ट(फुप्फुसाकरिता) २०००/- रुपये, प्लाजमा ५५००/- रुपये तर आरटीपीसीआर टेस्टसाठी ५००/- रुपये, साधा बेड ४०००/-, ऑक्सीजन बेड ७५००/-, व्हेंटिलेटर बेड ९०००/- (बेडचे दर एचआयव्ही स्पॉट, एक्स रे, इसीजी, ओषधे, ऑक्सीजन चार्जेस,नर्सिंग चार्जेस, जेवण यांच्यासहीत आहेत) दर ठरविण्यात आला आहे. परंतु या पेक्षा जादा दर लावले जात आहेत.अश्या तक्रारी मनसेकडे आहेत.
कोविड रुग्णांच्या बिलासंदर्भात तालुक्याच्या तहसीलदार कार्यालय स्तरावर समिती गठीत करण्याच्या सूचना आहेत. या समितीने रुग्णांच्या बिलांची पडताळणी करणे आवश्यक आहे परंतु अशा प्रकारे कोणतीही पडताळणी केली जात नाही. आज जिल्ह्यातील कोरोना रुग्ण अवाजवी वीज आकारणीमुळे घाबरला आहे. खाजगी कोविड सेंटर मध्ये उपचारासाठी दाखल केल्यानंतर कोणत्याही प्रकारची पक्की बिले अदा केली जात नाहीत. रुग्णालयाच्या बाहेर ठळक अक्षरांमध्ये दरपत्रक सूची लावणे बंधनकारक आहे. कोणते दर कुठल्या सुविधांसाठी, चाचण्यांसाठी आकारण्यात येणार आहेत याबत तपशीलवार माहिती देण्याचे शासनाचे आदेश आहेत.

खाजगी कोविड सेंटर सेवा देत आहेत की जनतेला लुटत आहेत? असा प्रश्न निर्माण होत आहे. म्हणूनच अधिक दर लावणाऱ्या खाजगी दवाखाने आणि प्रयोगशाळांवर इपिडेमिक डिसीज ॲक्ट,पँडेमिक ॲक्ट आणि डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्टनुसार जिल्हाधिकारी आणि जिल्हा शल्यचिकित्सक यांनी कारवाई करावी. तसेच खाजगी कोविड सेंटर रुग्णालयांचे शासनाने ठरवून दिलेले दर जाहीर करावेत अशीही मागणी मनसेतर्फे अमित इब्रामपूरकर यांनी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा