You are currently viewing सिंधुदुर्ग सोन्याची खाण आहे, अखंड सिंधुदुर्ग आंतरराष्ट्रीय पातळीवर पर्यटनाचा केंद्रबिंदू ठरावा – दिपक केसरकर

सिंधुदुर्ग सोन्याची खाण आहे, अखंड सिंधुदुर्ग आंतरराष्ट्रीय पातळीवर पर्यटनाचा केंद्रबिंदू ठरावा – दिपक केसरकर

बारमाही पर्यटनासाठी आंबोलीसह नापणे, सावडाव, तारकर्लीचा विकास

आंबोली

सिंधुदुर्ग सोन्याची खाण आहे. पर्यटनासाठी विविधांगी नैसर्गिक विविधता आहे. त्यामुळे आंबोलीच नव्हे तर अखंड सिंधुदुर्ग जिल्हा आंतरराष्ट्रीय पातळीवर पर्यटनाचा केंद्रबिंदू ठरावा म्हणून शासनाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहे, अशी ग्वाही शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे दिली. आंबोलीसह सावडाव, नापणे धबधब्यांवर बारमाही पर्यटन राहावे यासाठी पुढील काळात नियोजन करण्यात येणार आहे. वर्षा महोत्सवाच्या माध्यमातून आंबोली जगाच्या नकाशावर झळकेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. आंबोली येथे आयोजित करण्यात आलेल्या आंबोली वर्षा महोत्सवाचे उद्घाटन श्री. केसरकर यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी माजी आमदार राजन तेली, सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, सिंधुदुर्ग पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल, उपवनसंरक्षक नवलकिशोर रेड्डी, उपविभागीय अधिकारी सुशांत पानवेकर, सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, ग्रामविकास अधिकारी संदीप गोसावी, पर्यटन महामंडळाचे हनुमंत हेदे, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, तालुकाप्रमुख नारायण राणे, सिंधुदुर्ग पर्यटन महामंडळाचे अध्यक्ष बाबा मोंडकर, आंबोली माजी सरपंच शशिकांत गावडे, आंबोली सरपंच सावित्री पालेकर, उपसरपंच सदाशिव नार्वेकर, महेश पावसकर, शंकर चव्हाण, दीपक नाटलेकर, काशीराम राऊत, रसिका गावडे, साक्षी गावडे, छाया नार्वेकर, निधी गुरव, अमित कामत, अनंत गावडे आदी उपस्थित होते.

यावेळी श्री. केसरकर म्हणाले, आंबोली ही जगाच्या नकाशावर दाखवण्यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी एडव्हेंचर स्पोर्टला महत्व देण्यात आले आहे. जंगल सफारी पॅराग्लाइडिंग पेरा शूटिंग अशा विविध प्रकारच्या माध्यमातून या ठिकाणी देशासह विदेशी पर्यटक आकर्षित करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. येणाऱ्या काळात जिल्ह्यातील अनेक पर्यटन स्थळांचा विकास व्हावा या दृष्टीने आमचे नियोजन सुरू आहे. त्यासाठी आवश्यक असलेला कोट्यावधीचा निधी आम्ही उपलब्ध करून देऊ. विशेष म्हणजे या ठिकाणी रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्या आणि पर्यटन भरावे यासाठी येथील स्थानिक लोकांना घेऊन हे विविध उपक्रम राबविण्याचा आमचा मानस आहे. विशेष करून पर्यटन स्थळाच्या ठिकाणी असलेल्या टेम्पररी स्टॉल उभारण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक असलेला निधी येथे आठ दिवसात जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून देण्यात येईल, असाही विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा