अखेर जि. प. प्रशासन नमलं…

अखेर जि. प. प्रशासन नमलं…

पोंभुर्ले जि. प. मतदारसंघातील शाळा दुरुस्ती आणि बांधकामाला दिली मान्यता

जि. प. सदस्य प्रदीप नारकर यांच्या लढ्याला यश

सिंधुदुर्ग

जिल्हा परिषद योजना आराखड्यामध्ये पोंभुर्ले जि. प. मतदार संघातील जि. प. च्या प्राथमिक शाळा इमारत बांधकाम व दुरुस्ती समाविष्ट न केल्यामुळे पोंभुर्ले जि. प. सदस्य प्रदिप नारकर यांनी आपण गावातील नागरिकांसह ५ मे रोजी सकाळी १०.०० वाजल्यापासून जिल्हा परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा जि.प.प्रशासनाला दिला होता. त्या उपोषणाचा जो परिणाम होईल त्याला प्रशासन जबाबदार राहिल, असेही त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. सिंधुदुर्ग यांच्या नावे पाठविलेल्या पत्राद्वारे कळविले होते. त्या पत्राची दखल जि. प. ला अखेर घ्यावीच लागली. ‘तुमच्या मागण्या मान्य करण्यात आल्या असून आपण उपोषण करू नये. सदर शाळांचा जिल्हा वार्षिक योजना आराखड्यामध्ये समावेश करण्यात आला असून त्या शाळांच्या बांधकाम व दुरुस्तीसाठी मान्यता देण्यात आलेली आहे.’ अशा आशयाचं पत्र प्रशासनामार्फत प्रदिप नारकर यांना पाठविण्यात आलं असून त्यांच्या लढ्याला यश प्राप्त झालं आहे.

जि. प. मराठी प्रा. शाळा धालवली, जि. प. ऊर्दू प्रा. शाळा धालवली, जि. प. प्रा. शाळा गवाणे, जि. प. केंद्र शाळा नाद नं. १ तसेच जि. प. प्रा. शाळा महाळुंगे देवळेकरवाडी या शाळांचा जिल्हा वार्षिक योजना आराखड्यामध्ये जाणूनबुजून समावेश न केल्याचा नारकर यांचा दावा होता. सदर शाळांच्या सद्यस्थितीबाबत आपण जि. प. सर्वसाधारण सभेमध्ये प्रश्न उपस्थित केला असता मा. शिक्षणाधिकाऱ्यांनी सदर शाळांचा समावेश प्राधान्यक्रम यादीमध्ये करण्यात येईल, असे सांगितले होते. परंतु मा. पालकमंत्रांना पाठविलेल्या वार्षिक आराखड्यात इमारत बांधणीसाठी या शाळांचा समावेश करण्यात आलेला नाही. म्हणून मी ग्रामस्थांसोबत शाळेला न्याय मिळेपर्यंत जि. प. कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार आहे’, असे नारकर यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात म्हटले होते. याविषयीचे सविस्तर वृत्त ‘आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज’ ने प्रसिद्ध केले होते. नारकर यांच्या या पत्राची दखल घेत आज जि. प. कडून सदर शाळांचा जिल्हा वार्षिक योजना आराखड्यात समावेश केल्याचे पत्र नारकर यांना पाठविण्यात आले. यात जि. प. शाळा, नाद-भोळेवाडी या शाळेला नवीन इमारत बांधकामासाठी मंजुरी देण्यात आली आहे. तसेच प्राथमिक शाळा दुरुस्ती अंतर्गत जि. प. मराठी शाळा धालवली, जि. प. शाळा गवाणे आणि जि. प. केंद्रशाळा नाद नं. १ या शाळांना दुरुस्तीसाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. त्यासोबतच जि. प. शाळा फणसगाव गुरवभाटले या शाळेचा इमारत बांधकामसाठी जिल्हा वार्षिक योजना सन २०२१-२२ च्या आराखड्यामध्ये प्राधान्याने समावेश करण्यात आला आहे. तसेच जि. प. ऊर्दू शाळा धालवली व महाळुंगे देवळेकरवाडी (महाळुंगे नं. १) या शाळांची इमारत दुरुस्ती कामे जिल्हा वार्षिक योजना सन २०२१-२२ च्या आराखड्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहेत. त्यामुळे आपण केलेल्या मागण्या मान्य करण्यात आल्या असून दिनांक ५ मे, २०२१ रोजीचे उपोषण आपण करू नये’, अशी विनंती प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी लेखी पत्राद्वारे नारकर यांना केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा