You are currently viewing कोरोनाच्या वाढलेल्या प्रादूर्भाव परिस्थितीस सर्वस्वी जनतेलाच दोषी ठरवलं जातंय हे दुर्दैवी…

कोरोनाच्या वाढलेल्या प्रादूर्भाव परिस्थितीस सर्वस्वी जनतेलाच दोषी ठरवलं जातंय हे दुर्दैवी…

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाला सर्वोत्तपरी सहकार्य.. मात्र जनता कर्फ्युच्या आडून लोकांना वेठीस धरलं जाऊ नये ही मनसेची भूमिका

सर्वसामान्यांना मान्सूनपूर्व तयारीसाठी अटकाव न करता प्रतिबंधात्मक उपाययोजनेद्वारे जनजीवन विस्कळीत होऊ न देता “कर्फ्युचे” योग्य नियोजन होणे आवश्यक…कुणाल किनळेकर

राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये संपूर्ण आरोग्य यंत्रणा हतबल होऊन कार्यरत आहे व परिस्थिती आता नियंत्रणाबाहेर गेली असून जनता बेशिस्त पणे वागत असल्याचे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींकडून भासवण्यात येत असून ह्या परिस्थितीला सर्वस्वी जनताच दोषी आहे असे ठरवले जातेय हे दुर्दैवी आहे. मुळात 24 मार्च 2020 च्या प्रथम संचारबंदी टप्प्यापासून देशासह राज्याने कोरोना विषाणूचा शिरकाव झाल्यानंतर आजपर्यंत नेमकी कोण कोणती उपाययोजना केली, आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी कोणते निर्णय घेतले याचे सरकार व लोकप्रतिनिधीकडून स्पष्टीकरण होणे गरजेचे आहे.लसीकरण कार्यक्रम जाहीर करून लसींची उपलब्धता नसणे,आरोग्य यंत्रणेत पुरेसे मनुष्यबळ नसणे,मेडिकल ऑक्सिजन तुटवडा भासणे, कोरोना विषाणू चाचणी किट अभावी चाचणी प्रक्रिया थांबवावी लागणे, रुग्णांना इलाजासाठी बेड उपलब्ध न होणे,जिल्ह्याचा सर्वाधिक मृत्यूदर असणे ह्या समस्यांना सर्वस्वी अकार्यक्षम लोकप्रतिनिधींच जबाबदार आहेत.प्रत्येकवेळी फक्त जनतेलाच दोषी ठरवून “लॉकडाऊन” हे एकच रामबाण औषध आहे अशी परिस्थिती निर्माण करून सर्वसामान्य जनतेस वेठीस धरणे चुकीचे आहे. मान्सूनपूर्व तयारी संबंधी कामकाज,शेतीसंबंधी पूर्वतयारी, दैनंदिन रोजीरोटी यासाठी सामान्य जनतेस अटकाव न करता शासन नियमांचे तंतोतंत पालन करून जनजीवन सुरळीत ठेवणे हे प्रशासनाचे कर्तव्य आहे.काही ठराविक पक्षाच्या कार्यकर्त्यांना हाताची धरून जनतेला वेठीस धरणे योग्य नसून कोरोनाची साखळी तोडणेसाठी योग्य नियोजनाद्वारे उपाययोजना करणे शासन व्यवस्थेकडून खऱ्या अर्थाने अभिप्रेत आहे.शिवाय जनता कर्फ्युच्या प्रसिद्धीमुळे पुढील दोन दिवसांत जीवनावश्यक खरेदीसाठी अधिकच गर्दी जमण्यासाठी आमंत्रण देणारे ठरू शकते.”जनतेसाठी नियम आहेत, नियमांसाठी जनता नाही” हे लोकप्रतिनिधींनी विसरू नये तसेच जनतेच्या मूलभूत समस्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या बेजबाबदार लोकप्रतिनिधीनी आपली जबाबदारी योग्य रीतीने पार पाडली असती तर अशी जनता कर्फ्युलादण्याची वेळ आली नसती अशी टीका मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

18 + sixteen =